डाॅ. मीना श्रीवास्तव
मी प्रवासिनी
☆ मनोवेधक मेघालय…भाग -२ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
(मनमोहिनी मॉलीन्नोन्ग, डिव्हाईन, डिजिटल डिटॉक्स (divine, digital detox)
प्रिय वाचकांनो,
कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)
फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)
मावलीन्नोन्ग (Mawlynnong) हे अगम्य नाव असलेले गाव पृथ्वीतलावर आहे, हे माझ्या गावीही नव्हते! तिथे गेल्यानंतर या गावाचे नाव शिकता-शिकता चार दिवस लागले (१७ ते २० मे २०२२), अन गावाला रामराम करायची वेळ येऊन ठेपली. शिलाँग पासून ९० किलोमीटर दूर असलेले हे गाव. तिथवर पोचणारी ही वाट दूर होती, घाटा-घाटावर वळणे घेता घेता गावलेले हे अगम्य अन “स्वप्नामधील गाव” आता मनात बांबूचं घर करून बसलय! त्या गावाकडचे ते चार दिवस ना माझे होते ना माझ्या मोबाइलचे! ते होते फक्त निसर्गराजाचे अन त्याच्याबरोबर झिम्मा खेळणाऱ्या पावसाचे! आजवर मी बरेच पावसाळे पाहिलेत! मुंबईचा पाऊस मला सगळ्यात भारी वाटायचा! पन या गावाच्या पावसानं पुरती वाट लावली बगा म्हमईच्या पावसाची! अन तिथल्या लोकांना त्याचे अप्रूप वगैरे काही नाही! बहुदा त्यांच्यासाठी हा सार्वजनिक शॉवर नित्याची बाब असावी! आता मेघालय मेघांचे आलय (hometown म्हणा की) मग हे त्याचेच घर झाले की, अन आपण तिथे पाहुणे असा एकंदरीत प्रकार! तो तिथं एन्ट्री देतोय हेच त्याचे उपकार, शिवाय झिम्मा खेळून पोरी दमतात, अन घडीभर विसावा घेतात, असा तो मध्ये मध्ये कमी होत होता. आम्ही नशीबवान म्हणून त्याची विश्रांतीची वेळ अन आमची तिथली निसर्गरम्य ठिकाणे पाहायची वेळ कशी का कोण जाणे पण चारही दिवस मस्त मॅच झाली! रात्री मात्र त्याची अन विजेची इतकी मस्ती चालायची, त्याला धुडगूस, धिंगाणा, धम्माल, धरपकड, अन गावातल्या (आकाशातल्या नव्हे) विजेला धराशायी करणारीच नावें शोधावी लागतील!
मॉलीन्नोन्ग सुंदरी: सॅली!
खासी समाजात मातृसत्ताक पद्धत अस्तित्वात आहे. महिला सक्षमीकरण हा तर इथला बीजमंत्र. घर, दुकान, घरगुती हॉटेल अन जिथवर नजर जाईल तिथे स्त्रिया, त्यांच्या साक्षरतेचे प्रमाण ९५-१००%. आर्थिक गणित याच सांभाळणार! बाहेर काम करणाऱ्या प्रत्येकीच्या गळ्यात स्लिंग बॅग(पैसे घेणे अन देणे यासाठी सुटसुटीत व्यवस्था). आम्ही देखील एक दिवस एका घरात अन तीन दिवस अन्य घरात वास्तव्य केले! तिथल्या मालकीणबाईंचे नाव Salinda Khongjee, (सॅली)! ही मॉलीन्नोन्ग सुंदरी म्हणजे इथल्या गोड गोजिऱ्या यौवनाची प्रतिनिधीच जणू! चटपटीत, द्रुत लयीत कामे उरकणारी, चेहेऱ्यावर कायम मधुर स्मित! इथल्या सगळ्या स्त्रिया मी अश्याच प्रकारे कामे उरकतांना बघितल्या! मी अन माझ्या मुलीने या सुंदर सॅलीची छोटी मुलाखत घेतली.(ही माहिती छापण्याकरता तिची परवानगी घेतली आहे) तिचं वय अवघे २९! पदरात, अर्थात जेन्सेम मध्ये (खासी पोशाखाचा सुंदर आविष्कार म्हणजे जेन्सेम, jainsem) दोन मुली, ५ वर्षे अन ४ महिने वयाच्या, तिचा पती, Eveline Khongjee (एव्हलिन), वय अवघं २५ वर्षे! आम्ही ज्या घरात होम स्टे करून राहिलो ते घर सॅलीचं, अन ती राहत होती ते आमच्या घराच्या डाव्या बाजूचं घर परत तिचच! आमच्या घराच्या उजव्या बाजूचं घर तिच्या नवऱ्याच माहेर अर्थात तिच्या सासूचं अन नंतर वारसा हक्कानं तिच्या नणंदेचं! तिची आई हाकेच्या अंतरावर राहते. सॅलीचे शिक्षण स्थानिक अन थेट शिलाँगला जाऊन बी ए दुसऱ्या वर्षापर्यंत. (वडिलांचे निधन झाल्याने फायनल राहिले!) लग्न झालं चर्च मध्ये (धर्म ख्रिश्चन). इथे नवरा लग्नानंतर आपल्या बायकोच्या घरी जातो! आता तिचा नवरा आमच्या घराच्या समोरून (त्याच्या अन तिच्या) माहेरी अन सासरी जातांना बघायला मजा यायची. सॅली पण काही हवं असेल तर पटकन आपल्या सासरी जाऊन कधी चहाचे कप, तर कधी ट्रे अशा वस्तू जेन्सेमच्या आत लपवून घेऊन जातांना बघायची मजा औरच! सर्व आर्थिक व्यवहार अर्थातच सैलीकडे बरं का! नवरा बहुतेक मेहनतीची अन बाहेरची कामे करायचा असा मी निष्कर्ष काढला! घरची भरपूर कामे अन मुलींना सांभाळून देखील सॅलीनं आम्हाला मुलाखत देण्याकरता वेळ काढला, त्याबद्दल मी तिची ऋणी आहे! मुलाखतीत राहिलेला एक प्रश्न मी तिला शेवटी, शेवटच्या दिवशी हळूच विचारलाच, “तुझं लग्न ठरवून की प्रेमविवाह?” त्यावर ती लाजून चूर झाली अन “प्रेमविवाह” अस म्हणत स्वतःच्या घरात अक्षरशः पळून गेली!
सॅलीकडून मिळालेली माहिती अशी:
गावकरी गावचे स्वच्छतेचे नियम कसोशीने पाळतात. समजा स्वच्छता मोहिमेत भाग नाहीच घेतला तर? गावाचे नियम मोडल्याबद्दल गावप्रमुखाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाते! तिने सांगितले, “माझ्या आजीने अन आईने गावाचे नियम पाळण्याचे मला लहानपणापासून धडे दिलेत”. इथली घरे कशी चालतात त्याचे उत्तर तिने असे दिले: “होम स्टे” हे आता उत्पन्नाचे चांगले साधन आहे! याशिवाय शाली अन जेन्सेम बनवणे किंवा बाहेरून आणून विकणे, बांबूच्या आकर्षक वस्तू बनवणे अन त्या पर्यटकांना विकणे. इथली प्रमुख पिके म्हणजे तांदूळ, सुपारी आणि अननस, संत्री, लीची अन केळी ही फळं! प्रत्येक स्त्री समृद्ध, स्वतःचं घर, जमीन आणि बागा असलेली! कुटुंबानं धान अन फळे स्वतःच पिकवायची. तिथे फळविक्रेतीने ताजे अननस कापून बुंध्याच्या सालीत सर्व्ह केले, ती अप्रतिम चव अजून रेंगाळतेय जिभेवर! याचे कारण “सेंद्रिय शेती”! फळे निर्यात करून पैसे मिळतात, शिवाय पर्यटक “बारो मास” असतातच! (मात्र लॉकडाऊन मध्ये पर्यटन थंडावले होते.)
या गावात सर्वात प्रेक्षणीय काय, तर इथली हिरवाई, हा रंग इथला स्थायी भाव! पानाफुलांनी डवरलेल्या स्वच्छ रस्त्यांवर मनमुराद भटकंती करावी. प्रत्येक घरासमोर रम्य उपवनाचा भास व्हावा असे विविधरंगी पानांनी अन फुलांनी फुललेले ताटवे, घरात लहान मोठ्या वयाची गोबरी मुले! त्यांच्यासाठी पर्यटकांना टाटा करणे अन फोटोसाठी पोझ देणे हे नित्याचेच! मंडळी, हा अख्खा गावाच फोटोजेनिक, कॅमेरा असेल तर हे टिपू की ते टिपू ही भानगडच नाहीय! पण मी असा सल्ला देईन की आधी डोळ्यांच्या कॅमेऱ्याने डोळे भरून ही निसर्गाच्या रंगांची रंगपंचमी बघावी अन मग निर्जीव कॅमेऱ्याकडे प्रस्थान करावे! गावकुसाला एक ओढा आहे (नाला नाही हं!). त्याच्या किनारी फेरफटका मारावा! पाण्यात हुंदडावे पण काहीबाही खाऊन कचरा कुठेही फेकला तर? मला खात्री आहे की, नुकत्याच न्हायलेल्या सौंदर्यवतीसम प्रतीत होणारे हे रम्य स्थान अनुभवल्यावर तिळाइतका देखील कचरा तुम्ही कुठेही टाकणार नाही! इथे एक “balancing rock” हा निसर्गदत्त चमत्कार आहे, फोटो काढावा असा पाषाण! ट्री हाउस, अर्थात झाडावरील घर, स्थानिकांनी उपलब्ध साहित्यातून बांधलेले, तिकीट काढून बघायचं, बांबूनिर्मित वळणदार वळणाच्या वर वर जाणाऱ्या आवृत्त्या संपल्या की झाडावरील घरात जाऊन आपण किती वर आहोत याचा एहसास होतो! खालच्या अन घरातल्या परिसराचे फोटो हवेतच! शहरात घरांसाठी जागा नसेल तर हा उपाय विचारणीय, मात्र शहरात तशी झाडे आहेत का हो? इथे तीन चर्च आहेत. त्यापैकी एक “चर्च ऑफ द एपिफॅनी”, सुंदर रचना आणि बांधकाम, तसेच पानाफुलांनी बहरलेला संपूर्ण स्वच्छ परिसर. आतून बघायची संधी मिळाली नाही, कारण चर्च ठराविक दिवशी अन ठराविक वेळी उघडते!
मित्रांनो, जर तुम्हाला टीव्ही, इंटरनेट, व्हाट्सअँप अन चॅटची सवय असेल (मला आहे), तर इथे येऊन ती मोडावी लागणार! आम्ही या गावात होतो तेव्हा ९०% वेळा गावची वीज गावाला गेलेली होती! एकला सोलर-दिवा सोडून बाकी दिवे नाहीत, गिझर नाही, नेटवर्क नाही, सॅलीकडे टीव्ही नाही! आधी मला वाटले, आता जगायचे कसे? पण हा अनुभव अनोखाच होता! निसर्गाच्या कुशीतली एक अद्भुत अविस्मरणीय अन अनवट अनुभूती! माझ्या सुदैवाने घडलेला डिव्हाईन, डिजिटल डिटॉक्स!
प्रिय वाचकहो, मॉलीन्नोन्गची महती अजून गायची आहे, तर आतापुरते खुबलेई! (Khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)
डॉ. मीना श्रीवास्तव
टीप – लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो (एखादा अपवाद वगळून)आणि वीडियो व्यक्तिगत आहेत!
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈