सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मी प्रवासिनी क्रमांक 30 – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

✈️ कलासंपन्न ओडिशा ✈️

महानदीच्या तीरावर वसलेलं ‘कटक’ हे शहर पूर्वी ओडिशाच्या राजधानीचं शहर होतं. तेराव्या शतकात बांधलेला इथला बाराबतीचा किल्ला मराठ्यांनी मोगलांकडून जिंकून घेतला होता. इसवी सन १८०३ पर्यंत हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. आता हा किल्ला बराचसा उध्वस्त झाला आहे. मात्र त्याचं पूर्वीचं प्रवेशद्वार अजून शाबूत आहे. हे अवशेष चांगल्या रीतीने जपले आहेत. किल्ल्याजवळ बांधलेलं भव्य  बाराबती स्टेडिअम कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे.

कोणार्क येथील सूर्यमंदिर म्हणजे उडिया शिल्पकाव्याची अक्षयधारा आहे. भुवनेश्वरहून ६२ किलोमीटर अंतरावर असलेलं हे सूर्यमंदिर कलिंग शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.  कोणार्क मंदिर दीर्घ काळ रेतीत बुडालेलं होतं. १८९३ मध्ये ते प्रथम उकरून काढण्यात आलं. पुरातत्त्व विभागाने त्यावरील वाळूचं आवरण दूर करण्याचं काम हाती घेतलं. आज या भग्न मंदिराचे गाभारा व बरेचसे भाग उध्वस्त अवस्थेत आहेत. कोणार्क समुद्रकाठी असल्याने हवामानाचाही बराच परिणाम होऊन मंदिराची खूप झीज झालेली दिसून येते. शिवाय मोंगल आक्रमणामध्ये मंदिराची खूप तोडफोड झाली.

१२०००हून अधिक कारागिरांनी १६ वर्ष अथक परिश्रम करून हे मंदिर उभं केलं होतं. त्यासाठी अमाप खर्च झाला. हे मंदिर रथाच्या रूपात आहे. दोन्ही बाजूंना दहा- दहा फूट उंचीची  १२ मोठी चाकं आहेत. या चाकांवर आणि देवळावर अप्रतिम कोरीव काम आहे. सात दिमाखदार अश्व, सारथी आणि सूर्यदेव असे भव्य मंदिर होते. मंदिराच्या शिल्लक असलेल्या भग्न अवशेषांवरून पूर्वीच्या देखण्या संपूर्ण मंदिराची कल्पना करावी लागते.

या दगडी रथाच्या वरील भागात मृदुंग, वीणा, बासरी वाजविणाऱ्या पूर्णाकृती सूरसुंदरींची शिल्पे कोरली आहेत. त्याखाली सूर्यदेवांच्या स्वागताला सज्ज असलेले राजा, राणी, दरबारी यांची शिल्पे आहेत. योध्दे, कमनीय स्त्रिया व बालके यांची उत्कृष्ट शिल्पे आहेत. त्याखालील पट्टयावर सिंह, हत्ती, विविध पक्षी, फुले कोरली आहेत. रथावर काम शिल्पे, मिथुन शिल्पे कोरलेली आहेत. त्यातील स्त्री-पुरुषांच्या चेहऱ्यावरील भाव लक्षणीय आहेत. आकाशस्थ सूर्यदेवांच्या अधिपत्याखाली पृथ्वीवरील जीवनचक्र अविरत चालू असते. त्यातील सातत्य टिकविण्यासाठी आदिम नैसर्गिक प्रेरणेनुसार सर्व जीवसृष्टीचे वर्तन असते असे इथे अतिशय कलात्मकतेने शिल्पबद्ध केलेले आहे.

भारतीय पुरातत्त्व खात्याची निर्मिती ही ब्रिटिशांची भारताला फार मोठी देणगी आहे. ब्रिटिश संशोधकांनी भारतीय संशोधकांना बरोबर घेऊन अतिशय चिकाटीने अजिंठा, खजुराहो, मोहनजोदारो, कर्नाटकातील शिल्पस्थानं यांचा शोध घेऊन त्यांचे संरक्षण व दस्तावेजीकरण केले. कोणार्क येथील काळाच्या उदरात गडप झालेले, वाळूखाली गाडले गेलेले सूर्यमंदिर स्वच्छ करून त्याचे पुनर्निर्माण केले. त्यामुळे ही सर्व शिल्परत्ने जगापुढे येऊन भारतीय समृद्ध संस्कृतीची जगाला ओळख झाली. आज हजारो वर्षे उन्हा- पावसात उभ्या असलेल्या, अज्ञात शिल्पकारांच्या अप्रतिम कारागिरीला प्राणपणाने जपणे हे आपले कर्तव्य आहे.  दरवर्षी १ डिसेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान कोणार्कला नृत्यमहोत्सव आयोजित केला जातो. त्यात प्रसिद्ध नर्तक हजेरी लावतात .

कोणार्कहून ३५ किलोमीटरवर ‘पुरी’ आहे. सागर किनाऱ्याने जाणारा हा रस्ता रमणीय आहे. आदि शंकराचार्यांनी आपल्या भारतभ्रमणाअंतर्गत भारताच्या चारी दिशांना जे मठ स्थापिले त्यातील एक म्हणजे पुरी. जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा या बहिण भावंडांचं हे मंदिर जगन्नाथ (श्रीकृष्ण ) मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. बाराव्या शतकात बांधण्यात आलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आणि कलात्मक आहे. १९२फूट उंच असलेलं हे मंदिर इसवी सन अकराशे मध्ये अनंत वर्मन राजाने हे मंदिर बांधण्यास सुरुवात केली. त्याचा मुलगा अनंत  भीमदेव याच्या काळात ते पूर्ण झालं.

आषाढ शुद्ध द्वितीयेपासून त्रयोदशीपर्यंत साजरी होणारी ‘पुरी’ येथील रथयात्रा जगप्रसिद्ध आहे. साधारण ३५ फूट रुंद व ४५ फूट उंच असलेले तीन भव्य लाकडी रथ पारंपारिक पद्धतीने अतिशय सुंदर तऱ्हेने सजविले जातात. जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्र यांच्या रथांना वाहून नेण्यासाठी प्रचंड जनसागर उसळलेला असतो. हे लाकडी रथ दरवर्षी नवीन बनविले जातात. त्यासाठी वापरायचं लाकूड, त्यांची उंची, रुंदी, कारागीर सारे काही अनेक वर्षांच्या ठराविक परंपरेनुसारच होते. हिंदूंच्या या पवित्र क्षेत्राचा उल्लेख  ‘श्री क्षेत्र’ किंवा ‘पुरुषोत्तम क्षेत्र’ म्हणून ब्रह्मपुराणात आढळतो. चैतन्य महाप्रभूंचं वास्तव्य या क्षेत्रात बराच काळ होतं.

महाराजा रणजीत सिंह यांनी या मंदिराला भरपूर सुवर्णदान केलं. त्यांनी आपल्या मृत्युपत्रात ‘कोहिनूर’ हिराही या मंदिरासाठी लिहून ठेवला होता पण त्याआधीच ब्रिटिशांनी पंजाबवर आपला अंमल बसविला व आपला कोहिनूर हिरा इंग्लंडला नेला .

ओडिशा भाग ३ समाप्त

© सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments