सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक २७ – भाग २ ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
आसामी सिल्कचा, पदर भरजरीचा
ब्रह्मपुत्रेवरील साडेतीन किलोमीटर लांबीचा पूल आपल्या भारतीय अभियंत्यांनी बांधलेला आहे. आता असे आणखी दोन पूल ब्रह्मपुत्रेवर बांधले आहेत. ब्रह्मपुत्रा तिबेटमध्ये मानस सरोवराजवळ उगम पावते. नंतर विशाल पर्वतराजीतून वाहत आसामच्या खोऱ्यात प्रवेश करते. तिला दिनांग,सेसिरी,तिस्ता अशा उपनद्या येऊन मिळतात. प्रवाहाची अनेक वळणे बदलत ती बांगलादेशातून बंगालच्या उपसागराला मिळते .जलवाहतुकीचे हे एक उत्तम साधन आहे. अशी ही आसामची जीवनवाहिनी कधी कधी आसामचे अश्रू सुद्धा होते. प्रवाह एवढा प्रचंड आणि वेगवान की तिला ब्रह्मपुत्रा नद (नदी नव्हे ) असेच संबोधले जाते. तिचा प्रवाह सतत बदलतो. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतो. सुपीक जमीन पाण्याखाली जाते. माणसे, जनावरे वाहून जाणे हा वार्षिक शिरस्ता आहे. ब्रह्मपुत्राकाठच्या एका गणपती मंदिरात दर्शन घेऊन नदीकाठी गेलो. संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात ब्रह्मपुत्रेच्या विस्तीर्ण, गहन गंभीर पात्रावर भरजरी सोनेरी पदर पसरल्यासारखे वाटत होते.
गुवाहाटीमध्ये नीलांचल डोंगरावरील कामाख्या मंदिर हे देवीचे- आदिशक्तीचे- शक्तिपीठ मानले जाते. देऊळ खूप प्राचीन आहे. देवळात खूप काळोख असल्याने व बॅटरीसुद्धा लावायला परवानगी नसल्याने फार काही बघता आले नाही. अजूनही इथे बकरा, रेडा यांचे बळी दिले जातात.
ईशान्य भारतात दगडी कोळशापासून युरेनियमपर्यंत सर्व खनिजे विपुल प्रमाणात आहेत. दिग्बोई इथे तेल शुद्धीकरण रिफायनरी आहे. चहाच्या उत्पादनात जगात पहिला नंबर आहे. घनदाट जंगले, दुर्मिळ वनस्पती,विविध प्राणी, पक्षी आहेत. एक शिंगी गेंडा ही आसामची खासियत आहे. या शिंगात हाड नसते. गेंड्याचे शिंग औषधी असते या समजुतीने त्याची अवैध शिकार केली जाते. इथले मलबेरी, मुंगा, टसर हे सिल्क प्रसिद्ध आहे.
या संपूर्ण प्रदेशाला हिरव्या रंगाच्या नाना छटा असलेले अक्षय सौंदर्य लाभले आहे. या हिरव्या हिरव्या सिल्कला ब्रह्मपुत्रेचा झळाळता सोनेरी पदर आहे पण— पण इथला अस्वस्थपणा, अशांतपणा मध्ये मध्ये उफाळून येतो. हे गिरीजन अतिशय संवेदनशील आहेत. आपापसातही त्यांचे रक्तरंजित खटके उडत असतात. शिवाय स्वातंत्र्योत्तर या भागाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे शल्य त्यांच्या मनात आहे. या ईशान्य भारताच्या सीमांना भूतान, तिबेट, बांगलादेश, ब्रह्मदेश यांच्या सीमा खेटून आहेत. १९६२ च्या युद्धात चिन्यांनी तेजापूर घेतले होते.
या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, रामकृष्ण मिशन यांचे अखंड यज्ञासारखे काम चालू आहे. तिथल्या लहान मुला- मुलींची महाराष्ट्रातल्या शाळातून शिक्षणाची, वसतिगृहाची सोय करण्यात येते. आता तिथे कॉम्प्युटरवर आधारित उद्योगांचे, आयटी इंडस्ट्रीजची उभारणी होत आहे.
परत येताना गुवाहाटी- मुंबई असे विमान संध्याकाळी चारचे होते. आमच्या तेथील रिझर्व बँकेतल्या सहकार्यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे आम्ही विमानात उजव्या बाजूच्या खिडक्या मागून घेतल्या होत्या. विमानाने आकाशात झेप घेतल्यावर पाचच मिनिटात उजवीकडे एव्हरेस्टच्या बर्फाच्छादित रांगा सूर्यकिरण पडल्याने सोन्यासारख्या चमकताना दिसल्या. नकळत डोळ्यात पाणी आले. हात जोडले गेले. अस्वस्थ ईशान्य भारताबद्दलच्या विचारांना आशेची सोनेरी किनार लाभली.
भाग ३ व आसाम समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈