सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक 33 – भाग- 2 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
✈️ सुंदर, शालीन आणि अभिमानी जपान ✈️
क्योटो इथे एक बौद्ध मंदिर पाहिले. जगातले सगळ्यात मोठे लाकडी बांधकाम असे त्याचे वर्णन केले जाते. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी सहाव्या शतकात तिथे भारतातून नागार्जुन आणि वसुबंधू नावाचे बौद्ध भिक्षू आले होते, असे तिथे लिहिले होते. नंतर बुद्धाचे १००० सोनेरी पुतळे असलेले व मधोमध भगवान बुद्धाची शांत भव्य मूर्ती असलेले देऊळ पाहिले. त्या मूर्तीपुढील पुतळ्यांची नावे इंद्र, गंधर्व, नारायण, विष्णू, लक्ष्मी अशी आहेत पण त्यांचे चेहरे विचित्र दिसतात. एका पॅगोडामध्ये छताला भव्य सोनेरी कमळांची नक्षी आहे. पाऊस सुरू झाल्याने उरलेले क्योटो दुसऱ्या दिवशी बघण्याचे ठरले.
क्योटो रेल्वे स्टेशनवर जायला म्हणून एका बसमध्ये चढलो. पण सकाळी जिथे उतरलो होतो ते स्टेशन कुठे दिसेना. कसे दिसणार? कारण आम्ही अगदी विरुद्ध दिशेच्या बसमध्ये बसलो होतो. आमची काहीतरी गडबड झाली आहे हे आजूबाजूच्या जपानी लोकांच्या लक्षात आले पण भाषेची फार अडचण! अगदी थोड्या जणांनाच इंग्रजी समजते. पण तत्परतेने मदत करण्याची वृत्ती दिसली. एका जपानी माणसाला थोडेफार समजले की आम्हाला क्योटो स्टेशनवर जायचे आहे. बस, डेपोमध्ये गेल्यावर त्याने खाणाखुणा करून सांगितल्याप्रमाणे आम्ही धावत पळत त्याच्या मागे गेलो. त्याने आम्हाला योग्य बसमध्ये बसवून दिले.
दुसऱ्या दिवशी क्योटोला जाऊन गोल्डन टेम्पलला गेलो. एका तळ्याच्या मध्यावर संपूर्ण सोन्याच्या पत्र्याने मढविलेला पॅगोडा आहे. सभोवतालच्या तळ्यात त्याचे सोनेरी प्रतिबिंब चमकत होते. चारी बाजूंनी झाडीने वेढलेल्या पर्वतराजीत राजघराण्याचे हे देऊळ आहे .नंतर जवळच असलेल्या सिल्व्हर टेम्पलला गेलो. असंख्य फुलझाडांच्या आणि शिस्तीने राखलेल्या झाडांमध्ये हे देऊळ आहे .डोंगरातून वरपर्यंत जाण्यासाठी वृक्षराजींनी वेढलेल्या पाऊलवाटा आहेत. स्वच्छ झऱ्यांमधून सोनेरी, पांढरे ,तांबूस रंगांचे मासे सुळकन इकडे तिकडे पळत होते.
जेवण आटोपून नारा इथे जाण्यासाठी छोट्या रेल्वे गाडीत बसलो. स्वच्छ काचांची छोटी, सुबक गाडी छोट्या छोट्या गावांमधून चालली होती. हिरवी, पोपटी डोलणारी शेती, आखीवरेखीव भाजीचे मळे, त्यात मन लावून कामं करणारी माणसं, टुमदार घरं, घरापुढे छान छान मोटारगाड्या, रंगसंगती साधून जोपासलेला बगीचा असे चित्रातल्यासारखे दृश्य होते. नारा येथील हरीण पार्क विशेष आकर्षक नव्हते. जवळच असलेल्या लाकडी, भव्य तोडाजी टेम्पलमध्ये ७० फूट उंचीची भगवान बुद्धाची दगडी मूर्ती आहे. या मूर्तीच्या दोन्ही बाजूला तशाच भव्य पंचधातूच्या, पण सोनेरी मुलामा दिलेल्या बुद्धमूर्ती आहेत.देवळाचे प्रचंड लाकडी खांब दोन कवेत न मावणारे आहेत . जुन्या पद्धतीची जपानी बाग पाहिली. झुळझुळणाऱ्या झऱ्याच्या मध्यावर अगदी आपल्या कोकणातल्यासारखा लाकडी रहाट फिरत होता. पूर्वी ही रहाटाची शक्ती वापरून धान्य दळण्यासाठी त्याचा उपयोग करीत असत. बागेमध्ये अनंत व जास्वंदीची झाडे सुद्धा होती.
आज मियाजिमा व हिरोशिमा इथे जायचे होते. शिनकानसेनने म्हणजेच बुलेट ट्रेनने हिरोशिमा इथे उतरून मियाजिमा इथे गेलो. तिथून छोट्या बोटीने जाऊन पाण्यावर तरंगणारा पाच मजली शिंटो पॅलेस पाहिला.हे छोटेसे बेट पर्वतराजींनी वेढलेले आहे. त्यावरील घनदाट वृक्ष फॉल सीझनच्या रंगाने सजू लागले होते.
क्रूझने परत मिआजिमा स्टेशनला येऊन जपान रेल्वेने हिरोशिमाला आलो. जगातला पहिला अणुबॉम्ब जिथे टाकला गेला ते ठिकाण! मानवी क्रौर्याचे अस्वस्थ करणारे स्मारक! अगदी खरं सांगायचं तर तेथील म्युझियम, तिथे दाखवत असलेला माहितीपट आम्ही फार वेळ बघू शकलो नाही. लोकांचे आक्रंदन, जळणारे देह, कोसळणाऱ्या इमारती यातील काहीही फार वेळ बघवत नाही. मानवतेवर कलंक लावणारे असे ते विदारक चित्र पाहून डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागतात. मनुष्य इतका क्रूर बनू शकतो यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. तिथल्या लहान मुलांच्या स्मारकाजवळ काचेच्या मोठ्या चौकोनी पेट्या ठेवल्या होत्या. अणुबॉम्बला विरोध आणि जागतिक शांततेला पाठिंबा दर्शविण्यासाठी आपण तिथे ठेवलेल्या पांढऱ्याशुभ्र कागदांचे पक्षांचे आकार करून त्या पेट्यांमध्ये टाकायचे. आम्हीही तिथे नाव पत्ता लिहून आमचा शांततेला पाठिंबा दर्शवीत कागदाचे काही क्रेन्स करून त्या काचेच्या पेटीत टाकले. तत्परता म्हणजे एवढी, की आम्ही जपानहून परत येण्याच्या आधीच आम्ही शांततेला पाठिंबा दर्शविल्याबद्दल हिरोशिमाच्या मेयरचे आभारदर्शक पत्र घरी येऊन पडले होते.
आज हिमेजी कॅसल बघायला जायचे होते. कोबेच्या सान्योमिया स्टेशनवरून हिमेजीला जाताना अकाशी येथील सस्पेन्शन ब्रिज पहिला.अमेरिकेतील सॅनफ्रान्सिसकोच्या गोल्डन ब्रीजपेक्षासुद्धा हा ब्रीज लांबीने जास्त आहे. हिमेजी स्टेशनला उतरून तिथला भव्य, संपूर्ण लाकडी राजवाडा बघायला गेलो. त्याच्या बाहेरील प्रांगणात बोन्सायचे आणि सुंदर फुलांचे मोठे प्रदर्शन भरले होते. मोठ्या वृक्षांची हुबेहूब छोटी प्रतिकृती करण्याची ही जपानी कला! अगदी छोट्या, सुंदर आकारांच्या कुंड्यांमधून वाढवलेले छोटे वृक्ष, त्यांना आलेली छोटी फळं, छोटी जंगलं, दगडातील डोंगरातून वाहणारे झरे सारे पाहात रहावे असे होते. डेलिया, जरबेरा, सूर्यफुलांचे विविधरंगी ताटवे होते.
आज सकाळी कोबेमध्येच घराजवळील रोपवे स्टेशनला जायचे होते. आम्ही राहात होतो, तिथून दहा मिनिटांच्या अंतरावर ओरिएंटल हॉटेल नावाची भव्य वास्तू होती. हॉटेलमधल्याच रस्त्याने बुलेट ट्रेनच्या शिनकोबे स्टेशनला जाण्याचा मार्ग होता. हॉटेलच्या लॉबीमध्ये दोन्ही बाजूला फर्निचर, कपडे, खेळण्यांची आकर्षक दुकाने होती. शिनकोबे क्लब होता. लहान मुलांना खेळायची जागा होती. छोटे पब, रेस्टॉरंट होते. जमिनीखालील दोन मजल्यांवर ग्रोसरी व फळे फुले यांची दुकाने होती. तिथून भुयारी रेल्वेच्या स्टेशनला जाता येत होते आणि आमचा रोपवेला जाण्याचा मार्ग हॉटेलच्या रस्त्यामधून एका बाजूला होता. एखाद्या जागेचा जास्तीत जास्त, अत्यंत सोयीस्कर व नेटका उपयोग कसा करून घ्यायचा याचे हे एक उत्तम उदाहरण वाटले.
रोपवेने डोंगरमाथ्यावर गेलो.फुजिसान म्हणजे फुजियामा पर्वत सोडला तर इथे कुठचाही डोंगर उघडा- बोडका नाहीच. वृक्षांची लागवड करून, ते जोपासून सारे हिरवे राखले आहे. डोंगर माथ्यावरील हर्ब पार्कमध्ये औषधी वनस्पती, भाज्या वाढविल्या आहेत. त्यात गवती चहा, पुदिना, तुळस, माका, ब्राह्मी, आले, मिरी वगैरे झाडे जोपासली होती. मोठ्या काचगृहातून केळीची लागवड केली होती. कारंजी ,झरे ,फुलांचे गालिचे होते. डोंगर माथ्यावरून साऱ्या कोबे शहराचा नजारा दिसत होता.
जपान भाग २ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈