सुश्री सुनीला वैशंपायन
वाचतांना वेचलेले
☆ ‘दहीकाला…’ ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆
ब्रह्मरूप दहीहंडी टांगलीसे आकाशात ।
दहीदूधरूपी मोद भरुनी राही तयात।।१।।
आनंद तो मिळवण्या मानव करितो यत्न ।
परी उपायांनी नाना नाही होत हस्तगत ।।२।।
कामक्रोधादिक गोप जेव्हा शिर नमविती ।
आत्मरूप तो श्रीकृष्ण । चढे त्यांच्या खांद्यावरती ।।३।।
अहंकार घट फुटे परब्रह्मरूप भेटे ।
साधकास मिळताती आनंदरूपाचे साठे ।।४।।
मग परब्रह्म हंडी येई तयाच्या हातात ।
गोपरूपी इंद्रिये ती आनंदाने नाचतात ।।५।।
सारे काही एकंकार मावळले आपपर ।
परमात्मस्वरूपी त्या आत्मा झाला तदाकार ।।६।।
ऐसा दहीकाला झाला जीव शिवासी भेटला ।
ऐसा कृष्णजन्म आम्ही साजरा असे तो केला ।।७।।
संग्रहिका : सुश्री सुनीला वैशंपायन
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈