सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

 ***** पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन *****

☆ वलयांकितांच्या सहवासात – भाग २ – लेखक: डॉ. नितीन आरेकर ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

उस्ताद झाकीरजींची आणखी एक छान गोष्ट आहे. जगभर भ्रमंती करणारा हा महान कलावंत जवळचं अंतर लोकल ट्रेनने किंवा रेल्वेने कापतो. कल्याण, डोंबिवलीला जर कार्यक्रम असेल तर त्याचा रवीकाकाला फोन येतो व त्याला तो सांगतो, अमक्या दिवशी कार्यक्रम आहे, मला तू रेल्वेने घेऊन जा. मग रवीकाकाचा एक रेल्वेतला मित्र, व रवीकाकाचं शेपूट असल्यासारखा मी त्याला घ्यायला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर जातो आणि ट्रेनने घेऊन गंतव्य स्थळी पोहोचवतो. त्याला स्टेशनवर बघून अनेकांचा विश्वास बसत नाही. पण, तो अगदी सहजपणे स्टेशनवर असणारे हमाल, तिकिट कलेक्टर, प्रवाशांच्यात मिसळतो, प्रत्येकाला हवे तितके फोटो काढू देतो. आता तो एक काळजी घेतो, बाहेर कुठेही काहीही खात नाही. त्याचा पिण्याच्या पाण्याचा एक ठराविक ब्रँड आहे, तेच पाणी तो पितो, ते मिळालं नाही तर तो पाणी पिणार नाही.

त्याची आणखी एक सवय आहे, त्याचा कार्यक्रम जिथं असेल तिथं, तो कार्यक्रमाच्या काही तास आधी जातो. मला आठवतंय, माझ्या मावसभावानं संतोष जोशी, त्याचे पार्टनर्स प्रियांका साठे आणि अभिजित सावंत यांनी झाकीर हुसेन आणि शंकर महादेवन यांचा ठाण्यात एक कार्यक्रम आयोजित केला होता. मी सुरुवातीपासून त्यांच्याबरोबर होतो. शंकर महादेवनने झाकीरजी कधी येणार आहेत, याची विचारणा केली आणि त्याप्रमाणे तो झाकीरकाका त्या कार्यक्रमाला पोहोचण्याच्या काही मिनिटे आधी तिथं पोहोचला.

डोंबिवलीला एम्. आय्. डी. सी. मैदानात झाकीरकाकाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता. आम्ही त्याला ट्रेनने घेऊन आलो. कल्याण स्टेशनवर उतरल्यावर आयोजकांनी मोटारीनं डोंबिवलीला नेलं. कार्यक्रम रात्री साडे-सात आठच्या दरम्यान सुरू होणार होता. आम्ही मैदानात साडेपाचच्या सुमारास पोहोचलो. तिथं गेल्या गेल्या झाकीरकाकानं तबल्याचं व विविध तालवाद्यांचं त्याच्याकडचं भांडार उघडलं. मोटारीतून स्वत:च्या तबल्याचं कीट त्यानं स्वत: उचललं आणि थेट स्टेजवर गेला. ध्वनिव्यवस्था ज्यांच्याकडे होती, त्यांनी त्याच्याबरोबर अनेक कार्यक्रम केलेले असल्याने त्यांनी सर्व तयारी ठेवलेली होती. नंतर दीड तासभर झाकीरकाका स्वत:ची वाद्ये लावत होता, ती आधी स्वत:ला कशी ऐकू येत आहेत ते तपासून घेत होता. स्पीकरवरून मैदानाच्या सर्व कोपर्‍यांत त्यांचा आवाज कसा पोहोचतो आहे याची चाचपणी करत होता. मध्येच मला म्हणाला, “बॉबी, उस कोने में जाकर सुन ले कैसे सुनाई देता है. ” नंतर दुसर्‍या कोपर्‍यात त्यानं मला पाठवलं. मला त्यातलं काय कपाळ कळणार होतं? पण त्याची परफेक्शनची धडपड केवढी होती!!

आमच्या कॉलेजमध्ये प्राचार्य दिनेश पंजवानी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने गौरव दिवस हा एक कार्यक्रम सुरू केला. पहिल्या वर्षी आम्ही रवींद्र जैन यांना बोलावलं. दुसर्‍या वर्षी बावीस जानेवारी २००२ रोजी ते व मी बोलत होतो, तेव्हा त्यांना मी विचारलं की, ‘आपण यावर्षीचा गौरव पुरस्कार उस्ताद झाकीर हुसेन यांना देऊ या का?’ सरांनी माझ्याकडे आश्चर्यानं बघितलं व विचारलं, “तू जानता है उनको? एवढ्या थोड्या अवधीत ते येतील का?” मी आत्मविश्वासानं, “हो, मी ओळखतो आणि तो येईल. ” सर थोडे वैतागले, “अरे, इतने बडे आदमी को तू अरे तुरे क्या करता है? अकल नहीं है. ” मी सरांना म्हणालो, “तो माझ्या काकाचा मित्र आहे. ” सुदैवानं झाकीरकाकानं गौरव पुरस्कार स्वीकारायचं ठरवलं. पण तो म्हणाला, “२६ जानेवारीला मी परदेशात आहे. २ फेब्रुवारी चालेल का ते बघ. ” तो रविवार होता. सरांना विचारलं, “सर उत्तेजित झाले. म्हणाले, बिल्कूल चालेल. मध्ये पाचसहा दिवस होते आम्ही झाकीरजींच्या आगमनानिमित्त एक सुंदरसा कार्यक्रम आखला. बदलापूरच्या अंध मुलांच्या शाळेचा एक छोटेखानी कार्यक्रम आणि आमच्या मुलांचा शास्त्रीय गायन-वादनाचा कार्यक्रम आम्ही ठेवला. आमच्या विवेक भागवतने छान तबला वाजवला. तो जेमतेम सेकंड ईयरचा विद्यार्थी. कार्यक्रम झाल्यानंतर जेव्हा मी या सगळ्या पोरांना घेऊन प्राचार्यांच्या कार्यालयात गेलो, तेव्हा हा जागतिक कीर्तिचा पद्मभूषण तबलानवाज विवेकला बघून म्हणाला, “अरे, आओ उस्ताद आओ. ” विवेकला त्यांनी प्रेमानं जवळ घेतलं, पाठीवर थाप मारली, “कोणाकडे शिकतोस” असं विचारल्यावर त्यानं पैठणकरांकडे शिकतो असं म्हटल्यावर त्यानं पटकन विचारलं, “त्यांच्याकडे थेट तिरखवांसाहेबांचा तबला आहे, ते त्यांचे डायरेक्ट शिष्य आहेत. ” पैठणकरबुवांची व त्याची मी गाठ घालून दिली, तेव्हा त्यानं त्यांचे हात जवळ घेऊन कपाळावर लावले. आमच्या सचिन मुळ्येची आई कांचन मुळ्ये, ह्या पं. गजाननबुवा जोशी यांची कन्या. मी त्यांची ओळख करून दिल्यावर झाकीरकाकानं त्यांना खाली वाकून नमस्कार केला. पं. गजाननबुवांनी अब्बाजींना म्हणजे उस्ताद अल्लारखांसाहेबांना त्यांच्या मुंबईतील प्रारंभीच्या काळात जी मदत केली होती, ती जाणून घेऊन त्याने तो नमस्कार केला. हे सर्व मला माहिती असण्याचं काही कारण नव्हतं, झाकीरकाकानं सर्वांसमोर ही वस्तुस्थिती सांगितली तेव्हा ते कळलं. याच कार्यक्रमाच्या वेळी एक अविस्मरणीय घटना घडली. झाकीरकाकाचा सत्कार झाला, त्या सत्काराला उत्तर द्यायला तो जेव्हा उभा राहिला तेव्हा समोर असलेले तीन साडेतीन हजार विद्यार्थी अगदी शांत बसले होते. आमचं कॉलेज उल्हासनगर स्टेशनच्या अगदी समोर आहे. कॉलेजच्या पुढच्या मैदानात कार्यक्रम सुरू होता. झाकीरकाका बोलायला जेव्हा उठला, तेव्हा अशी शांतता पसरली की आम्हाला रेल्वे स्टेशनवरची उद्घोषणा ऐकू यायला लागली. तो बोलायला प्रारंभ करणार तोच दूरवरच्या मशिदीतून अज़ान ऐकू येऊ लागला. झाकीरकाका स्टेजवर शांत उभा राहिला. स्टेज शांत, श्रोते शांत, आसमंत शांत आणि दूरवर ईश्वराची केली जाणारी आर्त आळवणी. सार्‍यांचा श्वास एक झाला होता. अजान संपला आणि झाकीरकाकानं बोलण्यापूर्वी एक दीर्घ श्वास घेतला, तो श्वास संवेदनशील माईकनं पकडला, त्याचा आवाज सर्वदूर पसरला. समोरून टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. हे लिहितानाही माझ्या अंगावर काटा फुलतो आहे. साडे तीन हजार तरुण मनं आणि त्या मनांवर नकळत अधिराज्य करणारा एक महान कलावंत यांच्यातलं ते अद्वैत अद्भूत असंच होतं.

मी रवीकाकाबरोबर झाकीरकाकाच्या घरी अधून मधून जात असे. अम्मीच्या निधनानंतर आमचं जाणं येणं जरासं कमी झालं. एकदा अब्बाजींच्या बरसीच्या पूर्वी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही नेपीअन सी रोडवर त्याच्या घरी गेलो होतो. झाकीरकाका जेवायला ज्या टेबलावर बसायचा त्याच्या खुर्चीच्या मागच्या भिंतीवर लता मंगेशकरांनी सही करून दिलेला फोटो लावलेला होता. (आता घराचं रिनोव्हेशन झालंय) त्याखाली अब्बाजी, अम्मी आणि तरुण हसर्‍या चेहर्‍याचा झाकीर असा एक छान फोटो होता, त्याच्या खाली झाकीरकाकाच्या खांद्यावर हात टाकलेला पु. ल. देशपांडे यांचा फोटो होता. मी त्याला प्रश्न विचारला, “अब्बाजी आणि अम्मीबरोबरचा फोटो लावलाय हे कळलं. पण लता मंगेशकरांचा आणि पु. लं. बरोबरचा फोटो का?” तो उत्तरला, “लताजी तर साक्षात सरस्वतीचं रूप आहेत आणि पु. लं. सारखा रसिक आणि कलाकार कुठेही सापडणार नाही. ” मला अचानक आठवण झाली, आमच्या कर्जत गावात वनश्री ज्ञानदीप मंडळ होतं. त्यांनी पु. ल. देशपांडे व सुनीता देशपांडे यांच्या आरती प्रभूंची कविता या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आरती प्रभू त्यांच्या अत्यंत विपन्नावस्थेच्या काळात कर्जतला कावसजीशेट काटपटपिटीया यांच्या चाळीत अक्षरश: आठ बाय दहाच्या खोलीत राहात होते. कार्यक्रम झाला व नंतर दुसर्‍या दिवशी पु. ल. व सुनीताबाई आमच्या घरी जेवायला आले. त्यानंतर दोन तीन दिवसांनी त्यांचं माझ्या काकांना- मनोहर आरेकर यांना एक पत्र आलं. त्यात त्यांनी कर्जतच्या एकूण संयोजनाबद्दल आभार मानले आणि नंतर त्यात लिहिलं की, ‘कालच बालगंधर्वला झाकीरचा तबला ऐकला आणि त्यानंतर असं वाटलं की झाकीर जे वाद्य वाजवतो तो तबला. ‘ मी ती आठवण झाकीरकाकाला सांगितली. त्यानं मला पु. लं. चं वाक्य इंग्रजीत भाषांतरित करायला सांगितलं. मी म्हणालो, “P. L. says Zakir is the definition of Tabla. ” त्यानं पुन्हा एकदा ते वाक्य माझ्याकडून म्हणून घेतलं. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते. तो कधीही त्याच्या भावनांचं प्रदर्शन करत नाही. त्या क्षणी तसं घडलं खरं.

कित्येकदा मला असं वाटतं, उद्या म्हातारा झाल्यावर माझ्या नातवंडांना या गोष्टी सांगत असेन, नातवंडं तोंडात बोटं घालून त्या गोष्टी ऐकत असतील. नंतर म्हणतील, “आजोबा. किती थापा मारता. ” मग मी हसेन, आणि मनातल्या मनात म्हणेन, “बाळांनो, खरं आहे. पृथ्वीवर गंधर्व येऊन गेले यावर सामान्यांचा विश्वास बसत नाही. ज्यांचं भाग्य होतं त्यांना ते गंधर्व पाहता आले. मी भाग्यवान आहे, मी या गंधर्वाला पाहिलं. “

समाप्त

लेखक : डॉ. नितीन आरेकर

nitinarekar@gmail. com

Tel:+91 880 555 0088

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments