सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक 38 – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
काळं पाणी आणि हिरवं पाणी
दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून बसने निघालो. जारवा आदिवासींच्या जंगलात जायचे होते. त्या संरक्षित जंगलात जाण्या- येण्याच्या वेळा ठराविक असतात. सर्व प्रवासी बसेसना एकदम एकत्र सोडण्यात येतं. त्या जंगल विभागाशी पोहोचेपर्यंत दुतर्फा आंबा, फणस, नारळ, सुपारी, केळी, एरंड, भेंडी अशी झाडं व विविध प्रकारचे पक्षी दिसत होते. संरक्षित जंगल विभागात साधारण ३०० जारवा आदिवासी राहतात. बंद काचेच्या धावत्या बसमधून त्यातील काही आदिवासी दिसले. स्त्री व पुरुषांच्या फक्त कमरेला झाडाच्या सालींचे उभे उभे पट्टे रंगवून कमरेच्या दोरात अडकवलेले होते. पुरुषांच्या हातात तिरकमठा होता व स्त्रियांच्या कडेवर छोटी मुलं होती. लोखंड खूप तापवलं तर त्याचा जसा तांबूस काळा रंग दिसतो तसा त्यांचा तकतकीत रंग होता. काही छोटी मुलं बसमागे धावत होती. सरकारतर्फे त्यांना कपडे, धान्य देण्याचा प्रयत्न होतो. मानव वंशशास्त्रज्ञ त्यांचा अभ्यास करीत असतात पण सारे त्यांचे रीतीरिवाज सांभाळून, त्यांचा विश्वास संपादन करून करावं लागतं.
जंगल ओलांडल्यावर थोड्यावेळाने आम्ही बसमध्ये बसूनच बार्जवर चढलो. पलिकडे उतरल्यावर स्पीड बोटीने, लाईफ जॅकेट घालून, ‘बाराटांगा’ वन विभागात पोहोचलो. दुतर्फा मॅनग्रोव्हजचे घनदाट जंगल आहे. नीलांबर गुंफा बघायला जाताना स्पीड बोटीच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या मॅनग्रोव्हज् व इतर झाडांची सुंदर दाट हिरवी कमान तयार झाली होती. हे गर्द हिरवे ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट आहे. हजारो वर्षी पाणी या गुंफेमध्ये ठिबकल्याने त्यांचे नैसर्गिक आकार तयार झाले आहेत.
१. एलिफंट बीच २. एलिफंट बीचला जाताना वाटेत दिसलेले एक बेट ३. समुद्री कोरल्स
हॅवलॉक आयलँडला जायला लवकर उठून सहाची बोट पकडली. तिथल्या हॉटेलवर आज मुक्काम होता. जेवून दुपारी राधानगर समुद्रकिनाऱ्यावर गेलो. तीव्र उन्हामुळे समुद्राचे पाणी व वाळू चकाकत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलजवळच्या बीचवर फिरायला गेलो . अंदमानच्या जवळजवळ सर्व बेटांवर सदाहरित जंगलं व किनाऱ्याजवळ खारफुटीची दाट वनं आहेत. किनारे प्रवाळाने समृद्ध आहेत. विविध पक्षी आहेत. तिथल्या समुद्रकिनाऱ्यावरील शंख- शिंपले, कोरल्स बाहेर नेण्यास बंदी आहे. इथला निसर्ग लहरी आहे आणि बंगालचा उपसागर सदैव अस्वस्थ असतो.
हॅवलॉकवरून छोट्या होडीतून ( डिंगीतून ) एलिफंट बीचसाठी केलेला प्रवास थरारक होता. वाटेतल्या एका डोंगराचं टोक गरुड पक्षाच्या नाकासारखं पुढे आलं आहे. त्यावर दीपगृह आहे. एलिफंट बीचवर नितळ समुद्रस्नानाचा आनंद घेतला. पूर्वी इथे लाकडाचे भले मोठे ओंडके वाहण्यासाठी हत्तींचा उपयोग करीत म्हणून या किनाऱ्याला ‘एलिफंट बीच’ असं नाव पडलं. आता तिथे हत्ती नाहीत. तिथून हॅवलॉक आयलँडला परत आलो.
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हॅवलॉक बंदरात छान गोरीगोमटी कॅटामरान उभी होती. हलत्या बोटीच्या बंद काचेतून तसंच वरच्या डेकवरून सूर्यास्त टिपण्यासाठी सगळ्यांनी कॅमेरे सरसावले होते. एकाएकी सारं बदललं. आकाश गडद झालं. सूर्य गुडूप झाला. जांभळे ढग नंतर दाट काळे झाले. कॅटामरान जोरजोरात उसळू लागली. टेबल टेनिसचा चेंडू उडवावा तसा समुद्र बोटीला उडवत होता. सारे जण जीव मुठीत धरून बसले. बऱ्याच परदेशी प्रवाशांना, लहान मुलांना उलट्यांनी हैराण केलं. ‘समुद्री तुफान आया है’ असं म्हणत बोटीचा स्टाफ धावपळ करीत साऱ्यांना धीर देत होता, ओकाऱ्यांसाठी पिशव्या पुरवीत होता. दीड तास प्रवासापैकी हा एक तास भयानक होता. निसर्गापुढे माणूस किती क्षुद्र आहे हे दाखविणारा होता.
पोर्ट ब्लेअरला तुफान पावसाने स्वागत केलं. आभाळ फाडून वीज कडाडली. जीव घाबरला, पण आता पाय जमिनीवर टेकले होते. किनाऱ्यावर सुखरूप उतरलो म्हणून त्या अज्ञात शक्तीचे आभार मानले. आकाशातून बरसणाऱ्या धारा आता आशीर्वादासारख्या वाटत होत्या.
भाग ३ व अंदमान समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈