? वाचताना वेचलेले ?

सहज संस्कार… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆

नवविवाहित दांपत्य यथावकाश एका बाळाला जन्म देवून आई बाबांच्या भूमिकेत येतं. मूल हसतं, खेळतं, रडतं, आजुबाजूला पाहतं, वेगवेगळे आवाज ऐकतं, ओळखीचे चेहरे पाहून त्याची कळी खुलते, अनोळखी चेहरे त्याला गोंधळात टाकतात, ते अखंडपणे हातपाय हालवत असतं. घरातले, शेजारी, नातेवाईक बाळ बघून त्याच्याशी बोलत असतात. ते बाळ कुतूहलाने सगळ्यांकडे पहात हळूहळू मोठं होत असतं.

बाळाच्या निरागसतेने सगळ्या घरात नवचैतन्य संचारतं.

हे निरागस बाळ तुमच्या माध्यमातून या जगात आलं, तरी ते सर्वस्वी तुमचं नसतं. त्याचा सांभाळ करताना त्याला संस्कारित करण्याची तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. या नकळत्या वयात तुम्ही त्याच्यावर जे जे संस्कार करता, ते सर्व ते चटकन ग्रहण करते.

तुमचं खरं खोटं बोलणं, तुम्ही इतरांची जी स्तुती किंवा निंदानालस्ती करता, कुणाला मदत करता, कोणाचं हिसकावून घेता, कुणाबद्दल तुमची करुणा, कोणाचा तुम्ही केलेला छळ, तुमचा स्वार्थ, परमार्थ, तुमचा धर्म आणि अधर्म, तुम्ही एकमेकांशी कसे वागता, बोलता, आदराने वागता की अनादर करता, मृदूमधूर स्वरात बोलता की कर्कश्शपणे, असे सारे काही त्या बाळावर परिणाम करत असते. यातूनच पुढे ते सुसंस्कृत होईल की असंस्कृत, हे ठरतं.

थोडक्यात तुमचं बाळ तुमच्या गुण किंवा अवगुणांचा विस्तार असतं. म्हणून खूप विवेकाने वागा.

स्वामी विवेकानंद म्हणतात : या विश्वात प्रत्येक गती चक्राकार आहे. त्याचा जिथून आरंभ होतो, तिथेच फिरून शेवट होतो, तोपर्यंत वर्तुळ पूर्ण होत नाही. आणि वर्तुळ पूर्ण होते, तेव्हा तुम्ही जे दिले, तेच तुम्हाला परत येऊन मिळते. तुमची इच्छा असो वा नसो.

तुम्ही एकदा चुकलात की त्या चुकीचा जणू वज्रलेप झाला. तुम्ही चूक कबूल करून क्षमा मागितली तरी निरागस अपत्याला तुमचे स्पष्टीकरण, समर्थन समजत नाही. तुम्ही केलेली कृती समजते.

तुम्ही बाळ अगदी गर्भात असल्यापासूनच त्याच्याशी संवाद सुरू करा. तुम्ही त्याच्या आगमनाची उत्कटतेने प्रतिक्षा करत आहात, हे त्याला सांगा.

तुम्ही जे जे बोलता, त्याचा अर्थ त्याला कळला नाही, तरी त्यामागील भावना त्याला कळतात. ते निश्चिंत होतं किंवा भयभीत होतं.

ज्यांचं बालपण असुरक्षित असतं, ते आक्रमक, हिंसक होतात. ज्यांची प्रेमाने काळजी घेतली जाते, ते इतरांची काळजी घ्यायला शिकतात.

तुमच्या वर्तनातून तुमचं अपत्य स्वत:च्या स्वभावाची जडणघडण करीत असतं.

थोडक्यात, हिंदू तत्त्वज्ञानातील अत्यंत महत्त्वाच्या कर्माच्या सिद्धांताच्या सत्यतेचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेत असता.

तुम्ही जे पेराल तेच उगवतं हे नीट समजून घ्या. जे उगवावं असं वाटतं, तेच पेरा.

महाभारतात पितामह भीष्मांचं एक अत्यंत महत्त्वाचं वचन आहे, ज्याची सत्यता कालातीत आहे.

ते म्हणतात ” पेरलेले बीज, केलेले कर्म आणि उच्चारलेले वचन कधीच निष्फळ ठरत नाही. ” ते फळाला जन्म देतंच देतं. हा शाश्वत सिद्धांत आहे, आणि नियती याची अंमलबजावणी अत्यंत काटेकोरपणे, प्रसंगी निर्दयतेने करते.

 

मोठमोठी साम्राज्ये लयाला जातात, राजघराणी अन्नाला महाग होतात, श्रीमंती पाहता पाहता लुप्त होते, कुटुंबांचा निर्वंश होतो, जिथे कधीकाळी ऐश्वर्य नांदत होते, तिथे घुशी बिळं करतात, वटवाघळं वस्ती करतात.

हे ऐकायला भयंकर वाटेल पण याची सत्यता कोणत्याही समाजाला अनुभवास येते.

यासाठीच हिंदू संस्कृतीत सकारात्मक, पवित्र, भावात्मक, प्रेम संक्रमित करणारे, ईश्वरी अधिष्ठानावर दृढ विश्वास ठेवून सुसंस्कार केले जातात. आपल्याला अपत्यांवर असेच संस्कार करायचे आहेत.

मूल संस्कारित करताना, त्याला उगवता सूर्य दाखवा, पक्षांची किलबिल ऐकू दे, सुस्वर संगीत ऐकवा, काऊचिऊच्या गोष्टी ऐकवा, गायीचा स्पर्श अनुभवू द्या, स्पर्शातील प्रेमाने थरथरणारी गायीची त्वचा त्याला प्रेम स्पर्शाने संक्रमित होतं, हे न सांगता कळायला लागेल.

कुत्र्याच्या पाठीवर हात फिरवला की तो किती प्रेमाने प्रतिसाद देतो, हे कळेल, यातून आपल्यावर नि:सीम प्रेम करणा-यांना कसा प्रतिसाद द्यायचा हे शिकता येईल.

निसर्ग, वृक्ष, पशू, पक्षी, पाण्यावरचे तरंग, हवेचा हळूवार स्पर्श, फुलांचे सुगंध, सूर्याचे तेज, चंद्राची शीतलता, अंधाराचं अज्ञातपण, काजव्यांचं आणि चांदण्यांचं चमकणं, पहिल्या पावसाच्या थेंबात भिजणं, भूमीचा मृद्गंध, पानाफुलांचं टवटवीत असणं, तक्रार न करता कोमेजून जाणं त्याला पाहू दे.

त्याला हे समजेल की आजची टवटवीत फुलं उद्याचे निर्माल्य होतात. जीवनातील नश्वरता अशी सहज समजावी.

निसर्गासारखा नि:शब्द शिक्षक नाही.

सकाळी उठल्यावर प्रार्थना त्याच्या कानावर पडू देत.

जमिनीवर पाऊल ठेवण्यापूर्वी आपला भार सहनशीलतेने वाहणाऱ्या भूमीला कृतज्ञतेने वंदन करायला त्याला शिकवा. तोही तुमच्या सुरात सूर मिसळून म्हणेल, ” पादस्पर्शं क्षमस्व मे ! “

त्याला जलपान करण्याची सवय लावा, त्याचे आरोग्य ठणठणीत राहील.

सकाळी आई, आजीसोबत त्याला तुळशीला एखादी प्रदक्षिणा घालू दे. पिंपळपानांची सळसळ शांतपणे ऐकू देत.

त्याच्या कानावर आजोबा पूजा करतात, त्यावेळचा मधुर घंटानाद पडू देत. देवासमोर लावलेल्या समईचा सात्त्विक प्रकाश त्याच्या निरागस डोळ्यांनी पाहू दे.

देवपूजा करताना देवाला प्रेमाने स्नान घालणं, स्तोत्र म्हणत केलेली त्याची उत्कट आळवणी त्याला पाहू दे.

दारी येणारा वासुदेव त्याला भिक्षा दिल्यावर भरभरून आशीर्वाद कसे देतो, ही निर्धनांच्या मनाची श्रीमंती त्याला अनुभवू द्या.

मंदिरात गेल्यावर काही अर्पण करण्याची सवय त्याच्या हाताना लागू द्या.

आणि हे सगळं सहजपणे त्याला पहात पहात स्वत:च शिकू द्या. तो त्याच्या क्षमतेप्रमाणे शिकेल. धाकदपटशाने हे त्याच्या गळी उतरवू नका.

त्याला मुक्तपणे वाढू द्या. आणि तुम्ही त्याला काय काय शिकवले हे सारखं लोकांसमोर म्हणून दाखवायला सांगू नका. त्याच्या वागण्यातून त्याचे व्यक्तिमत्व इतरांना आपोआपच उलगडेल.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments