डाॅ.भारती माटे
वाचताना वेचलेले
☆ कुटुंबातील मॅनर्स… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
सुई दोरा वापरण्याचा एक नियम पुर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की, समजा एखाद्याने दोऱ्याने काही शिवलं आणि ओवलेला दोरा संपला तर त्याने परत सुईत दोरा ओवून गाठ मारुन तो नीट रिळाला गुंडाळून ठेवायचा. दुसऱ्याला सुईला दोरा लावलेला मिळतो, त्याचं काम झालं की त्यानं परत तेच करायचं.
पुर्वीच्या काळी पाण्याचे बंब असायचे. एकत्र कुटुंब असायचं. गरम पाण्याच्या बाबतीतही हा नियम असायचा की जो बंबातून पाणी घेईल त्यानं आंघोळीला जाण्यापुर्वी दुसऱ्यासाठी बंबात पाणी भरायचं. दुसऱ्यानं तिसऱ्यासाठी, जेणेकरुन वेळ आणि इंधन बचत व्हायचीच पण गैरसोयही टाळता यायची.
सुबत्ता वाढत गेली तसतशी एकमेकांवर अवलंबून जगण्याची जीवनशैलीही बदलत गेली. आता दुसऱ्याचा विचार करण्याची वेळ वारंवार येत नाही, पण याचा अर्थ तो करायचाच नाही असं मात्र नाही.
आपला पेपर वाचून झाला की त्याच क्रमानं नीट पुरवणी आत ठेऊन निश्चित जागी ठेवला तर दुसऱ्याला ताजा पेपर वाचल्याचा फील येतो नि शोधाशोध पण करावी लागत नाही.
पाण्याची बाटली आपण रिकामी केली तर लगेच भरुन फ्रीज मधे ठेवली तर ही साखळी चालू राहून एकालाच हे काम करावं लागत नाही.
बेसिनपाशी हँडवाॅश संपत असतं. ज्याला कळेल त्यानं रिफिल करायचं हा नियम केला तर कोणालाही त्रास होणार नाही.
पाण्याचा ग्लास, चहाचे कप आपापले धुवून, घासून ठेवायचे हा नियम घरात पाळला तर भांडी कमी साठतील.
खाऊ, फळं, नियमित खाल्ले जाणारे पदार्थ किंवा कात्री, स्टेपलर, सेलोटेप सारख्या वस्तू एकाच जागी ठेवणे. आपली टर्न आल्यावर संपल्या नि बिघडल्या तर आठवणीने आणणे, ही काळजी घेणे.
घर सगळयांचं असतं. सगळी जबाबदारी गृहिणीची असं म्हणून जबाबदारी झटकून न टाकता एकत्र रहाण्याचे मॅनर्स सगळयांनीच शिकायची गरज आहे. प्रेमात आणि नात्यात एकमेकांसाठी कामं केली जातात पण त्यामुळेच एकत्र जगण्याच्या शिस्तीला तडा जातो नि चुकीच्या सवयी लागतात.
घर ही एक संस्था समजून घराची एक शैली एक नियमावली जरुर तयार करा. हे एक लहानसं युनिट समजा. देशात अराजकता माजू नये म्हणून कायदे असतात तसे घरातही काही नियम असले पाहिजेत तरच त्याचं हाॅटेल होणार नाही (खरंतर हाॅटेलचे सुध्दा नियम असतातच).
ही एक संधी आहे. घराला घरपण देण्याची. सगळे घरात आहेत, काही एकत्र सवयी लावून घेतल्या तर भविष्यात नक्कीच फायदा होईल.
आपल्या घरामध्ये कोणाचाही फोन आला तर एकमेकांना त्यांचे निरोप न विसरता देणे घरातील कोणाकडेही मित्र मैत्रीण आल्यास त्यांचे यथोचित स्वागत करणे.घरी येणारी व्यक्ती ही कुटुंबाची मैत्री आहे समजून त्यांचे आदरातिथ्य करूया. घरातील प्रत्येक वस्तूवर व्यक्तींची नावे असलीच पाहिजेत असे नाही. बहुतेक सर्व वस्तू कॉमन असतात. त्याला ही घर पण म्हणतात.तसेच घरातील कोणतीही खाण्यापिण्याची वस्तू संपविण्यापूर्वी कोणी खायचे राहिले नाही ना ? अशी चौकशी करावी. घरातील प्रत्येकाचे दिवसभराचे काम, अंदाजे वेळापत्रक,उद्योगातील आर्थिक व्यवहार एकमेकांना माहिती असण्याची आवश्यकता आहे.
कुटुंबातील माहेरची किंवा सासरची व्यक्ती असो सर्वांचे समान आदरातिथ्य असावे अशा प्रकारच्या गोष्टींना कुटुंबातील मॅनर्स किंवा संस्कार असे म्हणतात, याचे खूप चांगले परिणाम पुढील पिढीवर होतात.
संस्कार संस्कार म्हणजे आणखी वेगळं काही नसतं.
लेखक : अज्ञात
संग्रहिका : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈