सौ राधिका भांडारकर
यात्रा-संस्मरण
☆ ग्रॅंड कॅनियनला भेट…भाग – 4… ☆ सौ राधिका भांडारकर☆
आजची सफरही वैशिष्ट्यपूर्ण होती. Lower Antelope canyon ..
आम्ही अँन्टीलोप कॅन्यन व्हीजीटींग सेंटरपर्यंत फ्लॅगस्टाफहून कारने आलो. जवळ जवळ अडीच तासाचा ड्राईव्ह होता. ही जागा नोवाहा कम्युनिटीच्या राज्यात येते.
अॅन्टीलाॅप कॅन्यनचे दोन भाग आहेत. खालचा आणि वरचा..
वरचा अँन्टीलाॅप २००मीटर आहे आणि खालचा भाग ४०७ मीटर (१३३७फूट) पसरलेला आहे.आठ ते साठ मिलीअन वर्षांचे ते आहेत. आम्ही खालच्या अँन्टीलाॅप ला भेट दिली.
व्हीजीटींग सेंटर पासूनच प्रत्यक्ष टूरला सुरवात होते. ज्योतिकाने आधीच टुर बुक केली होती. सेंटरवर तिने तिचे बुकींग दाखवले.
आमचे तिघांचे बुकींग होते. मात्र जी सेंटरवरची मदतनीस होती ती म्हणाली,। इथे दोघांचच बुकींग दिसतय्” .सायराचे नावच नव्हते. ज्योतिकाला इंटरनेट मिळत नव्हते. त्यामुळे तिला कंपनीशी संपर्क साधता येत नव्हता. शेवटी तिने सायराचे तिथल्या काउंटरवरच परत तिकीट काढले. आॅनलाईनपेक्षा इथले तिकीट थोडे कमीही होते. टेक्नॉलॉजीचे जसे फायदे तसे तोटेही…असो!
साधारण एक तासाची ही भूगर्भीय सफर होती. आम्हाला दुपारी सव्वा बाराची वेळ मिळाली. इथेही वेळेत एक तासाचा फरक आहे. एक तासाने हा परिसर मागे आहे.
आम्ही तिथल्या गिफ्ट शॉपमध्ये काही खरेदी करण्यात वेळ घालवला.
ही सफर अवघड,साहसी असणार याची कल्पना होतीच.
संपूर्ण पायी सफर होती. आमच्याबरोबर टुर गाईड होता.
आम्हाला सफरपूर्वी अनेक सूचना दिल्या गेल्या. कुठल्याही सॅक्स,काठी कॅमेरा बरोबर नेता येणार नव्हत्या.मोबाईलला परवानगी होती.
आमचा दहा बारा जणांचा गृप होता. काही वृद्ध ही होते.
अमेरिकन, जपानी चायनीज सारेच होते. मी सर्वात ज्येष्ठ असेन. पण ही सारी मंडळी अतिशय सहकार्य देणारी होती.
सर्वांच्या मनांत एकच स्वप्न होतं,या जमीनीच्या पोटात दडलंय् तरी काय? हे बघण्याचं..
अक्षरश: आम्ही धरतीच्या उदरात चाललो होतो. अतिशय सरळ अशा शिड्या होत्या.सांभाळून उतरावे लागत होते.
असे सहा टप्पे आम्ही ऊतरलो. सातवा फारच कठिण होता. भूमिकन्या सीतेची मला आठवण झाली. धरतीने तिला जसे कुशीत घेतले तसे ती आम्हालाही घेत होती.
आता आम्ही प्रत्यक्ष कॅन्यनजवळ पोहचलो. आणि जे नजरेला दिसलं ते या दोन डोळ्यात मावणारं नव्हतंच.अरुंद,चढउताराची,वालुकामय अशी पायवाट तुडवत आम्ही त्या भूगर्भातल्या खिंडीत चालत होतो.
कुंभाराने बनवलेल्या मडक्यासारखं ते अनंत आकार घेउन पसरलेलं होतं. धरतीच्या वर एका बाजूला या कॅन्यनचं उघडं द्वार होतं. तितपर्यंत आम्हाला जायचं होतं.बाहेर येण्याचा रस्ता फक्त तोच होता. आता no come back.
चालायचे. वळसे घेत .बघत बघत. वरुन सूर्यकिरण पाझरत होते. छाया प्रकाशाचा अत्यंत मनोरम खेळ आम्ही पहात होतो. त्या दगडांमध्ये शार्क,ईमो,सी हाॅर्सचे आकार दिसत होते. एक लेडी विथ द विंड नावाचंही शिल्प तयार झालं होतं.तिचा चेहरा आणि तिचे उडणारे केस .हे सगळं आमच्या नजरेसमोर आमचा टूर गाईड आणण्यास मदत करत होता. आणि मग “अय्या! खरंच” “ओह माय गॉड” सारखे ऊद्गार उत्स्फूर्तपणे बाहेर पडत होते.ज्या वाटेने आम्ही चाललो होतो त्या वाटेवरुन पावसाळ्यात पाण्याचा
प्रचंड लोट वाहतो. सगळी वाळु वाहून जाते.तेव्हां ही सफर बंद ठेवावी लागते.इथे मन्सुन एप्रील ते जुनपर्यंत असतो.
आणि तसंही पावसाचा नेम नसतोच. आमचे भाग्य म्हणून आम्हाला हे पहायला मिळाले. आतमध्ये चालत असताना मधून मधून आम्हाला वाळुतला ओलसरपणा जाणवतही होता.
जवळ जवळ एक दीड तासाने आम्ही धरतीच्या उदरातून बाहेर आलो. सूर्यप्रकाशात आलो. आता आम्ही जमिनीवर होतो.डोक्यावर रणरणतं ऊन होतं. पण हवेत सुखद गारवा होता.
जे पाहिलं,अनुभवलंं ते वर्णनातीत होतं.
निसर्गासमोर माणूस म्हणून जगताना मी फक्त एक कण आहे असेच वाटले.
मनोमन त्या किमयागाराला मनापासून वंदन केले.
© सौ. राधिका भांडारकर
ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७
मो. ९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈