श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ रंगमंच ☆ नाटकावर बोलू काही: आनंद – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
‘नटसम्राट’ या नाटकाचे लेखक आणि या नाटकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले वि. वा. शिरवाडकर यांची ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘आनंद’, दूसरा पेशवा, ‘कौंतेय’, विदूषक, अशी आणखीही अनेक उत्तम नाटके आहेत. ही सारी नाटके बघू जाता, त्यांना नाट्यलेखनाचे सम्राटच म्हणायला हवं. ‘आनंद’ हे असंच एक उत्तम नाटक. या नाटकाचा पहिला प्रयोग, नाट्यसंपदा मुंबई या संस्थेद्वारे १८ ऑक्टोबर १९७५ रोजी साहित्य संघ मंदिर मुंबई इथे सायंकाळी ७ वाजता सादर करण्यात आला. पुढे या नाटकाचे किती प्रयोग झाले माहीत नाही. नाटकापेक्षा यावरचा चित्रपट अधीक गाजला पण एखादी कलाकृती किती वाजली-गाजली यावर काही त्या कलाकृतिचे मोल ठरत नाही.
‘आनंद’ नाटकाचे मूळ श्री हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘आनंद’ चित्रपटातलेच आहे. मरण समोर उभे असताना, एक मनुष्य, हसत-खेळत, प्रत्येक परिचितात स्वत:ला गुंतवून घेत, भोवतालच्या जीवनात सुखाच्या लहरी निर्माण करीत आपला अस्तकाल एका बेहोष धुंधीत व्यतीत करतो, ही कल्पना मला अतिशय हृद्य वाटली.’ असं सुरूवातीला, श्री हृषिकेश मुखर्जी यांचे आभार मानताना वि. वा. शिरवाडकर यांनी म्हंटले आहे. ‘कथासूत्र मूळ चित्राचेच असले, तरी त्याला नाट्यरूप देताना मी मला इष्ट वाटले, ते बदल त्यात केले आहेत. त्यामुळे पडद्यावरचेच सारे काही आपण नाटकात पाहात आहोत, असे प्रेक्षकांना अथवा वाचकांना वाटणार नाही, असा मला विश्वास वाटतो,’ असेही त्यांनी पुढे म्हंटले आहे.
‘आनंद’ नाटकात लेखकाने आनंद ही अफलातून व्यक्तिरेखा निर्माण केली आहे. नाटकातील डॉ. संजय सांगतो त्याप्रमाणे तो थोडा कवी आहे. थोडा नट आहे. थोडा विदूषकही आहे. कवी असल्यामुळे तो खूपसा कल्पनेत रमणारा आहे. क्वीकल्पनानेकदा सत्याच्या अधीक जवळ जाते. आनंदचे बोलणेही तसेच आहे.
नाटकाचं थोडक्यात कथानक असं – डॉ. संजय आणि डॉ. उमेश मित्र आहेत. त्यांचा तिसरा मित्र डॉ. शिवराज नागपूरला आहे. तो आपला मित्र आनंद याला त्यांच्याकडे पाठवतो. आनंद हा खरं तर जगन्मित्र. त्याला लिफोसारकोमा इंटेस्टाईन हा दुर्धर आजार आहे. तो संजयकडे येतो. संजय, उमेशचा मित्र बनतो. मेट्रन डिसूझाचा मुलगा जोसेफ बनतो. मुरारीलाल किंवा महम्मदभाईचा, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड बनतो. संजायच्या बायकोचा भाऊ आणि उमेशच्या प्रेयसीचा राजलक्ष्मीचा दीर बनतो. मुरारीलाल्ला तो सरकारी कोट्यातून चित्रपट निर्माण करण्यासाठी कर्ज मिळवून देतो. डॉ. उमेशचं अबोल प्रेम मुखरीत करतो. आनंदची प्रेयसी मधुराणी नाटकात ३-४ वेळा आपल्याला भेटते. ३ वेळा त्याचा आठवणीतून आणि अगदी शेवटी वास्तवात. आनंदला आपल्या आजाराची कल्पना आहे, म्हणूनच त्याने तिला प्रत्यक्षात दूर सारलय पण मानाने ती त्याला बिलगूनच आहे.
आनंदचा स्वत:चा प्रयत्न आपलं दुर्धर आजारपण विसरण्याचा आहे पण त्याच्या जवळीकीच्या माणसांच्या डोळ्यात त्याच्या मृत्यूचा भय तरळताना त्याला दिसतय, त्यामुळे तो कासावीस होतोय. नाटकाची अखेर त्याच्या मृत्यूनेच होते पण त्यापूर्वी नाटकाचा एक भाग म्हणून केलेले स्वागत आणि शेवटी टेपवर म्हंटलेलं तेच स्वागत, अप्रतिम!
आनंद क्वीमानाचा आहे. त्यामुळे नाटकात अनेक सुंदर कवितांचा वापर झालेला आहे. इतकंच नव्हे, तर यातले गद्य संवादही काव्याचा बाज घेऊन येतात. ‘काही बोलायाचे पण बोलणार नाही,’ हे लोकप्रिय गाणं आणि
‘प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रम म्हणजे जंगल हून जळत राहणं
प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा मेघापर्यंत पोचलेलं’
ही प्रसिद्ध आणि रसिकप्रिय कविता यातलीच.
नाटकाचं सूत्रगीत आहे,
माझ्या आनंदलोकात चंद्र मावळत नाही
दर्या अथांग प्रेमाचा कधी वादळत नाही.
माझ्या आनंदलोकात केले वसंताने घर
आंब्या आंब्याच्या फांदीला फुटे कोकिळेचा स्वर
सात रंगांची मैफल वाहे इथे हवेतून
इथे मारणही नाचे मोरपिसारा लेउन
नाटकाची भाषा भर्जरी वैभव मिरणारी, तिचा तलम, मुलायम, कोमल, हळवा पोत, या सार्यावर अत्तरासारखा विनोदाचा शिडकावा आणि मुख्य म्हणजे त्यातून व्यक्त झालेलं आनंदचं तत्वज्ञान, ’ उद्या येणार्या पाहुण्याच्या ( मृत्यूच्या) फिकिरीत माझी जिंदगी आज मी जाळून टाकणार नाही. मी असा जगेन की माझा जगणं क्षणाक्षणाला तुम्हाला जाणवत राहील. आषाढातल्या मुसळधार पावसासारखं…’ किती किती म्हणून या नाटकाची वैशिष्ट्ये सांगावीत!
एखाद्या नाट्यसंस्थेने नव्याने हे नाटक रंगांमंचावर आणायला हवं.वाचकांनी हे नाटक एकदा तरी वाचायला हवं आणि त्याचा सारा ‘आनंद’ आपल्यात सामावून घ्यायला हवा.
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 ईमेल – [email protected] मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈