मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सहज काही साधं सोपं !” –  लेखक : अज्ञात – अनुवाद : स्मिता गानू जोगळेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “सहज काही साधं सोपं !” –  लेखक : अज्ञात – अनुवाद : स्मिता गानू जोगळेकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित 

(आमच्या गुजराती शाळेच्या ग्रुपवर एक छान (गुजराती) मेसेज आला त्याचा स्वैर अनुवाद करायचा मोह आवरला नाही.)

नाही दुखत पावलं टाचा मुंगीचे कधी 

कि हत्ती नाही करत विचार वजन कमी करण्याचा 

 *

कोळ्याला नाही वाटत भीती चढताना पडण्याची 

घारीला नाही वाटत भीती उंच भरारी घेण्याची 

 *

हरणाला कधीच होत नाही गुडघेदुखी सांधेदुखी 

आणि नाही करत साप कंटाळा सरपटण्याचा कधी 

 *

सिंहाला नसते चिंता उद्याच्या शिकारीची 

जिराफाचे नाही झिजत माकडहाड किंवा मणका कधी 

 *

पाण्यात डुंबत राहूनही नाही होत सर्दी म्हशीला कधी 

आणि चोवीस तास उभे राहूनही थकत नाही घोडा कधी 

 *

उच्च स्वरात कूजन करूनही नाही बसत घसा कोकिळेचा कधी 

पक्षी नाही अपेक्षा करत वडिलोपार्जित घराची कधी 

 *

मग आपल्यालाच का 

भय चिंता कंटाळा थकवा झीज स्खलन 

काळजी माया भोग आणि रोग.. !

 *

पशु पक्ष्यांसारखे सहज सोपे साधे 

जगता आले तर ! 

प्रयत्न तर करून बघावा 

 *

मला हे अद्भुत शरीर देणाऱ्या हे परमेश्वरा…..

कोणताही अर्ज केला नव्हता 

नव्हता लावला कोणताही वशिला 

तरीही 

डोक्यावरच्या केसांपासून पायाच्या अंगठ्यांपर्यन्त 

चोवीस तास रक्त प्रवाहित ठेवतोस 

जिभेवर नियमित लाळेचा अभिषेक करतोस 

निरंतर पडत राहतात ठोके हृदयाचे लयबद्ध 

असं ते कोणतं यंत्र बसवलं आहेस देवा 

 *

पायाच्या नखापासून मेंदूच्या अंतिम टोकापर्यंत 

निर्वेध संदेशवहन करत राहतोस 

कोणती शक्ती आहे ही.. नाही कळत मला.

 *

हाडं आणि मांस यांच्यामधून वाहणारं रक्त 

याचे मूळ आणि अर्थ कसे मी शोधावे

 *

हजार हजार मेगापिक्सेलवाले दोन कॅमेरा 

अहोरात्र बारीक बारीक दृश्य टिपत असतात 

 *

दहा हजार चवी आणि अगणित संवेदनांचा अनुभव देऊ शकणारी 

जिव्हा नामक अफाट सेन्सर प्रणाली 

 *

विविध फ्रिक्वेन्सीचे आवाज काढणारी स्वरप्रणाली 

आणि येणाऱ्या असंख्य आवाजाचं कोडिंग डिकोडिंग करणारे कान 

 *

७५ टक्के पाणी असणाऱ्या शरीररूपी टँकरच्या 

त्वचेवर असणारी कोट्यवधी छिद्र 

पण नाही येत कधी प्रश्न लिकेज आणि सिपेजचा

 *

कोणत्याही आधाराशिवाय उभा राहू शकतो मी ताठ 

गाडीचे टायर झिजतात पण नाही झिजत माझी पावलं कधीही 

 *

केवढी अजब रचना, काळजी, शक्ती, यंत्रणा, प्रतिपाळ 

स्मृती शांती समज ही…… सगळंच अदभूत अविश्वसनीय 

माझ्या शरीररूपी अचाट यंत्रात कोणता तंत्रज्ञ बसला आहे न कळे 

या सगळ्याचे भान ज्ञान राहू दे बस,

तूच बसवलेल्या वसवलेल्या आत्म्यामध्ये.

राहो सदबुद्धी कृतज्ञता स्मरण, चिंतनाचे भान 

हीच एवढी प्रेरणा प्रार्थना.

परमेश्वरा…. तू कोण कुठे असशील त्या चरणी.

 

मूळ कर्ता : अज्ञात 

अनुवाद : स्मिता गानू जोगळेकर

प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈