सौ. दीपा नारायण पुजारी
मी प्रवासीनी
☆ सुखद सफर अंदमानची… भाग – २ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
फ्लॅग पॉईंट
श्रीविजयानगर, अर्थात पोर्ट ब्लेअर.
वीर सावरकर हवाई अड्ड्यावर पंधरा जानेवारीला सकाळी साडे सहा वाजता आम्ही उतरलो. वीर सावरकर हवाई अड्डा हे नाव वाचताना मराठी असल्याचा अभिमान वाटला. समोरचा सावरकरांचा पुतळा बघून नतमस्तक होणार नाही असा एकही मराठी माणूस मिळणार नाही.
अंदमान निकोबारची राजधानी असलेलं हे ठिकाण. या मातीत पाऊल ठेवताना मान ताठ होते. उर देशाभिमानानं दाटून येतो
30 डिसेंबर 1943 ला इथं नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकावला. अंदमान ब्रिटिश राजवटीतून मुक्त झाल्याची वार्ता हा तिरंगा सगळ्या जगाला सांगत होता. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी नेताजींच्या सेनेनं अंदमान स्वतंत्र केलं होतं. तो Flag point बघायला आम्ही संक्रातीच्या सरत्या संध्यासमयी गेलो होतो. काही वेळा पूर्वी सेल्युलर जेल बघून आलो होतो. अजून ते बघताना अंगावर आलेले रोमांच तसेच होते. स्वातंत्र युद्धाचा तो दैदीप्यमान इतिहास आणि तो काळ नजरेसमोर बिनचूक उभा करणारा तो लाईट एँड म्युझिक शो यांचा मनावर आणि शरीरावर झालेला परिणाम तेवढाच तीव्र होता. साखळदंडाचे आवाज कानात घुमत होते. इंग्रज अधिकाऱ्यांचे गडगडाटी सातमजली हास्य विसरणं शक्यच नव्हतं. जेलच्या प्रांगणातील पिंपळाच्या पानांची सळसळ धमन्यांतून वाहणाऱ्या रक्तात भिनली होती. हा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी आजच्या भारतीयांना तो ऐकवण्यासाठी हा पिंपळ इथं ताठ उभा आहे. जाज्वल्य देशाभिमान असाच प्रज्वलित ठेवणाऱ्या पटांगणातील त्या दोन अखंड हुतात्मा ज्योती प्रत्येक भारतीय मनात हा इतिहास जागा ठेवतात. सात बाय साडेतीनची ती अंधारी कोठी, तिथंच जेवण, तिथंच झोप, शारीरिक विधींसाठी वेगळी व्यवस्था नाही. तांबरलेल्या लोखंडी थाळीत वाढलेलं बेचव कोरडं अन्न ज्यात अळ्या आणि किड्यांचं साम्राज्य. नाक दाबून प्यावं तरी पिऊ शकणार नाही असं घाणेरडा वास असलेलं पाणी प्यायला. हे सगळं कमी म्हणून दिवसभर शेकडो हजारो शहाळी सोलणं, काही टन तेल काढण्यासाठी कोलू ओढणं, पाठीवर आसूडाचे फटके झेलणं. हे सगळं कशासाठी तर मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी. आपल्याच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्याच देशात असंख्य कोवळ्या हातांनी कोलू ओढले. साखळदंडांनी बद्ध असलेल्या हातापायांनी, ज्या बेड्या हालचाल केल्यास
हातापायांना जखमा करत असत. नुसतं ऐकून श्वास रोखला जातो, मन बधीर होतं. वेड लागेल असं वाटतं. पण हा सिनेमा नाही. किंवा ही काही काल्पनिक कथा कादंबरी नाही. हा खराखुरा इतिहास आहे स्वातंत्र्य चळवळीचा, हे सत्य आहे बलिदानाचं, ही सत्यकथा आहे वेड्या साहसी वीरांची. आज त्यांच्या मुळंच आपण स्वतंत्र भारतात ताठ मानेने जगू शकतो.
150 फूट उंच तिरंगा वाऱ्यावर लहरत होता. समुद्राच्या लाटा ओढीनं त्याच्या चरणाकडं धाव घेत होत्या. त्याला स्पर्श न होऊ देता ध्वजस्तंभापासून काही अंतरावर येऊन पुन्हा समुद्रमय होत होत्या. त्यांचा लयबद्ध आवाज गंभीर तरीही मोदमय होता. अभिमानानं जणू वंदे मातरम म्हणत असाव्यात. बंगालचा उपसागर अजूनही तो दिवस विसरला नाही. 2018 मध्ये पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा तिथं ध्वजारोहण केलं आणि नेताजींना आदरांजली म्हणून या फ्लॅग पॉईंटचं पुनर्निर्माण पुनर्जीवन केलं. आज तो पॉईंट एक देखणं प्रेक्षणीय स्थळ आहे. इथं छानशी चौपाटी आहे. आमच्यातल्या एकीचा, सौ स्वाती मेहता हिचा वाढदिवस त्या दिवशी होता. तिरंग्याच्या साक्षीनं तो साजरा झाला. अहो भाग्यम्!! आपल्या तीन मुलींना घेऊन स्वतःच्या लग्नाची एनिव्हर्सरी साजरी करायला अंदमानला येण्याची कल्पना केवढी रोमांचकारक. पण… पण ती पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं किंबहुना ती कल्पना प्रत्यक्षात आली ते आणि ते केवळ या वीरांच्या समर्पणानं, त्यागानं, अचाट देशप्रेमामुळंच हे विसरून चालणार नाही.
☆
सरसरला शहारा सरसर अंगावर
नतमस्तक मी वीराच्या त्या भूमीवर
*
झेलले अनेक वार
सोसले तुम्ही अत्याचार
अनंत यातनांचे अंगार
दाहक अग्नीफुलांचे हार
*
न थिजे तव बुद्धीची धार
शब्दच लवती बनून तलवार
ती कोळशाची लेखणी धारदार
भिंतीवर फुलले अक्षरांचे अंगार
*
अवांछनीय मिळे तुज जलनीर
आरास किड्यांची, शोभला थाळीचा तीर
झेलले असंख्य अगणित भाले टोकदार
तरी न ढळला निश्चय तू धीरवीर
*
थंड बोचरे काळेपाणी
आईची ममता जागी गाणी
पेटता मग लाव्हा त्या धमनी
थिजली काळरात्रही त्या अंदमानी
*
केले यशस्वी तुम्ही संक्रमण
फिरंगी पळविले करून आंदोलन
तव त्यागाची ठेवून आम्ही जाण
नतमस्तक होऊन लुटतो मुक्तक्षण
*
सरसरला शहारा सरसर अंगावर
नतमस्तक मी त्या वीराच्या भूमीवर
☆
– क्रमशः भाग दुसरा
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
9665669148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈