डाॅ. मीना श्रीवास्तव
मी प्रवासिनी
☆ मनोवेधक मेघालय…भाग -६ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆
(मावफ्लांगचे पवित्र जंगल)
प्रिय वाचकांनो,
आपल्याला दर वेळी प्रमाणे आजही कुमनो! (मेघालयच्या खासी या खास भाषेत नमस्कार, हॅलो!)
फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)
मागील भागात मी वायदा केला होता की, आपल्याला मावफ्लांग (Mawphlang) च्या सेक्रेड ग्रोव्हज/ सेक्रेड वूड्स/ सेक्रेड फॉरेस्ट्स मध्ये जायचंय! चला तर मग तयार व्हा एका रोमांचक आणि अद्भुत प्रवासाकरता! सेक्रेड ग्रोव्हज/ सेक्रेड वूड्स/ सेक्रेड फॉरेस्ट्स अर्थात पवित्र जंगले किंवा उपवने यांना कांही विशिष्ट संस्कृतीत विशेष धार्मिक महत्व आहे. जगभरातील विविध संस्कृतींमध्ये ही पवित्र उपवने त्यांच्या वैशिष्ट्यांसह अस्तित्वात आहेत. ती जरी आपल्याला सुंदर लॅण्डस्केप्स (नुसती बघण्यापुरती किंवा चित्रे किंवा फोटो काढण्यापुरती प्रेक्षणीय स्थळे) म्हणून दिसत असलीत तरी कांही पंथी किंवा धर्मियांसाठीं ती त्यापलीकडे जाऊन अत्यंत महत्वाची पवित्र स्थळे आहेत. त्यातल्या त्यात काही विशिष्ट वृक्ष तर अत्यंत पवित्र मानले जातात. या समुदायाचे लोक ही वनराजी प्राणापलीकडे जपतात. याच जपणुकीमुळे येथील वृक्षवल्ली हजारो वर्षे जुनी असूनही सुरक्षित आहेत.
या पर्वतीय राज्याच्या वनराजीतच काही महत्वाच्या सांस्कृतिक परंपरांचा उगम आहे. खासी समाजाला अतिप्रिय अश्या या मावफ्लांगच्या पवित्र जंगलाने प्राचीन गुह्य इतिहास, गूढरम्य दंतकथा आणि विद्या आपल्या विस्तीर्ण हिरवाईत दडवून ठेवल्या आहेत. इथल्या उंचनिंच नैसर्गिक पायऱ्या अन पायवाटा, लहान थोर वृक्षसमूह, त्यांना लगडलेल्या लता, चित्रविचित्र पुष्पभार, झाडांवर आणि त्याखाली पसरलेली फळे, विस्तीर्ण पर्णराशी, जागोजागी विखुरलेले पाषाण (एकाश्म/ मोनोलिथ), मध्येच विविध सप्तकातील कूजनाने वनाची शांतता भंग करणारे पक्षी, बागडणारी रंगीबेरंगी फुलपाखरे, यत्र तत्र अन सर्वत्र प्रवाही जलाचे ओहोळ, सारे कसे गूढ रम्य कादंबरीतील पात्रांसारखे, जणू प्रत्येकाला “मला काही सांगायचंय!” हेच वाटत असावं! येथील जमातींचे सकळ आयुष्यच मुळी या वनराजींशी जुळलेले, त्यांचे रक्षणकर्ते आणि त्यांना भयभीत करणारे जंगल एकच!
शिलॉंग शहरापासून केवळ २६ किलोमीटर दूर असलेले हे मावफ्लांगचं सॅक्रेड ग्रूव्ह! आपली उपवनाची/जंगलाची कल्पना म्हणजे चांगल्या दगडी, काँक्रीट, संगमरवरी पायऱ्या, रस्ते, बसायला बेंच, कृत्रिम कारंजी, तरणतलाव, उपहारगृह, इत्यादी इत्यादी! मंडळी, इथं यातलं कांही कांही नाही. जंगल जसंच्या तसं! खालचा पालापाचोळा सुद्धा अस्पर्श, इथल्या कुठल्याही गोष्टीला माणसाचा स्पर्श वर्जित! अर्थात आपण रान तुडवतांना नाइलाजाने होतो तितकाच! मैत्रांनो, हेच ते अनामिक, अभूतपूर्व, अप्रतिम, अलौकिक, अनुपम, अनाहत, अनवट अन अस्पर्शित सौंदर्य! आम्हाला आमच्या गाईडने (वय वर्षे २१) या जंगलाचा हृदयाला भिडणारा विलक्षण असा संदेश सांगितला, “इथे या, डोळे भरून इथली निसर्गाची लयलूट बघा (कांहीही लुटून मात्र नेऊ नका), इथून नेणार असाल तर इथल्या सौंदर्याच्या स्मृती न्या अन जतन करा, हृदयात किंवा फार तर फार कॅमेऱ्यात! इथून एक वाळलेले पान तर सोडाच, काडी देखील उचलून नेऊ नका! मित्रांनो, ही अशी सक्ती असल्यावर जंगलतोड हा शब्द आपण स्वप्नांत देखील आठवणार नाही! अशी झाडांची जपणूक आपण करतो का? जमेल तिथे अन जमेल तशी पाने-फुले ओरबाडून घेणे आणि झाडांना इजा पोचवणे, हा उद्योग इतका कॉमन आहे की काय बोलावे! (आपल्याकरता प्रत्येक महिना श्रावणच असतो, पूजेकरिता पाने अन फुले नकोत का!!!)
सेक्रेड ग्रोव्हस मध्ये याला वाव नाही, उलट “असे कराल तर मृत्यू होतो, पासून तर कांही बाही होते”, हीच शिकवण या जमातीच्या दर पिढीला दिली गेलीय. इथं स्थानिक एक साधा नियम पाळतात (आपणही पाळायचा) “या जंगलातून कांहीही बाहेर जात नाही.” जर तुम्ही मृत लाकूड किंवा मृत पान चोरले तर काय होईल असा तुम्हाला प्रश्न पडेल. दंतकथा सांगतात “जो कोणी या जंगलातून काहीही घेऊन जाण्याचे धाडस करतो, तो गूढपणे आजारी पडतो. कधी कधी तर हे प्राणांवर देखील बेतते”. म्हणूनच तर इथे काही झाडे १००० वर्षांच्यावर जगताहेत, नैसर्गिक ऊर्जा, पाणी, खत, सर्व काही आहे त्यांच्याजवळ, सुदैवाने एकच गोष्ट नाही, माणसाची बुभुक्षित अन क्रूर नजर!!! ही वनसंपदा धार्मिक कारणांनी का होईना, राखली आहे इथल्या तिन्ही जमातींनी! इथे जैवविविधता उत्तमरित्या जतन केलेली आहे. वनस्पती आणि झाडांच्या प्रजातींच्या विस्तृत श्रेणी (यात दुर्मिळ प्रजाती सुद्धा आल्या बरं का!) फोफावल्या आहेत, निर्भय होऊन जगताहेत. मंत्रमुग्ध करणारी ही हिरवीकंच पर्जन्यवनराई इतकी कशी बहरते? याला कारण हिचे उष्णकटिबंधीय उगमस्थान! इथे वारा अन पाऊस फोफावतो, आनंदाचं उधाण येऊन! सोसाट्याचा वारा अन “घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा!” हे होणारच. (गाणं टाकलय शेवटी!)
प्रिय मैत्रांनो, इथला टाइम पाळणे अत्यावश्यक (सकाळी ९ ते संध्याकाळी ४.३०). उशीरा जंगलात जाणाऱ्यास आणि जंगलातून उशीरा बाहेर येणाऱ्यास माफी नाही! आपण या जंगलाला सरावलेलो नाही, त्यामुळे भटकणे टाळा. बघण्यासारखे बरेच काही असूनही तुमच्या डोळ्यांना ते दिसणारच नाही याची खात्री बाळगा. इथल्याच प्रशिक्षित स्थानिक वाटाड्या/ गाईडला पर्याय नाही. तुमचा हा गाईड इथली समृद्ध वनसंपदाच दाखवणार नाही तर तो इथला वनरक्षक आणि सांस्कृतिक वारसदार आहे, हे लक्ष्यात असू द्या! हा पथप्रदर्शक रोमहर्षक तऱ्हेनं या जंगलातले गूढ उलगडून दाखवेल, तसेच खासी जमातींच्या धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेचा अन या जंगलाचा संबंध तपशीलासह सांगेल! मंडळी, तो इथले पानंपान बघता बघताच मोठा झालाय! इथल्या दंतकथा त्याच्याच प्रभावी निवेदनातून ऐकाव्या मित्रांनो. गंमत म्हणजे सर्व गाईड्सची जबानी सारखीच (समान प्रशिक्षण!), आमचा तरुण गाईड तर अस्खलित इंग्रजी बोलत होता. त्यानंच आम्हाला खासी भाषेची जुजबी माहिती दिली.
आता या वनसंपदेतील नेत्रदीपक व विस्मयकारक गोष्टी बघू या:
नयनरम्य जंगलातील पायवाट (फॉरेस्ट ट्रेल)
इथल्या या वेड्यावाकड्या वाटा पर्यटकांना अगम्य वाटाव्यात अशाच आहेत! इथे फिरतांना वृक्ष वल्लींच्या आपसूक सजलेल्या मंडपातून किंवा छताखालून जातच जावं. हे सदाहरित घनतिमिर बन आपल्यावर मायेची पाखर घालत सूर्यकिरणांचा स्पर्श सुद्धा घडू देत नाही! इथली पानगळीची विलक्षण नक्षी हिरव्या अन हळदी रंगांनी सजलेली! हे निबिड वनवैभव कायम वाऱ्याच्या संगीतावर दोलायमान होऊन सळसळत असतं! या पायवाटा आपल्याला घेऊन जातात इथल्या सांस्कृतिक परंपरेच्या जगात!
वर्षा ऋतूतील मुसळधार पाऊस असेल तर हा प्रवास कैकपटीने दुस्तर! याच सुगम्य वाटा आता निसरड्या अन शेवाळल्या होतात! (आमचे अनुभवाचे बोल!) आम्ही निम्म्याहून अधिक वन पाहिले, पण नंतर पायवाट सुद्धा चालणे कठीण झाले. एक नदी ओलांडून मगच पुढे जावे लागेल, शिवाय परतीची वाट नाही, अशी माहिती गाईडने दिली अन आम्ही माघारी फिरलो. प्रिय वाचकांनो, सप्टेंबर-ऑक्टोबर हे महिने या परिसराला भेट द्यायला उत्तम!
एकाश्म/ मोनोलिथ्स
या वनाचे गूढ वर्धित करणाऱ्या अनाकलनीय स्थानांवर एकाश्म/मोनोलिथ्स (monoliths) आहेत. मोनोलिथ म्हणजे एक उभा विशाल पाषाण किंवा एकाश्म/ एकल शिळा! गाईडने सांगितले की, एकाश्म ही खासी लोकांच्या पूजेची ठिकाणे आहेत. यांचा वापर प्राण्यांचा बळी देण्यासाठी करतात. आपण ज्या सहजतेने मंदिरात जाऊन घंटा वाजवतो, त्याच प्रकारे हे लोक प्राण्यांचा बळी देतात. इथे एक मोनोलिथ फेस्टिव्हल (उत्सव) देखील असते, आदिवासींचा सांस्कृतिक वारसा आणि वैभव बघायची ही उत्तम संधी! या वेळी हे संपूर्ण जंगल जिवंत होऊन स्वतःची कथाच जणू विशद करत असावे!
खासी हेरिटेज गाव
गावकऱ्यांच्या हस्तकलेचे दर्शन आणि आदिवासी झोपड्या असलेले हे गाव प्रदर्शनासाठी तयार केले जात आहे! याचे काम विविध स्तरावर सुरु आहे असे स्थानिकांनी सांगितले.
लबासा, जंगलाची देवता
लबासा, ही आहे शक्तिशाली देवता, याच जंगलात संचार करणारी, या प्रदेशातील सर्व लोकांची तारणहार अन श्रद्धास्थान! म्हणूनच बघा ना, तिच्या कृपेने गावकऱ्यांची संपूर्ण उपजीविका जंगलाभोवतीच फिरत आहे. रोग असो, नशिबाचे फेरे असो किंवा दैनंदिन समस्या असोत, ही देवता त्यांच्या विश्वासाचा प्रमुख आधारवड आहे. आदिवासी लोकांचे रक्षण करण्यासाठी ही देवता वाघ किंवा बिबट्याचे रूप धारण करू शकते अशी आख्यायिका आहे. देवतेला प्रसन्न करण्यासाठी कोंबडा किंवा बकऱ्यांचा बळी दिल्या जातो. गावकरी त्यांच्या मृतांना या वनातच जाळतात.
पुढील भागात सफर करू या एका अत्यंत दुष्कर ट्रेलची!
तर आतापुरते खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)
टीप – लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो आणि वीडियो (काही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!
© डॉ. मीना श्रीवास्तव
ठाणे
मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈