सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक 41 – भाग-3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
साद उत्तराखंडाची
हरिद्वारहून चारधाम यात्रेची सुरुवात झाली. गढवाल निगमच्या बसने हरिद्वारपासून हनुमान चट्टीपर्यंत गेलो . तिथून जानकी चट्टीपर्यंत जंगलातील खूप चढावाचा रस्ता चढायचा होता.( आता बसेस जानकी चट्टीपर्यंत जातात .)दुपारी दोन अडीच वाजता आम्ही चढायला सुरुवात केली तेव्हा आकाश निरभ्र होतं. चार वाजता अकस्मात सारं बदलून गेलं .हां हां म्हणता चारी बाजूंनी काळे ढग चाल करून आले. गारांचा पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. थंडीने हृदय काकडू लागलं. डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा दाट काळोख, वारा आणि पाऊस होता. डावीकडील दरीतून अंधार चिरत येणारा रोरावणार्या यमुनेचा आवाज जिवाचा थरकाप करीत होता. बरोबरच्या ग्रुपमधील कोण कुठे होते त्याचा पत्ता नव्हता. सारंच विलक्षण अद्भुत वाटत होतं. एका पहाडी माणसाने आम्हाला खूप मदत केली. ‘आस्ते चलो, प्रेमसे चलो, विश्वाससे चलो’ असे सांगत धीर दिला. रस्ता दाखविला. सोबत केली. वाटेत कुणी त्याचा गाववाला भेटला की दोघं एकमेकांना ‘जय जमुनामैया’ असं अभिवादन करीत. सर्वजण कसेबसे, थकूनभागून, संपूर्ण भिजून गढवाल निगमच्या जानकी चट्टीच्या निवासस्थानी आलो. कोणी कोणाशी बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हतो. तिथल्या माणसाने जी खिचडी वगैरे दिली ती खाऊन ओल्या कपड्यातच कशीबशी उरलेली रात्र काढली. पहाटे लवकर उजाडलं. सूर्याच्या सोनेरी किरणांनी पर्वतांच्या माथ्यावरचे बर्फ सोन्यासारखे चमकू लागले .इतकं सगळं शांत आणि स्वच्छ होतं की कालचं वादळ ‘तो मी नव्हेच’ म्हणंत होतं.फक्त आजूबाजूला कोसळलेल्या वृक्षांवरून कालचा वादळाची कल्पना येत होती.
जानकी चट्टीहून यमुनोत्रीपर्यंतचा सहा- सात किलोमीटरचा रस्ता उभ्या चढणीचा, दरीच्या काठाने जाणारा आहे. हिरवेगार डोंगर, बर्फाच्छादित शिखरे आहेत.चालत किंवा घोड्यावरून अथवा दंडी म्हणजे पालखीतून किंवा कंडीतून जाता येते .कंडी म्हणजे आपण आसाममध्ये पाठीवर बास्केट घेऊन चहाची पाने खुडणाऱ्या बायका पाहतो तशाच प्रकारची निमुळती बास्केट असते. त्यात आपल्याला बसवतात आणि पाठीवर घेऊन ती शिडशिडीत ,काटक माणसे तो उभा चढ चढतात. या दुर्गम प्रदेशातील जीवन खडतर आहे. अज्ञान, गरिबी, शिक्षणाचा अभाव यामुळे त्यांचे कष्टमय जीवन पर्यटकांवरच अवलंबून असतं.
यमुनोत्रीचे देऊळ बारा हजार फुटांवर आहे. निसर्गाचं आश्चर्य म्हणजे जिथे यमुनेचा उगम होतो, तिथेच गरम पाण्याचे कुंडसुद्धा आहे. त्यात तांदुळाची पुरचुंडी टाकली की थोड्यावेळाने भात शिजतो. अनेक भाविक हा प्रयोग करीत होते .अक्षय तृतीयेपासून दिवाळीपर्यंत खूप यात्रेकरू इथे येतात. त्यानंतर बर्फवृष्टीमुळे मंदिर सहा महिने बंद असते.
यमुनोत्री ते गंगोत्री हा साधारण अडीचशे किलोमीटरचा रस्ता दऱ्यांच्या काठावरून नागमोडी वळणाने जातो. पहाडांना बिलगून चालणारी ही अरुंद वाट, पहाडातून खळाळत येणारे निर्मल, थंडगार पाण्याचे झरे ,लाल- जांभळ्या फुलांनी डवरलेले खोल दरीतले वृक्ष सारे हजारो वर्षांपूर्वी भगीरथाने गंगावतरणासाठी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची आठवण करून देतात. यमुनोत्री व गंगोत्रीचा हा परिसर उत्तरकाशी जिल्ह्यात येतो. उत्तरकाशी हे एक नितांत रमणीय ठिकाण आहे. उत्तरकाशीमध्ये शिवाचे प्राचीन मंदिर आहे. इथले मॅग्नेलिया वृक्ष मंद मधूर सुवासाच्या, पांढऱ्या, तळहाताएवढ्या कमलांसारख्या फुलांनी डवरलेले होते.
गंगोत्री मंदिरापर्यंत बस जाते .बर्फाच्छादित शिखरे व गंगेचा खळाळणारा थंडगार प्रवाह इथे आहे. गंगेचा खरा उगम हा गंगोत्रीच्या वर २५ किलोमीटरवर गोमुख इथे आहे. अतिशय खडतर चढणीच्या या रस्त्यावरून काहीजण गोमुखाकडे चालत जात होते. तिथे प्रचंड अशा हिमकड्यातून भागिरथीचा( इथे गंगेला भागिरथी म्हटले जाते) हिमाच्छादित प्रवाह उगम पावतो.
गंगोत्रीहून गौरीकुंड इथे आलो. तिथे गरम पाण्याचे कुंड आहे. असंख्य भाविक त्यात स्नान करीत होते .तिथली अस्वच्छता पाहून आम्ही नुसते हात पाय धुवून केदारनाथकडे निघालो .गौरीकुंडापासूनचा १४ किलोमीटरचा चढ छोट्या घोड्यावरून ( पोनी ) पार करायचा होता. एका बाजूला पर्वतांचे उभे कातळकडे, निरुंद वाट आणि लगेच खोल दरी असा हा थोडा भीतीदायक पण परिकथेसारखा प्रवास आहे. खोल दरीतून मंदाकिनी नदीचा अवखळ हिमशुभ्र प्रवाह कधी वेडी- वाकडी वळणे घेत तर कधी उड्या मारत धावत होता. फार चढणीच्या वेळी घोड्यावरून उतरून थोडे पायी चालावे लागते. त्यावेळी पर्वतांच्या कपारीतून धावत येणारे धबधबे, झरे दिसतात. त्यांचे शुद्ध, मधुर, गार पाणी पिता येते. झऱ्याच्या पाण्याने निसरड्या झालेल्या अरुंद पाय वाटेवरून चालताना आजूबाजूचे उंच पर्वतकडे, हिरवी दाट वृक्षराजी ,अधूनमधून डोकावणारी हिमाच्छादित शिखरे, दरीच्या पलीकडच्या काठाला संथपणे चरणाऱ्या शेकडो गुबगुबीत मेंढ्यांचा कळप हे सारे नितळ गूढरम्य वातावरण आपल्याला या अनादी, अनंत, अविनाशी चैतन्याचा साक्षात्कार घडविते.
केदारनाथचे चिरेबंदी मंदिर साधारण ११००० फुटांवर आहे. इथे मंदाकिनी नदीचा उगम होतो. अशी कथा आहे की कुरुक्षेत्राची लढाई झाल्यानंतर पाचही पांडव पापक्षालन करण्यासाठी तीर्थयात्रा करीत होते. त्यांना पाहून भगवान शंकराने रेड्याचे रूप घेतले व आपले तोंड जमिनीत खुपसले. म्हणून इथले केदारनाथाचे लिंग नेहमीच्या शाळुंका स्वरूपात नसून फुगीर पाठीसारखे आहे. इथल्या महाद्वारापुढे नंदी आहे. नंदीच्या मागे मोठी घंटा आहे. महाद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल आहेत. गाभाऱ्यात तुपाचे नंदादीप अहोरात्र तेवत असतात. इथे अभिषेक करण्याची पद्धत नाही. त्या ऐवजी लिंगावर तुपाचे गोळे थापतात. सभामंडपाच्या भिंतीत पाच पांडव, द्रौपदी, कुंती, पार्वती, लक्ष्मी अशा पाषाणमूर्ती आहेत. इथून जवळच आदि शंकराचार्यांची समाधी आहे. इथे सतत बर्फ पडत असल्याने मंदिरात जाण्याची वाट ही बर्फ बाजूला करून बनविलेली असते.दोन्ही बाजूंचे बर्फाचे ढिगारे न्याहाळत अलगद वाटचाल करावी लागते. अक्षय तृतीयेपासून दिवाळीपर्यंत हे मंदिर उघडे असते व नंतर सहा महिने बंद असते.
उत्तराखंड भाग तीन समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈