डाॅ.भारती माटे

वाचतांना वेचलेले

 ☆ :: वारी… :: ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

 पंढरपूरचा विठु काल

 अचानक आला घरी 

आणि म्हणाला, आवर लवकर बयो

निघालेत वारकरी ।।

 

मी म्हणाले निघते हं विठु घरचं एकदा बघते।

शाळा सुटेल मुलांची त्यांना घेऊन येते।।

 

लगबग माझी सुरू झाली 

नवऱ्याचे कपडे बघू की

मुलांसाठी खाऊ करु

एवढया कमी अवधीत

सगळं कसं आवरू ?

 

शेवटी एकदाची तयार झाले

आणि उंबऱ्यापाशीच थबकले ।

काळजातली गलबल लपवु पाहत होते।

डोळ्यांमधले अश्रु थोपवू पाहत होते ।।

 

नीट राहतील सगळे तुझ्याशिवायही घरी।

मीच मला समजावत होते परोपरी ।

 

घालमेल बघून तो हलकेच हसून म्हणाला,

यंदा असु दे,बघु पुढे केंव्हातरी ।।

 

माझा एक पाय आत,एक पाय बाहेर।

वाट अडवत होतं सासर, खुणवत होतं माहेर ।।

 

आता डोळ्यांमधलं पाणी काही केल्या थांबेना।

मला सोडून मग त्याचाही पाय निघेना।।

 

मी म्हणाले, सोपं नसतं रे विठु हे दुहेरी जगणं।

संसाराचे पाश तोडून तुझ्या मागे लागणं ।।

 

उपाय खूप सांगितलेत रे, मीच पडते कमी।

तूच आता काहीतरी दे बाबा हमी।।

 

कुणी म्हणतं ममत्व सोड ।

कुणी म्हणतं चाललंय ते मानून घे गोड ।

 

गोड मानता मानता ममत्व येणारच ना रे ।

गुंतलेला जीव प्रवाहात दूरवर जाणारच ना रे।।

 

एकच भीती वाटते विठु,

प्रवाहात पोहताना एक दिवस अचानक

तुटून जाईल ही श्वासाची दोरी ।

आणि कधीच घडणार नाही रे,

तुझ्या पंढरपूरची वारी ।।

 

माझ्या डोळ्यातले अश्रु त्याने अलगद पुसले ।

त्याच्याही डोळयांत कुठेतरी मला ते दिसले।।

 

माझ्या डोक्यावर हात ठेवून तो म्हणाला,

संसार सोडू नकोस,एक फक्त कर

 

श्वासाच्या दोरीवर नाव माझं झुलत ठेव।

चित्ताच्या पटलावर रूप माझं फुलत ठेव ।।

 

इंद्रियांना करू देत त्यांचं काम ।

मनावर मात्र घाल चांगला लगाम ।।

 

मग विषयांच्या गर्तेत मन तुला नेणार नाही।

प्रवाहात पोहताना दमछाक तुझी होणार नाही।।

 

तुझ्या हृदयातला माझा अंश ,त्याला ठेव साक्षी

 त्याचीच असू दे तुझ्यावर सत्ता ।

 

मग बघ …… 

 

मन,बुद्धी ,चित्त,अहंकार..

हळूहळू सुटेल आपोआप सगळा गुंता ।।

 

हळूहळू मग अहंकाराचं बंधन तुटेल।

हळूहळू संसाराची भ्रांत फिटेल ।।

 

अहंकार गेला की ममत्वही सुटेल ।

रज-तमाचं कवाड एक एक करून मिटेल ।।

 

 हळूहळू गळून पडेल मग एक एक पाश ।

हळूहळू निरभ्र होईल मनाचं आकाश ।।

 

 निर्विकल्प मनाला मग पैलतीर दिसेल।

आणि विश्वास ठेव पोरी !

 

पैलतीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।

पैलतीरावर हात देण्यासाठी, चंद्रभागेच्या काठी मी उभा असेल ।।

  जय हरि  

 

कवी : अज्ञात 

संग्रहिका : डॉ. भारती माटे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments