डाॅ.भारती माटे
वाचतांना वेचलेले
☆ :: इठ्ठला :: ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
इठ्ठला… किती येळ असा
रहाणार रं उभा
इथं कुणीबी तुले म्हण्णार न्हाई
बस की रं बाबा…!
तुझ्यासंगं रख्माई बी
हाये ना रं हुभी…
तिचा इचार कर की जरा
ती बोलायची न्हाय कधी…!
पाय बी किती दुखून दुखून
गळले असतील की रे…
चार घटका बस ना जरा
वाटल की रं बरे…!
बस जरा थोडं तेल
लावते गरम गरम…
पायांले पडल आराम
पडतील जरा नरम…!
किती काळ वाट पाहणार
आता पुंडलिकाची…
वारकरी पाई येतात
तिबी रुपंच की रं त्याची…!
बास झालं सोड आता
हट्ट जगायेगळा…
रख्माईसंग बैस अता
हो बंधनातून मोकळा…!
कटीवरचे हात बी जरा
उतरव आता खाली…
भक्तासाठी आजवर तुझी
लय परीक्षा झाली…!
इटेवर हाइस उभा
तसा तू मनात बी आमच्या हायेस…
अठ्ठाईस युगं कधी व्हणार
आता तू आमचं ऐकणार हायेस…
कर थोडा आराम
रख्माईला दे तू येळ…
बायको खूश तर आपच रंगतो
संसाराचा खेळ…!!!
कवयित्री : ©डॉ.प्रितीराणी जुवेकर
संग्रहिका : डॉ. भारती माटे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈