प्रा. भरत खैरकर
🌸 मी प्रवासी 🌸
☆ भूनंदनवन काश्मीर – भाग – १ ☆ प्रा. भरत खैरकर ☆
फिरायची आवड असल्याने दरवर्षी दिवाळी उन्हाळा आला की फॅमिली टूर किंवा कॉलेज टूर काढल्या वाचून करमत नाही. स्वतःचा खर्च आणि स्वतःचा कंट्रोल त्यामुळे कमी पैशात भरपूर मज्जा म्हणजेच इकॉनोमिकल टूर करायची सवय सुरुवातीपासूनच आहे. ह्यावेळी मात्र ठरवूनही नक्की करता येईना कारण डेस्टिनेशन होतं भू नंदनवन काश्मीर!
उगाच रिस्क नको शिवाय तिथलं वातावरण वगैरे वगैरे विचार डोक्यात फिरत होते.. पण नाही असं भिऊन कसं चालेल? येवढे लोक जातातच की!! मग आपल्याला कोण खातंय? शिवाय आपला नचिकेत अजून सहा महिन्यानंतर पाच वर्षाचा होईल. त्यामुळे बच्चेकंपनी त्याचा समावेश होऊन तिकीटही काढावे लागणार! तेव्हा आत्ताच जो काय जोर लावायचा तो लावूया म्हणून टूर बुक केली.
बुक करताना आता फक्त चार पाच जागा शिल्लक आहेत वगैरेसारखे टिपिकल उत्तर मिळाली. तरीही आम्ही जून 7 ते 18 अशी बुकिंग केली. सूचनेनुसार पाच दिवस आधी सर्व सहप्रवाशांची ओळख ठरली मिटींगला फक्त तीनच कपल होते त्यात दोन कपल व्हीआरएस घेतलेले होते. वाटलं दूर वाले आपल्याला खोटं सांगत आहे तेवीस-चोवीस लोकांचा ग्रुप आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आलिया भोगासी असावे सादर आता बोलून काय उपयोग? म्हणून आम्ही सात तारखेची वाट पाहत होतो.
दिनांक सात ला “झेलम” साठी पुणे स्टेशनला आम्ही पोहोचलो आणि सुरू झाला प्रवास. दौंड.. नगर मनमाड.. भोपाळ… इटारसी… आग्रा.. दिल्ली.. लुधियाना आणि जम्मू!
जम्मूचं तीन मजली स्टेशन !आमचा टूर मॅनेजर ज्या बोगीत होता, तिथे सगळे फलाटावर जमले. जमता जमता जमले की 24 जण!! आता मात्र हाय असं वाटायला लागलं !चार तरुण जोडपी होती. कुली मार्फत सामान उचलून सुमो गाडीमध्ये पोचवलं तिथून आम्ही प्रीमियर ह्या रघुनाथमंदिर परिसरात असलेल्या थ्री स्टार हॉटेल कडे गेलो. आमच्यासोबतच सामानही पोहोचलं. दोन दिवसाचा रेल्वे प्रवास… भूक लागलेली होती…
पटापट आंघोळीआधी आवरून किचनकडे पाऊल गेली तर तिथे स्वयंपाक तयार! गरमागरम जेवणानंतर दोन तास विश्रांती व दुपारी रघुनाथ मंदिर दर्शन असा कार्यक्रम ठरला. जमले तर मार्केटिंग सुद्धा! पण सूचनेप्रमाणे पहेलगाम सोडून कुठेही मार्केटिंग करायचे नाही त्यामुळे नुसतं फिरायचं ठरविले.
दुसऱ्या दिवशी जम्मू-श्रीनगर प्रवास होता पेट्रोल डिझेल भाव वाढीमुळे चार दिवस काश्मीर बंद असं कानावर आलं अन् गेले पैसे पाण्यात! म्हणून आतन् आवाज आला. पण क्षणभरच! उद्या आपली बस वेळेवर सकाळी साडेसातला येणार आहे तेव्हा सगळ्यांनी सात वाजता चेक आउट करा असा निरोप आला म्हटलं देव पावला वर निदान 300 किलोमीटर अंतर सरकू श्रीनगर पर्यंत!
दुसऱ्या दिवशीचा प्रवास म्हणजे जन्नतची सफर होती. चिनाब नदीच्या किनाऱ्यावर.. किनार्यावरुन जाणारा तो’ एन एच वन ए ‘हायवे ‘हाय हाय’ नेत होता.
मात्र खाली बघितल्यावर ड्रायव्हरची एक चूकही हाय हाय म्हणायला पुरेशी ठरेल ! असं वाटलं. पण नाही, दुपारी जवाहर टनेल जवळ आम्ही सुखरूप पोहोचलो.
तीन किलोमीटर लांब असलेली जवाहर टनेल जम्मू आणि काश्मीर ला जोडणारा दुवा आहे. बोगदा जाम झाल्यास श्रीनगर चा संपर्क तुटतो. बोगदा पार केल्यावर खर्या अर्थाने व्हॅलीमध्ये आल्याचा आनंद होता लिहिलं होतं “फर्स्ट व्ह्यू ऑफ काश्मीर व्ह्याली!”
… आणि खरच कॅमेरा सरसावला नाही तरच नवल इथून पुढे कॅमेरा कधीच बंद झाला नाही फक्त तो थांबायचा रोल घेण्यासाठी सायंकाळी पावणे आठ वाजता आजवर सिनेमात पाहिलेल्या.. ऐकलेल्या.. “दल झील” च्या किनाऱ्यावर आम्ही होतो. सर्वांत सामान अलग अलग शिका-यामध्ये लोड झालं व सर्वजण निघाले आपापल्या हाऊसबोट कडे! बोटींवर एवढं सुंदर इंटेरियर, नक्षीकाम वा मस्त आहे! आणि इथे राहायचं धमाल होणार! हाऊस बोटीवर तयार होऊन आम्ही जेवणासाठी निघालो रूम लॉक करायचे म्हणून थोडासा धडपडलो पण पण रूम बंद होईना.. शेवटी तसंच सोडून
किचन गाठलं तेव्हा कुणाच्या रूम बंद होत नव्हत्या असं समजलं. लाकडी दाराच्या खाचा झिजून झिजून मोठ्या झाल्याने लॉकिंग मेकॅनिझम बिघडलेलं दिसलं. असो.
सर्विस बॉय ला याबद्दल विचारलं तर तो म्हणतो कसा ” ये काश्मीर है साब यहा पे हिंदुस्तान जैसा कोई चोरी नही करता!” मी एकदम सरकलो ‘काश्मीर है म्हणजे काय ?’ भारतात नाही की काय काश्मीर? माझी देशभक्ती त्याला ऐकवणारच होती. पण म्हटलं त्याचं मत आहे.. जनसामान्यांचे मत जाणून घेऊया! चोरीला गेलं तर काय जाणार आहे. जेवायला गेलो तेव्हा सगळ्यांचा एकच सुर होता आमचं लॉक लागत नाही.
मी म्हटलं चला ” एक से भले 24″ मग समजलं की चोरी वगैरे प्रकार हाऊस बोटीवर नसतो.
दुसऱ्या दिवशी आम्हाला खरं तर गुलमर्गला जायचं होतं पण ‘पेट्रोल डिझेल बंद’ त्यामुळे त्यादिवशी ‘श्रीनगर दर्शन’ ठरलं ! सकाळी शिकारा राईड मध्ये छान शम्मी कपूर स्टाईलने शिका- यात गादीला रेलून गाणं ऐकायचं आणि वल्हवणारा गाईड सांगेल ते ऐकायचं त्याला बोलतं करायचं म्हणून मी गुलाब नबी आजाद, फारूक अब्दुल्ला वगैरे बाबत प्रश्न विचारले तर ‘वो सब मर गए ‘ म्हणून त्यानं उत्तर दिलं. मी पुन्हा गप्प! म्हटलं उगाच नको डिवचायला, पण नंतरच्या प्रवासात लक्षात आलं की काश्मिरी लोकांचं तिथल्या राजकारणी, पोलीस व सीआरपीएफ आदिबद्दल मत काहीसं निगेटिव आहे. आपल्याला काय? म्हणून पुढचे प्रश्न विचारत राईड सुरू ठेवली.
झील मध्ये तरंगणारी कमळं, फ्लोटिंग गार्डन, शेती सारं-सारं पाण्यावर होतं! एक बाई तर तिथून भोपळे तोडून आमच्या शिका-यावर ठेवत होती. आमचा शिकारा पुढे पुढे जाताना त्याला समांतर अगदी खेटून खेटून छोटे छोटे शिकारेही यायचे.. त्यामध्ये केशर विकणारे, बायकांच्या गळ्यातील, कानातील, दागिने विकणारे, आइस्क्रीम कुल्फी विकणारे होते..
हळूहळू आम्ही “चारचिनार “ला पोहोचलो. सरोवराच्या मध्यभागी असलेल्या छोट्या बेटावर ही चार चिनार वृक्षाची झाडं आहेत. ती शहाजहानने लावली असे सांगतात. इथून सारं दल सभोवताली न्याहाळता येत. फोटो तर मस्तच येतात. इथे काश्मिरी पेहराव शंभर ते दीडशे रुपयाला भाड्याने मिळतात. तो घालून छान छान फोटो काढले. हाऊसबोटकडे परततांना ‘कबुतरखाना’ मार्गे निघालो. वाटेत म्हणजे पाण्यातच त्यांचा शॉपिंग मॉल आहे. जाणून बुजून हे लोक विविध दुकानात आपणास थांबवितात, त्यांचं कमिशन असतं, तिथे जायला जवळ-जवळ आपणास ते भागच पडतात. त्यांच्या समाधानासाठी दुकानातून राऊंड मारून घ्यायचा ठरवलं. वस्तूची किंमत 70 टक्के कमी करून मागायची.
दुपारच्या जेवणानंतर चष्मेशाही, निशांत गार्डन, मुगल गार्डन, शालीमार गार्डन, वगैरेंची सैर झाली. एका कार्पेट फॅक्टरीमध्ये सुद्धा आम्हाला नेलं. पण ते शोरूम होतं. सायंकाळी 5 नंतर दल शेजारी मोठ-मोठ्या वाहनांना बंदी असल्याने आमची बस दलगेट मार्गे आली. तत्पूर्वी आम्ही शंकराचार्य टेकडी वर गेलो. 240 पायऱ्या असलेल्या त्या मंदिरावरून श्रीनगर चा देखावा अप्रतिम दिसतो नागमोडी वळण घेत वाहणारी झेलम नदी दिसते. वरून दिसणारा दल लेक तर काही विचारुच नका!! डोळ्याचं पारणं फेडणारा तो देखावा हृदयात फ्रेम करून ठेवावा असाच होता.
राजा हरिसिंग महल आता हॉटेलमध्ये बदलला आहे. बॉटनिकल गार्डन, तुलिप गार्डन, राज भवन, सेंटर हॉटेल, ओबेराय हॉटेल, वगैरे बसमधून गाईडने दाखविले.
आमच्या नचिकेतची मात्र अजून बर्फाचा पर्वत न दिसल्याने काश्मिरात येऊन तीन दिवस झाले तरी “पप्पा काश्मीर कधी येणार?” म्हणून विचारणा होत होती.
– क्रमशः भाग पहिला
© प्रा. भरत खैरकर
संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो. ९८८१६१५३२९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈