? वाचताना वेचलेले ?

⭐ चुकून घडलेले अपघात… – लेखिका : सौ. माधुरी म. इनामदार ☆ प्रस्तुती – सौ. प्रज्ञा गाडेकर ⭐

माझी मुलगी कायम माझ्यावर, स्वयंपाक घर आणि माझे काम यावर चिडलेली असते. दररोज कशाला सगळ्यांच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ करत बसतेस?आणि सगळ्यांच्या हातात देत बसतेस? त्यांच्या वेळा सांभाळत बसतेस?तुझा तुला किती वेळ मिळतो सांग, असं म्हणते.

माझी लेकही सगळेच पदार्थ खूप छान करते. पुरणपोळी ते तांदळाचे मोदक. अगदी नवीन पदार्थही. तिचा स्वतःचा फूड ब्लॉग पण आहे. पण त्यावेळी जावई इतर कामे करतो. एकूणच सगळीच कामे ते मिळून करतात. खरे सहजीवन कसे असते, हे मला कॅनडामध्ये गेल्यावरच समजले. आता इकडेही काही पुरुष सगळी कामे करतात, हे मी बघतेय. (अलीअलीकडे आमच्या घरातील पुरुषही काही बाबतीत तरी छान मदत करत आहेत.)

हे सगळे आठवायचे कारण.. काल सकाळी नाश्त्यासाठी मी भरपूर भाज्या घातलेले आप्पे, चटणी करायची ठरवली.. बाकी सगळे तयार होते. पण चटणीला फोडणी घालायला गेले आणि कसे काय कोण जाणे, हातातून फोडणीचा डबा निसटला आणि तो मायक्रोवेव्ह, मिक्सर आणि ओटा यांच्यावर पडल्याने सगळ्या रंगाची रंगपंचमी झाली.. त्यांचे शुभ्र रंग हळद, तिखट, मसाला इत्यादी रंगात माखून गेले. (इकडे आल्यावर मी डबा घासून पूर्ण भरला होता.) ओटाही सगळा भरून गेला. हे नाष्टा करून बाहेर जायच्या तयारीत बसले होते. सून माहेरी. मुलाने नुकताच लॅपटॉप उघडला होता. (वर्क फ्रॉम होम). पण माझा झालेला गोंधळ बघून लगेच मुलगा आला. बाबा आणि त्याने मिळून बाहेर घेऊन जाऊन मायक्रोवेव्ह आणि मिक्सर स्वच्छ एरियल लावून पुसून उन्हांत ठेवले. तोपर्यंत मी कट्टा आवरला. या सगळ्या गोष्टींमुळे नाश्त्याला वेळ लागला, तो वेगळाच. पण सगळ्यांनी मिळून, समजून केल्याने मला कसलाच त्रास वाटला नाही.

या घटनेमुळे सहजच एक जुनी आठवण जागी झाली. मिरजेत असताना एकदा कोणीतरी खास पाहुणे आले, म्हणून मी माझ्या ठेवणीतील क्रोकरी काढली होती. त्या वेळी मी नोकरीही करत होते. सासूबाईंची तब्येत बिघडली होती, म्हणून त्या झोपल्या होत्या. सिंक कपबश्या, क्रोकरीने भरले होते. आम्हा सगळ्यांना रोज ताक लागतेच. तर मी घाईघाईत ताक केले. त्यावेळी घरी फिल्टर नव्हता. स्टीलचे मोठे पिंप. आणि त्यावर पाण्याने भरलेली कळशी होती.. (पिण्याचे पाणी भरून ठेवण्यासाठी). पिंपात पाणी भरणे घाईत विसरले होते. त्यामुळे ते खाली गेले होते. मी ताकाच्या गुंडीत तसाच पिंप वाकवून पाणी घ्यायला गेले.. आणि वरची कळशी गुंडीवर पडून ताक तर सगळीकडे उडालेच आणि माझी काचेची क्रोकरी बहुतेक सगळी फुटली. एक, दोन बाऊल तेवढे वाचले. त्या वेळी आर्थिक चणचणही जास्त होती आणि त्यात हे अती घाईने झालेले नुकसान. त्यामुळे माझे डोळे लगेच भरून आले. मुले कॉलेजला जाण्याच्या तयारीत होती.. जोरात झालेला आवाज ऐकून दोघं आत पळत आली. माझ्या अंगभर ताक उडून अगदी अवतार झाला होता. दोघांनी लगेच हसत हसत मला आरसा दाखविला. “होतं आई असे कधी कधी. त्यात रडण्यासारखे काय आहे?” म्हणून राहिलेले दोन बाऊल माझ्या हातात देऊन त्यांनी काचा गोळा करून टाकल्या.

असे चुकून झालेले अपघात थोड्या वेगवेगळ्या फरकाने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडत असतात. पण त्यातील नकळत राहिलेल्या पक्क्या रंगाकडे बघायचे की पुसून शुभ्र झालेल्या रंगाकडे बघायचे?तसेच तुटलेले आठवायचे की त्यातूनही सही सलामत वाचलेले बघायचे?हे तर नक्कीच आपल्या हातात असते ना?

लेखिका:सौ. माधुरी म. इनामदार

प्रस्तुती: सौ. प्रज्ञा गाडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments