वाचताना वेचलेले
☆ धारणा… – लेखक : ओशो ☆ प्रस्तुती – सौ. वर्षा राजाध्यक्ष ☆
☆
गौतम बुद्धांकडे एकजण आला आणि त्याने विचारलं, भगवान, आत्मा आहे की नाही?
बुद्ध म्हणाले, स्वत:च्या आत उतरूनच याचा शोध घेता येईल तुला.
तो म्हणाला, ते मी करीनच. पण, मुळात आत्मा आहे की नाही, ते सांगा.
बुद्ध म्हणाले, मी तुला आत्मा आहे, असं सांगितलं तरी ते खोटं आहे आणि आत्मा नाही, असं सांगितलं तरी तेही खोटंच आहे.
तो माणूस म्हणाला, असं कसं होईल? दोन्ही खोटं कसं असेल? एकतर आत्मा आहे हे खोटं असलं पाहिजे किंवा आत्मा नाही हे खोटं असलं पाहिजे.
बुद्ध म्हणाले, मी यातलं काहीही एक खरं आहे, असं सांगितलं तर तीच धारणा घेऊन तू अंतरात्म्यात उतरशील आणि मग आत्मजाणीव झाली तरी नाकारशील किंवा ती झाली नाही, तरी ती खोटी खोटी करून घेशील.
माणसांना हव्या त्या गोष्टी ‘पुराव्याने शाबित’ करता येतात, त्याचं कारण हेच आहे. आपली धारणा हेच अंतिम सत्य आहे, यावर माणसाचा विश्वास पटकन् बसतो आणि तो त्यादृष्टीनेच सगळ्या विचारव्यूहाची मांडणी करतो, तसेच पुरावे त्याला सापडत जातात. तेवढेच ‘दिसतात. ‘ माणसं ध्यानात, अंतरात्म्यापर्यंत उतरतानाही धारणांची ही वस्त्रं त्यागू शकत नाहीत. ती ‘स्व’च्या तळात उतरतानाही हिंदू असतात, मुसलमान असतात, ख्रिस्ती असतात, बौद्ध असतात… मग त्या त्या धारणांनुसार त्यांना ‘स्वरूप’दर्शन घडतं आणि तीच त्यांना आत्मजाणीव वाटू लागते… तो त्यांच्या धारणांनी निर्माण केलेला एक आभास आहे, हे त्यांच्या लक्षातच येत नाही.
☆
लेखक: ओशो
प्रस्तुती: सौ. वर्षा राजाध्यक्ष
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈