सौ. पुष्पा चिंतामण जोशी
☆ मी प्रवासिनी क्रमांक 32 – भाग 1 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆
ट्युलिप्सचे ताटवे – श्रीनगरचे
समोर नगाधिराज हिमालयाची झबरबन पर्वतराजी, मागे तीन बाजूच्या निळसर हिरवट पर्वतरांगांच्या कोंदणात नीलपाचूसारखा चमकणारा दल सरोवराचा विस्तीर्ण जलाशय आणि यामध्ये पसरलेलं ट्युलिप्सच्या अनेकानेक रंगांचं लांबवर पसरलेलं स्वर्गीय इंद्रधनुष्य! अवाक होऊन आम्ही ते अलौकिक दृश्य नजरेत साठवत होतो. रक्तवर्णी, हळदी, शुभ्र मोत्यासारखी, गुलाबी, जांभळी, सोनपिवळ्या रंगावर केशरकाडी लावल्यासारखी कमळकळ्यांसारखी ट्युलिप्सची असंख्य फुलंच फुलं! साक्षात विधात्याने विणलेला अस्सल काश्मिरी गालिचा पुढ्यात पसरला होता. त्यांच्या मंदमधूर मोहक सुगंधाने वातावरण भारून टाकलं होतं
कुणाच्या कल्पनेतून, प्रयत्नातून साकार झालं असेल हे अनुपम सौंदर्य? या प्रकल्पाविषयी जाणून घेण्यासाठी काश्मीर गव्हर्मेंटचे डिस्ट्रिक्ट फ्लोरिकल्चर ऑफिसर डॉक्टर जावेद अहमद शाह यांची मुद्दाम भेट घेतली. इथे ट्युलिप्स फुलविण्याच्या कल्पनेला सरकारचा सक्रिय पाठिंबा मिळाला. दल सरोवरासमोरील हिमालयाच्या झबरबन टेकड्यांच्या उतरणीवर थोडं सपाटीकरण करून मोठ्या गादीसारखे वाफे तयार करण्यात आले. ॲमस्टरडॅमहून ट्युलिप्सचे फक्त कंद आयात करण्यात आले. बाकी सारी मेहनत, तंत्रज्ञान हे इथल्या फ्लोरिकल्चर डिपार्टमेंटचे योगदान आहे.
एकूण ७० एकर जागेवर ही फुलशेती करण्यात येते. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात ट्युलिप्सच्या कंदांची लागवड करण्यात येते. साधारण डिसेंबरच्या उत्तरार्धापासून जानेवारी संपेपर्यंत साऱ्या श्रीनगरवर बर्फाची चादर पसरलेली असते. लागवड केलेला हा संपूर्ण भूभाग बर्फाने अच्छादलेला असतो .जमिनीच्या पोटातले कंद लहान शाळकरी मुलांसारखे महिनाभर तो भला मोठा बर्फाचा गोळा चोखत बसलेले असतात. साधारण फेब्रुवारीत बर्फ वितळतं आणि कंदांच्या बालमुठीला हिरवे लसलशीत कोंब फुटतात. त्यांची मशागत करावी लागते. शेळ्या- मेंढ्या, गाई, खेचरं यांचं शेणखत ठराविक प्रमाणात घालतात. तसंच जंतुनाशकं, रसायनिक खतं यांचाही मोठ्या प्रमाणात वापर करतात. मार्च अखेर रोपांची वाढ पूर्ण होते.निरनिराळ्या प्रजातीप्रमाणे ही रोपं दीड ते अडीच फूट उंच वाढतात आणि मग बहरतात. या रंगपऱ्यांचं आयुष्य किती? तर तीन ते चार आठवडे! साधारण मार्चअखेर ते एप्रिलअखेर एक महिना हा सारा बहर असतो. अवेळी पाऊस पडला तर तीन आठवड्यातच त्यांच्या पाकळ्या गळून पडतात.
बहर संपल्यावर एक महिना ती झाडं तशीच ठेवतात. जून महिन्यात जमिनीतले कंद नेटकेपणे अलगद काढलेले जातात. ते जपून ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात आली आहे. साधारण १७ ते २३ सेंटीग्रेड उष्णतेत निर्जंतुक करून त्या कंदांना सांभाळण्यात येतं. जरुरीप्रमाणे काही नवीन जातीचे, रंगांचे कंद ॲमस्टरडॅमहून आणण्यात येतात. ऑक्टोबरपर्यंत सारं नीट सांभाळत, जमिनीची मशागत करून पुन्हा नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये लागवड केली जाते. भारतीय व परदेशी प्रवासी आवर्जून हा अलौकिक नजारा पाहायला गर्दी करतात.
विस्तीर्ण दल सरोवरातून शिकारा सहल करताना शंकराचार्य टेकडीवरील मंदिर, हरी पर्वताची रांग दिसते. सरोवरामध्ये झाडांचं वाळकं गवत, वेली व माती यांचा एकमेकांवर थर बसून इथे अनेक छोटी बेटं तयार झाली आहेत. त्यावर तरंगती घरं, मीना बाजार आहे. पाणथळ जागेतील लहान- मोठ्या झाडांवरून गरुड, खंड्या, बुलबुल यांनी दर्शन दिलं. चार शाळकरी मुली होडीत दप्तरं ठेवून स्वतःच ती छोटी होडी वल्हवत दल सरोवराकाठी असलेल्या त्यांच्या गावाकडे जात होत्या. चौकशी केल्यावर कळलं की त्यांना रोज एक तास जायला आणि एक तास यायला वल्हवावं लागतं तेव्हा त्या श्रीनगरच्या शाळेत पोहोचतात.
श्रीनगरहून पहेलगामला जाताना दुतर्फा चिनार आणि सफेदा यांचे प्रचंड घेरांचे वृक्ष दिसत होते. चिनारच्या वठल्यासारख्या वाटणाऱ्या पोकळ, प्रचंड घेरांच्या बुंध्यातून चिनारची हाताच्या पंजासारखी पान असलेली कोवळी पालवी लवलवत होती. सफेदा वृक्षांच्या फांद्या घरांच्या उतरत्या छपरांसाठी वापरल्या जातात. विलो, देवदार, फर असे अनेक प्रकारचे वृक्ष होते. विलोच्या झाडांपासून क्रिकेटच्या बॅट बनविल्या जातात.
आठव्या शतकातील ललितादित्य या राजाच्या कालखंडात इथे मंदिर वास्तुकला बहरली होती. त्यानंतरच्या अवंतीवर्मन आणि जयसिंह यांनी ही मंदिर वास्तुकला वैभवसंपन्न केली. राजा जयसिंह याच्या काळात राजकवी कल्हण याने आपल्या ‘राजतरंगिणी’ या दीर्घ काव्यग्रंथात काश्मीरमधील शिल्पवैभवाने नटलेल्या अनेक देवालय समूहांचं सुंदर वर्णन केलेले आहे. ब्रिटिश संशोधक सर ऑरेट स्टेन यांनीही आपल्या संशोधनामध्ये या मंदिरशिल्पांवर प्रकाश टाकला आहे. श्रीनगर- सोनमर्ग रस्त्यावर कनकिनी नदीच्या तीरावरील नारंग येथे भव्य देवालयांचा शिल्पसमूह ग्रानाईटच्या लांबट- चौकोनी दगडांमध्ये इंटरलॉक पद्धतीने बांधलेला होता. त्याच्या अखंड काळ्या दगडातून कोरलेल्या घुमटाचं वर्णन ‘राजतरंगिणी’मध्ये केलेलं आहे. तिथल्या नैसर्गिक नितळ झर्यांचं, त्यातील माशांचं वर्णनही त्यात आहे. सम्राट अशोकाचा पुत्र जालुका याने २००० वर्षांपूर्वी बांधलेलं शिव-भूतेश देवालय याचा उल्लेखही ‘राजतरंगिणी’ मध्ये आहे. आज त्याचे काही भग्न अवशेष शिल्लक आहेत.
श्रीनगर भाग १ समाप्त
© सौ. पुष्पा चिंतामण जोशी
जोगेश्वरी पूर्व, मुंबई
9987151890
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈