📖 वाचताना वेचलेले 📖
☆ भेट… कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆
☆
काही माणसांचं भेटणं,
म्हणजे वाळवंटात पाण्याचा थेंब भेटण्यासारखं असतं..
त्यांच्या असण्यानंच,
मनाचा समुद्र होऊन जातो..
मृगजळाप्रमाणे आयुष्यात येणारी ही माणसं कधी भेटूनही न भेटणारी
आणि न भेटताही कधीतरी
सतत सोबत असणारी..
गोतावळ्यातला एकांत वेगळा
आणि एकांताचा गोतावळा वेगळा..
प्रश्न भेटीचा नसतोच मुळी
प्रश्न असतो भेटीत
दोघेही मनाने असल्याचा..
दोघेही भेटीत मनाने
एक झाले की
मग भेटही भेट राहत नाही
त्याचा आठवणींचा झरा होतो..
फक्त वाहणारा झरा..
ना त्याला सुरुवात
ना त्याला शेवट
ते फक्त वहाणं असतं सोबतचं..
झरा वाहतानाचं संगीत ऐकलेयत?
ना राग मल्हार ना भैरवी
ना यमन ना ठुमरी
खळाळणारं पाणी हिरवीगार शांतता छेदत फक्त पुढे चालत असतं..
‘वाळवंटाची हिरवळ’
चालता चालता कधी होऊन जाते
कळत देखील नाही..
आपल्या माणसाचं भेटणं हे असं असतं
वाळवंटात हिरवळ भेटण्यासाखं..
कवी : अज्ञात
प्रस्तुती :सौ. उषा नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈