? वाचताना वेचलेले ?

याने जन्मभर बोलतच रहावे ! – भाग – 1 – श्री गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर ☆ संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆

घड्याळांत सहाचे ठोके पडले, अन् आम्ही पन्हाळा किल्ला उतरायला प्रारंभ केला. आषाढ मासीच्या काळोख्या रात्री धूमधूम पावसात भिजत शिवछत्रपति पन्हाळा उतरून ज्या आडवाटेने विशाळगडीं पोहोचले, त्याच वाटेने जायचे, असा आमचा संकल्प होता. 

दहा-पाच पावले उतरलो, अन् पाहिले, की बाबासाहेब थांबले आहेत ! आता हा माणूस प्रवासाच्या आरंभीच हे असले करायला लागला, तर हा रानावनांतला पंचेचाळीस मैल प्रवास कसा पार पडायचा ! काहीसा चिडून मी हाका मारू लागलो. आपल्या मुद्रेवरचे हसूं मावळू न देता बाबासाहेब म्हणाले, 

“त्याचं काय आहे, अप्पासाहेब, उजवा पाय थोडासा लचकला. कसा, कोण जाणे ! पण निघताक्षणी त्यानं दगा दिला. हा निघालोच – गुडघ्याला रूमाल बांधताक्षणी !”

– अन् ते दु:ख वागवीत हा मराठी शाहीर ते रानावनांतले, अवघड वाटेवरले कंटाळवाणे पंचेचाळीस मैल तस्सा चालत राहिला ! मुद्रेवरचे स्मित त्याने कणभरही झाकोळू दिले नाही.

या माणसाला मी चांगला ओळखून आहे ! शिवचरित्रावरील भक्तीपोटी हा काय वाटेल ते करू शकतो, या विषयी माझ्या मनी तिळप्राय शंका नाही.

वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पावसाळा सुरू झाला होता. वरंध घाट बंद झाल्यामुळे महाडहून पुण्यास परततांना महाबळेश्वरमार्गे यावे लागत असे. मोटार महाबळेश्वरीं थांबली होती. पावसामुळे झडपा बंद करून घेतल्या होत्या. कुतूहलामुळे मी माझ्या मागची झडप उचलून पावसाचे झरपणे पाहात बसलो होतो. तों वाईकडच्या रस्त्याने कुणी सायकलस्वार चिंब भिजून आलेला दिसला. एकटाच होता. अंगातलें कुडते अंगाशी अगदी चिकटून गेले होते.  मस्तकावरून पाणी निथळत होते. दात थडथडत होते. 

पाहिले, तर गडी ओळखीचा वाटला. मी तिथल्या तिथून जोरजोराने हांक मारू लागलो. आइकून तो काकडलेला सायकलस्वार मोटारीकडे वळला. 

मी आश्चर्याने विचारले,

“बाबा, कुणीकडे ?”  

स्मित करून बाबासाहेबांनी म्हटलें, 

“प्रतापगडावर.”

“एवढ्या पावसांत ? अन् एकटे ? मोटारीने का गेलां नाही ?”

“तिथं एक कागद आढळांत आला, असा सांगावा पोचला. निघालो, झालं !”

एक जुना कागद आढळांत आला, असा म्हणे सांगावा आला. तेवढ्यासाठी हा माणूस पुणे ते प्रतापगड हा प्रवास वाटेतले तीन घाट चढून, या लागत्या पावसाळ्यांत, सायकलवरून करायला निघाला होता ! 

पण हे काहींच नव्हे. आम्हांला केवळ पुरंदर्‍यांचे शिवचरित्र दिसते. मोहोरेदार कागदावर छापलेले. चित्रे घालून सजवलेले. मराठी ग्रंथसंपत्तीचे केवळ शिरोभूषण असे श्री. ब.मो.पुरंदरेलिखित ‘राजा शिवछत्रपति’ ! पण त्यापाठीमागचे हे कष्ट, हे रक्त आटवणे कुणाला माहीत आहे ? जिथे जिथे शिवचरित्र घडले, तो बहुधा सर्व प्रदेश या तरूण पुरुषार्थ्याने पायांतळी घालून अक्षरश: विंचरून काढला आहे. अमुक एका खिंडीतून शिवछत्रपतिंचे सैन्य अमुक एका वेळी मुघलांसमोर उभे ठाकले, असे वाचले मात्र की त्या वाटेने तसतसा प्रवास करून तो सगळा प्रांत डोळ्यांखाली घातलाच पाहिजे. प्रतापगडाभोवतालचा तो पारघाट, ते जनीचे टेंब, ती जावळी, ते कोयनापार हे सगळे भटकले पाहिजे. या येडपट संकल्पात कोण जोडीदार मिळणार ? त्या भयानक प्रदेशांत भयानक झाडी. अस्वलांची आणि बिबळ्यांची वस्ती. हे रान तुडवीत बाबाबरोबर कोण हिंडणार ? ठीक आहे. न मिळो ! अंग काट्यांनी फाडून घेत हे महारण्य एकट्याने धुंडाळायचे. अन्न आहे आहे, नाही ! नाही ! चिंता करतो कोण ? देवाने तारूण्य दिले, ते कशासाठी तर मग ? 

या मस्ताना जोग्याने वाचले, की शिवछत्रपति आग्र्याहून नर्मदा ओलांडून दक्षिणेत शिरले. लगेच रेल्वेत बसून आग्रा गाठले, अन् भिडू निघाला तिथून पायी. सामानाचा लबेदा नाही. पाठीवर एक पिशवी, तिच्यांत कपड्यांचा जोड आणि एक पांघरूण. कोण करतो हो, हे सगळे ? कुणाच्या छातीत एवढी हिंमत ? 

आम्ही एकदा निघालो रायगडावर. दिवस होते सरत्या उन्हाळ्याचे. मी, पुरंदरे, अमरावतीचे देशमुख आणि बेदरकर. म्हटलें, की लवकरच पावसाळा लागेल, आणि मग मार्ग बंद होईल. पण कोंझर सोडून पाचाडच्या चढाला लागलो, अन् जी वळवाच्या पावसाने झोडायला सुरूवात केली !

क्रमशः….  

लेखक  – गोपाल नीलकण्ठ दाण्डेकर 

संग्राहिका –  सुश्री प्रभा हर्षे 

पुणे

भ्रमणध्वनी:-  9860006595

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments