सौ. दीपा नारायण पुजारी
मी प्रवासीनी
☆ सुखद सफर अंदमानची… भाग – ३ ☆ सौ. दीपा नारायण पुजारी ☆
चुनखडीच्या गुहा
बारतांगच्या धक्क्यावर लहान स्पीड बोटीतून आमचा प्रवास सुरु झाला. एका बोटीत दहा जणं बसून जाऊ शकतो. निळाशार खोल समुद्रात वेगानं जाणाऱ्या या बोटीतून जाताना भारी मजा येते. वारा वहात असतो आणि त्याला छेद देत मोटरबोट सागरी लाटांवर स्वार होते. नावाडी कौशल्यपूर्ण असतात. या बोटींची नावं मजेशीर आहेत. सी टायगर, सी मेड, इ. ज्या बोटीतून तुम्ही जाल त्याच बोटीतून परत यायचं असतं. त्यामुळे बोटीचं नाव आणि नावाड्याचं नाव लक्षात ठेवावं लागतं.
समुद्राच्या लाटा एका लयीत उठत असतात. पण आपल्या बोटीमुळं त्यांना छेद जातो. त्यांचा ताल बिघडतो. लय वाढते. लाटांची उंची, हेलकावे सगळं उसळी मारून आपल्या बोटीकडं झेपावतं. आपल्या आजूबाजूनं दुसरी आणि एखादी स्पीड बोट जात असेल तर लाटांचा खेळकरपणा वाढतो. त्या आपल्या बोटीला जास्तच झोके देतात. सप् कन पाण्याचा किंचित जोरदार फटकारा देतात. हलणारं निळं पाणी आणि लाटांमुळं फेसाळलेल्या पाण्यातील शुभ्र फेसांची माळ. शुभ्र चमकणारे मोती. निळ्या लाटांना त्यांची मध्येच जुळणारी तुटणारी झालर. रमणीय दृश्य असतं ते. वरती पसरलेलं घनगंभीर अलिप्त आकाश अधिक निळं अधिक समंजस आणि शांत वाटतं. हा खाली पसरलेला निळाशार समुद्र मात्र अवखळ चंचल अनाकलनीय तरीही गूढ वाटतो.
बराच वेळ लांबवर दिसणारं खारफुटींचं जंगल आता दोन्ही बाजूंनी जवळ जवळ येऊ लागतं. आणि अचानक ते अंतर इतकं कमी होत जातं की आपली बोट खारफुटीच्या घनदाट छताखालून जाऊ लागते. हे छत इतकं दाट आहे की आता आकाशाची निळाई लुप्त होते. आकाश आणि समुद्र यातल्या निळ्या रंगाची तुलना करण्याचं कारण रहात नाही. कारण आता आपल्या डोक्यावर निसर्गराजा हिरवी छत्री धरून उभा असतो. हिरवाई इतकी सलगी करते की पाण्याची निळाई हरवून जाते. आता लाटांचा खेळ आणि लाटांचं संगीत दोन्ही शांत होतं. आपली बोट शांतपणे एका बेटाच्या लहानशा लाकडी धक्क्याला लागलेली असते.
आता सुरू होतो आपला पायी प्रवास. साधारण पणे अर्ध्या तास चालावं लागतं फारतर. पण ही वाट दाट जंगलातून जाते. या पायवाटेनं जाणं तसं फार कठीण नाही पण सोप्पंही नाही. दोन्ही बाजूला खारफुटींची घनदाट झाडी. झाडांची मुळं इतस्ततः पसरलेली. ही मुळं आपल्या डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे जातात. त्यांच्या या रांगत रांगत इकडून तिकडे जाण्यानंच नैसर्गिक पायऱ्या तयार झाल्या आहेत. काही ठिकाणी मात्र दगडांचा वेडावाकडा चढ उतार आहे. सगळा रस्ताच चढ उतारांनी बनला आहे. एक दोन ठिकाणी प्रचंड मोठे वृक्ष पायवाटेत मध्यभागी ठिय्या देऊन बसले आहेत. त्यांच्या दोन्ही बाजूला पायवाट आहे. या गर्द दाट हिरव्या रंगातून सूर्यकिरणांना सुद्धा आत यायला मज्जाव करण्यात आला आहे. एक हिरवी शांतता गारवा वाहून आणते जणू. मंद शीतल वारा उष्णता जाणवू देत नाही. सोबतीला असतं पानांचं सळसळतं संगीत आणि नयनमनोहर पक्ष्यांची मधुर सुरावट. त्यांचे आलाप आणि ताना ऐकत आपण गुहेजवळ कधी जातो ते कळत नाही.
गुहा सुरू झाली आहे हे आपल्याला आपला वाटाड्या सांगतो. त्याचं कदाचित आणखी एक कारण असेल. ते म्हणजे या गुहेचा पहिला साठ टक्के भाग वरुन उघडा आहे. दोन्ही बाजूस चुनखडीचे उंच डोंगर. आकाशाकडं निमुळते होत जातात आणि वरच्या बाजूला छतावर ते डोंगर एकमेकांपासून विलग झालेले दिसतात. अर्थात या भागात पुरेसा उजेड आहे. पाय जरा जपून ठेवावा लागतो. खालचा रस्ता खाचखळगेवाला आणि वरखाली करत आतल्या गुहेत नेतो. हा बाहेरचा भाग चुनखडीचा असूनही काळा दिसतो. हवा पाणी यांच्या संपर्कात आल्यानं चुनखडीचा पांढरा रंग बदललेला आहे. इथून पुढे गुहेच्या आतील चाळीस टक्के भाग कमी उजेडाचा आहे. गुहेत आत जाऊ तसतसा काळोख दाट होतो. या गुहेतील पुढचा प्रवास मोबाइल टॉर्चच्या उजेडात करावा लागतो. परंतु इथल्या डोंगराच्या भिंती पांढऱ्या आहेत. या भिंतींना हात लावायचा नाही. हाताचा स्पर्श जिथं झाला आहे तिथं त्या काळ्या झाल्या आहेत.
वाटाड्या दाखवत जातो तसं आपण फक्त बघत आत जायचं. चुनखडीच्या क्षारांचे एकावर एक अनेक थर या भिंतीवर जमले आहेत. दोन्ही बाजूच्या भिंती आकाशाकडं निमुळत्या होत जातात आणि शेवटी एकमेकींना मिळालेल्या दिसतात. काळोख वाढत जातो. चुनखडीचे थर चित्र विचित्र आकार धारण करतात. आपली जशी नजर तसे आकार किंवा आपल्या मनात जो भाव तसा दगड. इथं दगडानं कधी बाप्पाच्या सोंडेचा आकार धारण केला आहे तर कधी फक्त सोंडेचा. कुठं चुनखडीतून पद्म फुललंय तर कुठं कमळपुष्पमाला. कुठं मानवी नाकाचा, चेहऱ्याचा भास तर कुठं मानवी पाठीचा कणा. स्पायनल कॉर्ड. तो इतका हुबेहुब की आ वासून बघतच रहावं. मणक्यांची खरी माळच कुणा प्रवाशानं आणून ठेवली नसावी ना? असा विचार मनात आल्या शिवाय रहात नाही. एके ठिकाणी एक दगड छतातून खालच्या दिशेनं वाढतोय तर त्याखाली दुसरा जमिनीतून छताच्या दिशेने. दोन्हीमध्ये एखादी चपटी वस्तू जाऊ शकेल इतकं कमी अंतर. काही वर्षांनी येणाऱ्या प्रवाशांना एकसंघ खांब दिसला तर नवल नसावं. काही ठिकाणी अजूनही थर बनवण्याचं, क्षार साचण्याचं काम सुरू आहे. त्या जागा ओलसर दिसतात. टपकन एखादा पाण्याचा थेंबही आपल्या अंगावर पडतो. काही थरांमध्ये अभ्रकाचं प्रमाण जास्त आहे. ते अंधारात चांदण्यागत चमकतात.
निसर्गाची लीला अजबच याची पक्की खात्री करून देणाऱ्या या गुहा. नजरबंदी करणाऱ्या नैसर्गिक सौंदर्याचा, निसर्गाच्या अदाकारीचा थाट लेवून उभ्या आहेत. एक गूढ वातावरण घेऊन. रम्य आणि अजब आकारांचं हे निसर्ग दालन किती सजीवांचं आश्रय स्थान होतं कोण जाणे. किंवा अजूनही असेल माहिती नाही. गुहेतून फिरताना समुद्राची गाज कानावर येत राहते. ती गाजच काय तेवढी तिथल्या गूढ शांततेचा भंग करते पण गूढता अधिकच गूढ करते.
या गुहांच्या पलिकडे आणखी गुहा आहेत. ज्या स्तरसौंदर्याच्या खाणी आहेत. परंतु तो रस्ता बंद झाला आहे. शिवाय इथं अंधार लवकर पडतो. बारटांगचं गेट दुपारी तीन वाजता तसंच चार वाजता उघडतं. त्यावेळेत पोचायला हवं. पाय उचलावेच लागतात. गूढ रहस्याचा शोध न लागल्यासारखे आपण परतू लागतो.
– क्रमशः भाग तिसरा
© सौ. दीपा नारायण पुजारी
इचलकरंजी
9665669148
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈