सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग-1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ✈️
सूर्यदेवांची उबदार किरणं पृथ्वीवर जिथे पहिली पावलं टाकतात तो देश जपान! किमोनो आणि हिरव्या रंगाच्या चहाचा देश जपान! हिरोशिमाच्या अग्नीदिव्यातून झळाळून उठलेला देश जपान! साधारण पंधरा-सोळा वर्षांपूर्वी या जपानला जायचा योग आला. आम्ही मुंबईहून हॉंगकॉंगला विमान बदलले आणि चार तासांनी ओसाका शहराच्या कंसाई विमानतळावर उतरलो. आधुनिक जपानी तंत्रज्ञानाचा आविष्कार इथूनच पहायला मिळाला. जपानने कंसाई हे मानवनिर्मित कृत्रिम बेट भर समुद्रात बांधले आहे व त्यावर भलामोठा विमानतळ उभारला आहे. हे कृत्रिम बेट सतत थोडे थोडे पाण्याखाली जाते आणि दरवर्षी हजारो जॅक्सच्या सहाय्याने ते वर उचलले जाते. विमानातून उतरून कस्टम्स तपासणीसाठी दाखल झालो. शांत, हसऱ्या चेहऱ्यांच्या जपानी मदतीमुळे विनासायास त्या भल्यामोठ्या विमानतळाबाहेर आलो तेव्हा रात्रीचे दहा वाजले होते. आमचे मित्र श्री.अरुण रानडे यांच्याबरोबर टॅक्सीने त्यांच्या घरी कोबे इथे जायचे होते.
त्या मोठ्या टॅक्सीच्या चारही बाजूंच्या स्वच्छ काचांमधून बाहेरची नवी दुनिया न्याहाळत चाललो होतो. एकावर एक असलेले चार-पाच एक्सप्रेस हायवे झाडांच्या, फुलांच्या, दिव्यांच्या आराशीने नटले होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सारख्या आकाराच्या दहा मजली इमारती होत्या. त्यांच्या पॅसेजमध्ये एकसारखे, एकाखाली एक सुंदर दिवे लागले होते. असं वाटत होतं की, एखाद्या जलपरीने लांबच लांब रस्त्यांची पाच पेडी वेणी घातली आहे. त्यावर नाना रंगांच्या पानाफुलांचा गजरा माळला आहे. दोन्ही बाजूंच्या दिव्यांच्या माळांचे मोत्याचे घोस केसांना बांधले आहेत. कंसाई ते कोबे हा शंभर मैलांचा, सव्वा तासाचा प्रवास रस्त्यात एकही खड्डा नसल्याने अलगद घरंगळल्यासारखा झाला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून निघालो. अनघा व अरुण रानडे यांचे कोबेमधले घर एका डोंगराच्या पायथ्याशी पण छोट्याशा टेकडीवजा उंचवट्यावर होते. तिथून रेल्वे व बस स्टेशन जवळपासच होते. आम्ही आसपासची दुकाने, घरे, बगीचे न्याहाळत बसस्टॅंडवर पोहोचलो. कोबे हिंडण्यासाठी बसचा दिवसभराचा पास काढला. बसने एका मध्यवर्ती ठिकाणी उतरून दाईमारू नावाचे चकाचक भव्य शॉपिंग मॉल तिथल्या वस्तूंच्या किमतींचे लेबल पाहून फक्त डोळ्यांनी पाहिले. नंतर दुसऱ्या बसने मेरीकॉन पार्कला गेलो. बरोबर आणलेले दुपारचे जेवण घेऊन पार्कमध्ये ठेवलेली चारशे वर्षांची जुनी भव्य बोट पाहिली. संध्याकाळी पाच वाजताच इथे काळोख पडायला लागतो. समुद्रावर गेलो. तिथून कोबे टॉवर व समुद्राच्या आत उभारलेले सप्ततारांकित ओरिएंटल हॉटेल चमचमतांना दिसत होते. नकाशावरून मार्ग काढत इकॉल या हॉटेलच्या अठराव्या मजल्यावर जाऊन तिथून रात्रीचे लखलखणारे कोबे शहर, कोबे पोर्ट ,कोबे टॉवर पाहिले. त्यामागील डोंगरांची रांग मुद्दामहून वृक्ष लागवड करून हिरवीगार केली होती. त्या पार्श्वभूमीवर हे सारे दृश्य विलोभनीय वाटत होते.
आज रविवार.क्योटो इथे जायचे होते. मुंबईहून येतानाच आम्ही सात दिवसांचा जपानचा रेल्वे पास घेऊन आलो होतो. भारतीय रुपयात पैसे देऊन हा पास मुंबईत ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, चर्चगेट इथे मिळतो. ही सोय फार छान आहे. जेव्हा आपण जपान रेल्वेने पहिला प्रवास करू त्यादिवशी हा पास तिथल्या स्टेशनवर एंडॉर्स करून घ्यायचा. त्या दिवसापासून सात दिवस हा पास जपान रेल्वे, बुलेट ट्रेन व जपान रेल्वेच्या बस कंपनीच्या बसेसनासुद्धा चालतो. आज बुलेट ट्रेनचा पहिला प्रवास आम्हाला घडणार होता. घरापासून जवळच असलेल्या शिनकोबे या बुलेट ट्रेनच्या स्टेशनवर पोहोचलो. रेल्वे पास दाखवून क्योटोच्या प्रवासाची स्लीप घेतली. स्टेशनवर बुलेट ट्रेन सटासट येत जात होत्या. आपल्याला दिलेल्या कुपनवर गाडीची वेळ व डब्याचा क्रमांक दिलेला असतो.तो क्रमांक प्लॅटफॉर्मवर जिथे लिहिलेला असेल तिथे उभे राहण्याची खूण केलेली असते. तिथे आपण सिंगल क्यू करून उभे राहायचे. आपल्या डब्याचा दरवाजा बरोबर तिथेच येतो. दरवाजा उघडल्यावर प्रथम सारी उतरणारी माणसे शांतपणे एकेरी ओळीतच उतरतात. तसेच आपण नंतर चढायचे व आपल्या सीट नंबरप्रमाणे बसायचे. नो हल्लागुल्ला! गार्ड प्रत्येक स्टेशनला खाली उतरून प्रवासी चढल्याची खात्री करून घेऊन मगच ऑटोमॅटिक बंद होणारे दरवाजे एका बटनाने लावतो. नंतर शिट्टी देउन, ‘ सिग्नल पाहिला’ याची खूण करून गाडी सुरू करण्याची सूचना ड्रायव्हरला देतो. सारे इतक्या शिस्तीत, झटपट व शांतपणे होते की आपणही अवाक होऊन सारे पाहात त्यांच्यासारखेच वागायला शिकतो. या सर्व ट्रेन्समधील सीट्स आपण ज्या दिशेने प्रवास करणार त्या दिशेकडे वळविण्याची सहज सुंदर सोय आहे. ताशी २०० किलोमीटरहून अधिक वेगाने धावणाऱ्या या बुलेट ट्रेनचा प्रवास म्हणजे एक चित्तथरारक अनुभव होता.( या गतीने मुंबईहून पुणे एका तासाहून कमी वेळात येईल.) तिकीट चेक करायला आलेला टी.सी. असो अथवा ट्रॉलीवरून पदार्थ विकणारी प्रौढा असो, डब्यात येताना व डब्याबाहेर जाताना दरवाजा बंद करायचा आधी कमरेत वाकून प्रवाशांना नमस्कार केल्याशिवाय बाहेर पडत नाहीत.
जपान भाग १ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈