सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 40 – भाग-2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ साद उत्तराखंडाची  ✈️

जिम कार्बेट ते रानीखेत हे अंतर तसं कंटाळवाणं आहे. रानीखेत हे भारतीय लष्करातील नावाजलेल्या कुमाऊँ रेजिमेंटचं मुख्य ठिकाण आहे. रानीखेतमधील कुमाऊँ रेजिमेंटच्या म्युझियममध्ये भारतीय लष्करातील धाडसी, निधड्या छातीच्या वीरांची यशोगाथा बघायला मिळते. दोन परमवीर चक्र व तीन अशोक चक्राचे मानकरी यात आहेत. रानीखेतहून कौसानीला जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या उतारावर सारख्या उंचीचा काळपट हिरवा गालिचा पसरल्यासारखे चहाचे मळे आहेत. कौसानीला चहाची फॅक्टरी पाहिली. तिथे विकत घेतलेला चहा मात्र आपल्याला न आवडणारा गुळमुळीत चवीचा निघाला. रानीखेत- कौसानी रस्त्यावर जंगलामध्ये लाल बुरांस म्हणजे होडोडेंड्रॉन वृक्षाची लालबुंद फुलं सतत दिसतात. या फुलांच्या गोडसर सरबताचा उन्हाळ्यात औषधासारखा उपयोग होतो अशी माहिती मिळाली. कौसानीतल्या आमच्या हॉटेलच्या बगीच्यात किंबहुना  तिथल्या बहुतांश बगीच्यात , हॉटेलात शोभेच्या जाड पानांची अनेक झाडे, कॅक्टसचे वेगवेगळे शोभिवंत प्रकार होते. यातील एका प्रकारच्या कॅक्टसच्या खोडांचा पल्प काढून त्यापासून प्लायवुड बनविले जाते असे तिथल्या हॉटेल मॅनेजरने सांगितले.

‘पृथ्वीचा मानदंड’ असे ज्याचे सार्थ वर्णन कवी कुलगुरू कालिदासाने केले आहे तो ‘हिमालयो नाम नगाधिराज’ म्हणजे भारताला निसर्गाकडून मिळालेलं फार मोठं वरदान आहे. जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, ईशान्य भारतातील राज्ये आणि पश्चिम बंगाल या साऱ्यांना हिमालयाचा वरदहस्त लाभला आहे. अशा अफाट हिमालयाच्या उत्तुंग पहाड रांगांना वेगवेगळी नावे आहेत. धौलाधार, पीरपांजाल, कुमाऊँ ,गढवाल अशा विविध रांगांच्या अनंत हातांनी हिमालय आपल्याला बोलावत राहतो. एकदा हिमालयाच्या प्रेमात पडलं की अनेक वेळा तिथे जायचे योग येतात.

साधारण वीस- पंचवीस वर्षांपूर्वी चारधाम यात्रेचा बेत केला. हरिद्वारपासून हरिद्वारपर्यंत असं चारधाम प्रवासाचे बुकिंग गढवाल निगमतर्फे केलं होतं. यात्रा सुरू होण्याआधी चार दिवस डेहराडून एक्सप्रेसने डेहराडूनला पोहोचलो. डेहराडून ही उत्तराखंडाची राजधानी गंगा आणि यमुनेच्या खोऱ्यात वसली आहे. भरपूर पाऊस, आकाशाला भिडणारे वृक्ष, डोंगरउतारावरची छोटी छोटी घरं, नाना रंगांची फुलझाडं असणाऱ्या डेहराडूनमध्ये अनेक नावाजलेल्या शैक्षणिक संस्था आहेत. इंडियन मिलिटरी अकादमी, पेट्रोलियम रिसर्च इन्स्टिट्यूट, फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट, वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जीऑलॉजी, वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट अशा संस्था तसेच लष्कराला अनेक प्रकारचे साहित्य पुरविणारी ऑर्डनन्स फॅक्टरी आहे. आम्हाला फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट बघायला मिळाली. तिथे पुरातन मजबूत वृक्षांचे ओंडके गोल कापून ठेवले होते. त्या खोडांच्या अंतरेर्षांवरून त्या झाडाचं वय कितीशे वर्ष आहे, त्याचे उपयोग, सध्या या जातीचे किती वृक्ष आहेत अशी माहिती तिथे सांगितली.

तिथून मसुरीला गेलो. साधारण साडेसहा हजार फुटावरील मसुरीला हिल स्टेशन्सची राणी म्हणतात. स्क्रूसारख्या वळणावळणांचा मसुरीचा रस्ता केव्हा एकदा संपतो असं झालं होतं. डोंगरकपारीतली एकावर एक वसलेली चढती घरे पाहत मसुरीला पोहोचलो. मसूरी हेसुद्धा शैक्षणिक व औद्योगिक केंद्र आहे. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस (IAS) मधील यशस्वी उमेदवारांना इथे ‘लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन’मध्ये ट्रेनिंग दिलं जातं. सुप्रसिद्ध डून स्कूल तसेच मोठी ॲग्रीकल्चर यूनिव्हर्सिटी आहे. रोपवेने गनहिलला गेलो. इथून संपूर्ण मसुरी, डून व्हॅली व दूरवर हिमालयाच्या शिवालिक रेंजेस दिसतात. मसुरीला मोठे बगीचे व मासेमारीसाठी तलाव आहेत. इथून हिमालयातील लहान- मोठ्या ट्रेकिंगच्या मोहिमा सुरू होतात. त्यांचे बेस कॅम्पस् व ट्रेनिंग इन्स्टिट्यूट इथे आहे. आमचे सीडार लॉज खूप उंचावर होते. सभोवती घनदाट देवदार वृक्षांचे कडे होते. मसुरीहून दुसऱ्या दिवशी केम्प्टी फॉल्स बघायला गेलो. गोल गोल वळणांच्या रस्त्याने दरीच्या तळाशी पोहोचलो. खूप उंचावरून धबधबा कोसळत होता. त्याच्या थंडगार तुषारांनी सचैल स्नान झाले. हौशी प्रवाशांची गर्दी मुक्त मनाने निसर्गाच्या शॉवरबाथचाआनंद घेत होती.

मसुरीहून हरिद्वारला मुक्काम केला.  दुसऱ्या दिवशी ऋषिकेशला गेलो. तिथल्या झुलत्या पुलावरून पलीकडे गेल्यावर अनेक आश्रम होते. साधू, बैरागी, शेंडी ठेवलेले परदेशी साधक यांची तिथे गर्दी होती. इथे गंगेच्या खळाळत्या थंडगार पाण्याला खूप ओढ आहे. गंगाघाटाच्या कडेने बांधलेल्या लोखंडी साखळीला धरून गंगास्नानाचा आनंद घेतला. संध्याकाळी हरिद्वारला गंगेच्या घाटावर आरती करून दीप पूजा केली.

उत्तराखंड भाग २ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments