सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

📖 वाचताना वेचलेले 📖

🌼 माणसाची ओळख… लेखक – अज्ञात ☆ संग्राहिका – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी ☆

ज्यांच्याबद्दल अतोनात विश्वास असतो, ती माणसं कधीकधी इतकी धक्कादायक वागतात की त्या धक्क्याने आपण कोसळून जाऊ असं वाटू लागतं. जवळच्या माणसांनी केलेले विश्वासघात फार जिव्हारी लागणारे असतात. त्यामुळे लौकिक अर्थाने आपलं फारसं नुकसान झालेलं नसलं तरी भावनिक पातळीवर कधीही न भरून निघणारी हानी झालेली असते.

माणसांवरचा विश्वास उडू लागतो अशाने फार हट्ट करावासा वाटत नाही मग कशाहीसाठी आणि कोणाहीसाठी. अर्थात या पासिंग फेजेस असतात. त्या येतात आणि पुरेशी वेदना सोसून झाल्यावर जातातही. आपण आपल्या मूळ स्वभावावर येतोच पुनःपुन्हा!

पण तरीही,

फार जवळून अनुभवलं की प्रत्येकाचेच पाय मातीचे आहेत हे दिसू लागतं. मग आपण उदास होऊ लागतो. एवढ्यातेवढ्याने भारावून जाण्याचा आपला स्वभाव असू नये आणि कोणालाही पराकोटीचा आदर्श मानून बसू नये.

माणसं म्हटली की वर्तनात कमी जास्त गोष्टी व्हायच्याच आणि ते अगदी नैसर्गिक आहे. माणसांतली नाती पूर्णतः नि:स्वार्थ कधीही नसतात आणि त्यात वावगंही काही नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवं. म्हणजे अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही.

प्रत्येक मानवी नात्यात अडचणी येतातच. पण त्या सगळ्या अडचणींवर, कसोट्यांवर मात करून अखेरपर्यंत आपल्या सोबत उरतात….. ती खरी आपली माणसं. ज्यांचे हात उगीचच निसटले ते प्रवासातले तात्पुरते सोबती होते इतकंच समजायचं आणि पुढे चालू लागायचं.

रस्त्यात सांडून गेलेले सगळेच मोती वेचून आणायचं त्राण आपल्यात नसतं आणि प्रत्येकवेळी तसा हट्टही आपण करायचा नसतो. निमूटपणे विनातक्रार आपल्यासोबत चालत आलेल्या पावलांवर भिस्त ठेवायची फक्त.

ती आणि तेवढीच माणसं फक्त आपली समजायची. ऊस काढताना कोयत्याने पाचट सोलून काढतात, तशी माणसांची निवड करत रहावी लागते कायम. सरावाने ‘ओरिजिनल’ माणसं ओळखू येतात आपल्याला. भले ती चुकत असतील लाखदा, पण आपला हात सोडून जाणार नाहीत, त्यांची आपल्यावर असलेली माया कदापि आटणार नाही.

अशी चांगली माणसंही असतात आपल्या आयुष्यात अनेक…. ती मात्र जपायला हवीत.

काही लोकांसाठी आपण केवळ ‘सोय’ असतो. ते त्यांच्या सोयीने आपल्याशी वागतात, गैरसोय वाटेल तेव्हा दूर जातात. आपल्याला कोणीतरी स्वतःच्या सोयीनुसार वापरलं आणि आपण मात्र किती जेन्युईनली ते माणूस जपण्याचा प्रयत्न केला हे जेव्हा लक्षात येतं, तो क्षण फार फार दुखरा असतो.

जगताना सगळीच माणसं लागतात आपल्याला…. नाही असं नाही. पण कोणावर विश्वास टाकायचा, कोणाला जवळ करायचं आणि कोणासाठी नात्यात काही अदृश्य भिंती कायम घालून ठेवायच्या हे आपल्याला ठरवावंच लागतं. नाहीतर आपला साधेपणा हा भाबडेपणाच्या मार्गाने जाऊन बावळटपणा ठरू शकतो.

माणसं जोखणं जमायलाच हवं. समोरच्या माणसाचं ‘असत्य’ रूप आपल्याला माहिती असूनही आपण ते माहिती नसल्यासारखं दाखवणं आणि त्याच्या वागण्यातून दिसणारे विरोधाभास अनुभवणं ही गमतीदार गोष्ट असते. खोटंनाटं, उलटंपालटं बोलून-वागून आपण समोरच्याला फसवू शकतो असं काही लोकांना वाटत असतं. त्यांच्या वर्तनातल्या विसंगती आपल्या लक्षात आलेल्या असतात. मग तर त्यांची कीव येते अक्षरशः….. का वागत असतील माणसं अशी? स्वतःसह इतरांना का फसवत असतील?

ज्यांच्याशी अगदी पटतच नाही, त्यांच्यासोबत सुद्धा वाद घालून किंवा स्पष्टीकरणं देऊन आपण आपलं मानसिक स्वास्थ्य घालवू नये असं मला वाटतं. कटुता आणून, खळखळ आवाज करत नाती संपवू नयेत. झाडावरून जितक्या सहजतेने फूल निसटतं, तितकी सहजता आपल्यात असावी…. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून बाजूला होताना…

लेखक : अज्ञात 

संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments