डाॅ. मीना श्रीवास्तव

? मी प्रवासिनी ?

☆ मनोवेधक  मेघालय…भाग – ९ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(षोडशी शिलॉन्ग)

प्रिय वाचकांनो,

आपल्याला दर वेळी प्रमाणे आजही लवून कुमनो! (मेघालयच्या खास खासी भाषेत नमस्कार, हॅलो!)

फी लॉन्ग कुमनो! (कसे आहात आपण?)

मंडळी, मागील वेळेस आपण शिलॉन्गची सफर करायला सुरुवात केली. आता शिलॉन्गमधील अजून कांही नयनरम्य स्थळांना भेट देऊ या. चला तर मग भरपूर चालायची तयारी करून! 

एलिफेंट धबधबा (Elephant falls)

शिलॉन्गच्या उत्तर भागातील एक अन्य सर्वांगसुंदर असे ठिकाण म्हणजे पर्यटकांनी बघितलेच पाहिजे असे एलिफेंट धबधबा (एलिफेंट फॉल्स)! या जलप्रपाताला खेटून हत्तीच्या आकारासारखा एक विस्तीर्ण खडक होता, म्हणून ब्रिटिशांनी याचे नांव एलिफेंट फॉल्स असे ठेवले. मात्र आता या निर्झराजवळील तो कुंजरासम भलामोठा खडक नाही, कारण तो १८९७ मधील भूकंपात नष्ट झाला. मात्र या निर्झराचे बारसे ज्या नांवाने झालय तेच नांव आजही प्रचलित आहे! शहराच्या मध्यापासून ११ किलोमीटर अंतरावर असलेला हा त्रिस्तरीय धबधबा (हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये पडतो) बघायला वर्षाऋतूत जावे, फेसाळणाऱ्या शत शत दुग्ध धारांच्या लयबद्ध सप्तसुरांनी अवघा परिसर निनादून टाकणाऱ्या या निर्झराचे प्राकृतिक रमणीय दर्शन अतिशय मोहून टाकणारे. एकदा बघितल्यावर दृष्टी खिळवून टाकणारे. पावसाळ्यात जात असाल तर पायऱ्यांची उतरण काळजीपूर्वक सांभाळून एक स्तर बघा, डोळ्यात साठवा, खाली उतरा, दुसरा स्तर बघा, परत खाली पायऱ्यांची उतरंड अन सर्वात खोल असा तिसरा स्तर पाण्याच्या प्रवाहात प्रवाहित होतांना बघा. सर्वात खाली या मनोहरी अन रमणीय नीलजलप्रपाताचे एकत्रित जल एका छोट्याशा तलावात साठते. तलावाभोवती हिरवी वनराई सतत सोबत असतेच! मित्रांनो, पुढचे कार्य त्रासदायक, कारण आता पायऱ्या चढायच्या आहेत! केवळ निर्झराचं दर्शन नव्हे तर त्याला अनायास कवेत घेणाऱ्या सदाहरित हिरवाईचे बाहुपाश आहेतच! खळाळणारा हा जलप्रपात अन त्याला लगटून सोबतीला हिरवेगार डोंगर! हे नेत्रदीपक अन ‘पिक्चर परफेक्ट’ दृश्य नेत्रात अन कॅमेऱ्यात कैद करून ठेवा! असे हे अभूतपूर्व दृश्य बघण्यासाठी शिलॉन्गमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात यात नवल ते काय!

डॉन बॉस्को संग्रहालय (Don Bosco Museum)

हे संग्रहालय शिलॉन्ग शहराच्या मध्यबिंदू पासून ५ किलोमीटर अंतरावर सेक्रेड हार्ट चर्चच्या आवारात आहे. कलासक्त, इतिहास प्रेमी, नाविन्याची वाट चोखाळणाऱ्या, मेघालयच्या संस्कृतीविषयी जाणून घेण्यास उत्सुक असणाऱ्या अशा सर्व प्रकारच्या आबालवृद्ध पर्यटकांचे या वास्तूत प्रेमाने स्वागत होते. आरंभीच एक पथदर्शक आपल्याला या संग्रहालयाच्या ७ मजल्यात स्थित विविध दालनांची थोडक्यात माहिती देतो. मात्र बाहेर उभे राहून या भव्य-दिव्य संग्रहालयाची पुसटशी कल्पना देखील येत नाही. या विशाल ७ मजली इमारतीत सतरा वेगवेगळ्या नयनरम्य गॅलरी आहेत! त्यांत काय नाही ते विचारा! कलाभवन (आर्ट गॅलरी), हस्तकला, कलावस्तू, पोशाख, दागिने आणि ईशान्य भारतातील विविध जमातींनी वापरलेली शस्त्रे यांचा विस्तृत संग्रह इथे खच्चून भरलेला आहे. संपूर्ण ईशान्य भारताच्या विहंगम दृश्यांची पर्वणी एकाच ठिकाणी साधून देणारे दर्शनीय असे हे संग्रहालय!

इथे इतके काही बघण्यासारखे असल्याने पर्यटकांचे संपूर्ण समाधान होणे जरा कठीणच! हे सर्व बघण्याकरता एक दिवस देखील कमी पडणार! किती म्हणून नजरेत साठवावे अन फोटो तरी किती काढावेत! “काही बघायचे राहून गेले”, अशी प्रत्येक मजल्यावर आपली अवस्था होते. म्हणूनच आपल्याकडे वेळ कमी असल्यास, पत्रकात बघून आपल्याला आवडतील ते मजले चोखंदळपणे निवडावेत अन ते समाधान होईपर्यंत शांतपणे बघावेत. मी माझ्या आवडीनुसार आर्ट गॅलरीत मनसोक्त रमले! या इमारतीचा सर्वात उत्कंठावर्धक बिंदू अर्थात सर्वात वरचा मजला, “स्काय वॉक”. आम्ही गेलो तेव्हा नुकताच पाऊस पडल्याने मार्ग जरा निसरडा होता, गोल घुमटाभोवती फिरत शिलॉन्गचे मनमोहक दर्शन घ्यायचे, इथे हा चरम मनोज्ञ अनुभव घ्यायलाच हवा, काय बघायचे ते त्या त्या पॉईंट वर लिहिले आहेच, शिवाय फोटो काढणे आलेच, पण सेल्फी काढतांना जपून बरं का मंडळी! चौथ्या मजल्यावर एक छानसे कॅफे आहे! याच्याच बाजूला ईशान्य भारताचं बहारदार दर्शन घडवणारी चित्रफीत एका छोट्या चित्रपट थिएटर मध्ये दाखवल्या जाते, ती आवर्जून बघावी अशीच आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर, हे भव्य दिव्य संग्रहालय ईशान्य भारताची सांस्कृतिक संपन्नता सांगणारे रेखीव चित्र-दालनच समजा ना!              

कॅथेड्रल ऑफ मेरी हेल्प ऑफ ख्रिश्चनस

शिलॉन्ग येथील हे चर्च कॅथोलिक आर्कडिओसीसचे कॅथेड्रल चर्च आणि शिलॉन्गच्या मेट्रोपॉलिटन आर्चबिशपचे आसन म्हणून प्रसिद्ध आहे. शहराच्या मध्यबिंदू पासून केवळ २ किलोमीटर दूर असलेलं हे चर्च पर्यटकांचे अत्यंत आवडते ठिकाण आहे. सुमारे ५० वर्षांपूर्वी हे बांधलेले कॅथेड्रल शिलॉन्ग आर्कडिओसेसच्या साडेतीन लाखांहून अधिक कॅथलिक लोकांचे मुख्य प्रार्थनास्थळ आहे. त्यात पूर्व खासी हिल्स आणि री-भोई जिल्ह्यांचा समावेश आहे (एकंदर ३५ चर्च). हे चर्च Laitumkhrah या भागात आहे. या चर्चचे नांव येशूच्या Mary the mother यांच्यावरून दिलेले आहे, मदर मेरीच्या पुतळ्यासह ही पांढरी शुभ्र संगमरवरी इमारत अति भव्य आणि शोभिवंत दिसते. या चर्चची खासियत म्हणजे उंच कमानी आणि सुंदर रंगांनी सुशोभित काचेच्या खिडक्या! कॅथेड्रलच्या आत, क्रॉसची काही सुंदर टेराकोटा स्टेशन्स आहेत, जी येशूच्या जीवनातील घटना दर्शवतात. या भागात प्रामुख्याने येशू ख्रिस्ताच्या यातना व मृत्यूविषयक चित्रांचे दर्शन होते, ही चित्रे जर्मनी येथील एका कला संस्थेने तयार केली आहेत. या सोबतच येथे पवित्र शास्त्र आणि संतांच्या जीवनातील दृश्ये चित्रित केली आहेत. फ्रान्स येथे १९४७ ला तयार केलेली अप्रतिम रंगीत तावदाने हे या चर्चचे आणखी एक वैशिष्ट्य! मुख्य वेदीसमोर डावीकडे शिलॉन्गचे पहिले मुख्य बिशप ह्युबर्ट डी’रोसारियो, यांची कबर आहे. कबरीच्या पुढे अन मेरी आणि बाल येशूच्या पुतळ्यासमोर आणखी एक वेदी आहे. येथील पवित्र वातावरणात कांही वेळ शांतपणे बसावेसे वाटते! इथे दर महिन्याला नऊ दिवस विशेष भक्ती केली जाते. एका टेकडीवर उंचावर असलेल्या, त्याच टेकडीवर कोरलेल्या आणि कॅथेड्रलच्या अगदी खाली स्थित असलेल्या ग्रोटो चर्चला देखील आपण भेट देऊ शकतो.

वॉर्ड्’स लेक (Ward’s Lake)

हा सुंदर मानवनिर्मित तलाव शहराच्या मध्यभागी राजभवनजवळच स्थित आहे. “अवती भवती रम्य उपवने” असल्याने या तलावाचा परिसर सदैव लहान मोठ्या माणसांनी फुललेला असतो. इथले एक आकर्षण म्हणजे स्वचलित वल्हवणाऱ्या विविध आकाराच्या नौका. पायांनी आरामात नियंत्रित करणाऱ्या या बोटीतून तलावात विहार करावा, सोबतच हिरव्यागार वृक्षवेली अन पुष्पवाटिकांचे दर्शन घेत घेत नौकानयन करावे. तलावाच्यावर  पार्क आणि बोटॅनिकल गार्डन यांना जोडणारा पूल आहे, त्याखालून नौका पुढे घ्यावी. या तलावात बगळ्यांची माळफुले तरंगत असतात, नौका जवळ आली की ती विखुरतात. सांजवेळी नौकानयन बंद झाल्यावरच संपूर्ण तलावात त्यांचा स्वच्छंद विहार सुरु होतो! एकंदरीत, माणसांवर कुणीही प्राणी अथवा पक्षी विश्वास ठेवत नाहीत हेच खरे! नौकानयनाचा आनंद लुटल्यावर येथील तलावाभोवती असलेल्या उपवनातील पायवाटांवर मस्त फेरफटका मारा किंवा नुसतेच रिलॅक्स करायला देखील मजा येईल. निसर्गरम्य वातावरण आणि कमालीची स्वच्छता, याकरता हा पार्क आवर्जून बघावा असाच आहे!

थंगराज गार्डन

हे विशाल उपवन पण फार नयनरम्य आहे. विविध वृक्षराजींनी अन फुलांच्या ताटव्यांनी बहरलेले हे निसर्ग शोभेने सजलेले ठिकाण खरोखरी बघण्यासारखे आहे. आत शिरताच काय बघावे याचे मार्गदर्शन करणारा फलक दिसतो. गार्डनमध्ये फिरतांना त्या त्या ठिकाणच्या वृक्षवेलींची माहिती देणारे फलक जागोजागी दिसतात. उपवनाला वेढा घालणाऱ्या पायवाटा अन त्यांचे कुंपण, खाली नजर टाकली की शिलॉन्गचे विहंगम रूप दिसते. पायऱ्या चढल्या की विविध रंगांची वृक्षराजी दृष्टीस पडते. इथे फोटो काढण्याकरता बरीच सिनेमास्कोप ठिकाणे आहेत, आत काचेच्या घरात एक सुंदर नर्सरी (ग्रीनहाऊस) आहे!

Shillong city |Capital of Meghalaya | Informative Video

 

PYNNEH LA RITI || by kheinkor composed by apkyrmenskhem

प्रिय मैत्रांनो, आपण शिलॉन्गची अद्भुत सफर अगदी रमतगमत केली. अजून कांही सांगायचे शिल्लक राहिले आहेच. ते आपण पुढील अर्थात अंतिम भागात जाणून घेऊ! आत्तापुरता विराम देते!

खुबलेई! (khublei) म्हणजेच खास खासी भाषेत धन्यवाद!)

टीप-

*लेखात दिलेली माहिती लेखिकेचे अनुभव आणि इंटरनेट वर उपलब्ध माहिती यांच्यावर आधारित आहे. इथले फोटो (कांही अपवाद वगळून) व्यक्तिगत आहेत!

© डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे 

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments