सौ राधिका भांडारकर

☆ “चला बालीला…” – भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर 

२९/११/२३

तसं पाहिलं तर आम्ही सारेच ८० च्या उंबरठ्यावरचे. आयुष्यात या आधीही आम्ही अनेक प्रवास केले होते, अनेक पर्यटन स्थळांना धावून धावून, अत्यंत उत्सुकतेने, जग पाहण्याच्या दृष्टीने भेटी दिल्या होत्या.  पण कालचा सूर्यास्त पाहताना जाणवत होती ती आमच्या आयुष्यातील संध्याकाळ. 

या सहलीला येण्याचा एकच हेतू होता निवांतपणा  अनुभवावा. पृथ्वीवरच्या एका वेगळ्याच परिसराचा, तिथल्या निसर्गाचा, मानवी जीवनाचा, आनंददायी, निराळा अनुभव घ्यायचा होता आम्हाला.  मनातली हिरवळ जपत, वयाला न नाकारता निसर्ग आणि निराळ्या संस्कृतीत वावरण्याचा एक मजेदार अनुभव घेत स्वतःला रिफ्रेश्ड, तजेलदार करायचे होते. आज भी हम जवान है असे निदान एकमेकांना बजावायचं होतं.  आलेल्या अनेक पर्यटकांमध्ये ९०% माणसं तरुण वर्गातली असली तरी दहा टक्के आमच्यासारखेच तरुण तुर्क म्हातारे अर्क होतेच की! आणि ही सारी तरुण माणसं आमच्याबरोबर कौतुकाने सेल्फी काढत होते, म्हणत होते,” आमचंही म्हातारपण असच तुमच्यासारखं टवटवीत असावं”

तेव्हा या टवटवीत सहा जणांचा आजचा  पहिला स्थलदर्शनाचा दिवस.

सकाळीच मस्त complimentary नाश्ता घेतला. बालिअन पद्धतीचा नाश्ता होता.  वेगळ्या चवीची पुडिंग्ज, खीर, काही भाज्या, सॅलड्स, ब्रेड, भात, फळे,, फळांचा रस वगैरे भरपूर होते. नाश्ता छान आरोग्यदायी आणि चविष्ट होतात आम्हाला फिरायला घेऊन जाण्यासाठी दारातच टॅक्सी उभी होती.  जवळजवळ दिवसभराची आठ तासांची दूर होती.  खर्च रुपये तेरा लाख  इंडोनेशियन रुपीज.  प्रत्येक वेळी या लाखांची गोष्ट अनुभवत होतो आम्ही.  पण हे इंडियन नसून इंडोनेशियन रुपीज आहेत या विचाराने भानावरही येत होतो.

आमचा पहिला थांबा होता नुसा डुआ  बीच. अतिशय विस्तीर्ण असा रम्य सभोवताल.   तशी फारशी गर्दी जाणवत नव्हती.   आम्ही एका शटलने किनाऱ्यापर्यंत आलो.  लांबलचक पांढऱ्या वाळूचा किनारा, त्याला लागूनच नारळाची, तसेच नारळ जातीतल्या वृक्षांची रांग, काही पपनसाचे वृक्ष ही तिथे आम्ही पाहिले.  किनाऱ्याचे जणू काही ही वृक्षवल्ली संरक्षणाच करत होती.  समुद्राचे पाणी निळसर होते. पर्यटकांसाठी हे एक बाली इंडोनेशिया येथील अत्यंत आकर्षक स्थळ आहे. देशोदेशीचे पर्यटक येथे विखुरले होते आणि समोर पसरलेल्या महासागराच्या दर्शनाने थक्क होत होते.  माझ्या मनात नेहमी एक प्रश्न येतो की जगातला कुठलाही सागर हा त्या त्या वेळी अथवा प्रत्येक वेळी सौंदर्यातली विविधता घेऊनच आपल्यासमोर का येतो?  प्रत्येक किनारा आपण तितक्याच नवलाईने का पाहतो?  कदाचित याचं एकच उत्तर असेल हीच त्या किमयागाराची किमया!

इथे आसपास अनेक रेस्टॉरंट्सही  होती. अनेक साहसी सागरी क्रीडा होत्या. सांगितिक कार्यक्रमही होते. दरवर्षी मार्च महिन्यात येथे जाॅयलँड फेस्टिवल साजरा केला जातो. जी20 ची परिषद इथे भरली होती.  अनेक सांगितिक क्षेत्रातल्या कलाकारांसाठी नुसा डुवा हे एक उत्तम व्यासपीठ आहे. 

जितकं निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवता येईल तितकं साठवण्याचा आम्ही अक्षरशः प्रयत्न करत होतो. त्या विस्तीर्ण परिसरात असलेली राम, सीता, लक्ष्मण यांची सुरेख शिल्पं आमच्या कॅमेराला आकर्षित करीत होती. उन्हाचा तडका जसा जाणवत होता तसाच समुद्रावरून वाहत येणारा वाराही मनाला सुखावत होता.

बाली येथे दरवर्षी जवळजवळ देशोदेशीचे पाच मिलियन पर्यटक भेट देतात.  इथल्या अनेक आकर्षणांपैकी एक प्रमुख आकर्षण म्हणजे गरुड विष्णू कल्चरल पार्क.(GWK).

या येथे गरुडावर बसलेल्या विष्णूचा ७५ मीटर उंच असा अत्यंत कलात्मक वास्तुकलेच्या आणि शिल्पकलेच्या दृष्टीने ही थक्क करणारा असा पुतळा आहे. तो एका सिमेंटच्या उंच पायावर बसवलेला आहे आणि हे सगळं बांधकाम पुन्हा एका तीन मजली इमारतीवर लॉन्च केलेलं आहे. त्यामुळे या पुतळ्याची संपूर्ण उंची जवळजवळ 121 मीटर होते. जगातले हे तिसऱ्या क्रमांकाचे उंच असे शिल्प गणले जाते. बालीमध्ये फिरत असताना ते अनेक ठिकाणाहून दिसते. आमचं विमान डेन्सपार विमानतळावर उतरत असतानाही आम्हाला सर्वप्रथम मोकळ्या आकाशात या गरुड विष्णूचे दर्शन झाले आणि आम्ही मनोमन आनंदलो.

बालीमध्ये हिंदू धर्माचे अधिक वर्चस्व आहे. विष्णू ही संरक्षक देवता मानली जाते.  या पुतळ्यातील विष्णूच्या हातातही कमलपुष्प, शंख आणि राजदंड आहे. बाली येथील उंगासान  बारुंग येथे एका उंच डोंगरावर या संपूर्ण शिल्पाची उभारणी केलेली आहे. जणू काही गरुडावरचा हा विष्णू उंचावरून बाली या बेटावर आपली संरक्षक नजर ठेवून आहे.

न्याओमन नुआरर्ता या वास्तुशास्त्रज्ञाने याची रचना केलेली आहे आणि या वास्तूचे उद्घाटन सप्टेंबर २०१८साली झाले आहे.  म्हणजे बाली येथील हे पर्यटन स्थळ तसे नवीन, अलीकडचेच आहे. प्रवेशासाठी येथे प्रत्येकी ५० हजार इंडोनेशियन रुपीज ची दोन तिकिटे काढावी लागतात .म्हणजे आम्हाला सहा जणांसाठी सहा लाख IDR लागले. पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी येथे विनामूल्य शटल सर्विस आहे. हे मात्र आमच्यासाठी दिलासा देणारे होते. परिसर खूपच भव्य आणि विस्तीर्ण आहे आणि जागोजागी रामायणातील, पुराणातील कथा सांगणारी विशेष व्यक्तींची अतिशय दिलखेचक आणि उंच मोठी शिल्पे उभारलेली आहेत.  त्यात अगदी रावण, शूर्पणखा पण आहेत. ऋषि कश्यप, विनिता यांचे पुतळे आहेत. गरुडाची आई विनिता म्हणूनच गरुडाला वैनतेय असेही म्हणतात.

गरुडावर आरुढ झालेल्या विष्णूची एक कथा येथे सांगतात.  गरुडाला त्याच्या आईला गुलामगिरीतून मुक्त करायचे होते आणि त्यासाठी त्याला समुद्रमंथनातून निर्माण झालेले अमृत हवे होते.

“मी तुला माझ्या पंखावर घेतो आणि तू मला ते अमृत दे” असा गरुड आणि विष्णु मध्ये करार होतो.  विष्णूचे वाहन गरुड असल्या मागची ही  एक दंतकथा आहे.

पक्षी श्रेष्ठ गरुडाचे पसरलेले पंख आणि त्यावरचा रुबाबदार सुंदर विष्णू पाहताना अक्षरशः डोळ्याचे पारणे फिटते.  हे शिल्प कॉपर, ब्रास आणि सिमेंटच्या मिश्रणातूनच बनवलेले आहे. पण पाहताना मात्र ते दगडी असल्याचा भास होतो. १९९३ ला या बांधकामाची सुरुवात झाली आणि २०१८ साली त्याचे उद्घाटन झाले. २१७ फूट रुंद आणि चारशे फूट उंच असलेलं हे भव्य सौंदर्य पहायला बालीत आलेले देशोदेशीचे पर्यटक गर्दी करतात. थक्क होतात, तृप्त होतात.

शिवाय इथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम जसे की संगीत, नृत्य, बालीअन सादर करतात. लोक परंपरा जपण्याच्या भावनेतून  झालेले हे कार्यक्रम मनोरंजक वाटतात. असा आनंददायी  अनुभव घेत, तीस हजाराचं(IDR) आईस्क्रीम खाऊन आणि बालीनीज कन्ये बरोबर छायाचित्र खेचून आम्ही तेथून तृप्त मनाने परतलो.  घेता किती घेशील आणि सांगू किती सांगशील अशीच आमची अवस्था झाली होती.

क्रमश: भाग दुसरा  

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments