वाचताना वेचलेले
☆ दारात उभे म्हातारपण….कवी: नेने प्रभाकर ☆ प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे ☆
दारात उभे म्हातारपण
त्याला आत घेणार नाही
उत्साहाने बाहेर भटकेन
त्याकडे लक्ष देणार नाही!१!
उभा राहूदे दारात त्याला
ढुंकूनही बघणार नाही
आजही मी तरुण आहे
त्यास घरात घेणार नाही!२!
जन्मा बरोबर असलेला
मृत्यू मला ठाउक आहे
उत्साहाने बाहेर भटकेन
जरी तो माझ्या मागे आहे!३!
विसरेन जन्म तारीख
म्हातारपणाला थारा नको
किती मी चंद्र पाहिले
त्याचा हिशोब ठेवायला नको!४!
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर
तारुण्याची चमक असेल
उत्साहाने काम करण्याची
हातापायात धमक असेल!५!
प्रेम देईन प्रेम घेईन
मित्रांच्या सहवासात राहीन
दररोज संध्या झाली की
एकच पेय प्रेमरस पीईन!६!
हाकला त्या म्हातारपणाला
जन्म तारीख विसरून जा
सकाळ झाली की खिडकीतून
कोवळे उन पहात जा!७!
दारात उभे म्हातारपण
त्याला आत घेणार नाही
उत्साहाने बाहेर भटकेन
त्याच्याकडे लक्ष देणार नाही!८!
प्रस्तुति – सुश्री माधुरी परांजपे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈