वाचताना वेचलेले
☆ काय असते गिरनार वारी…? लेखक : श्रीकांत कापसे पाटील ☆ प्रस्तुती – श्री. मंगेश जांबोटकर ☆
नेहमी गिरनारला जायचे म्हटले की काही जण म्हणतात, ” काय वेड लागले की काय? दर 2 महिने झाले की गिरनारला पळतोस!”
हो. आमच्या भाषेत वेडच ते आणि आम्ही तेच वेडे आहोत. नाहीतर तुम्ही शहाणे तिथे जालच कशाला? बरोबर ना? (कारण… वेळेला वेडेच उपयोगी येतात आणि शहाणे पळून जातात.)
काय मिळतं तिथे सारखं जाऊन?
काम धंदे सोडून पळतात तिकडे ते…?
असं काय आहे गिरनार?
अहो, काम धंदे सोडून कोणी जात नाही तर आमच्या गिरनारीसाठी वेळ काढून जातो, दर्शनासाठी… जिथे प्रत्येक पायरी चढताना चांगली, वाईट केलेली कर्मं आठवतात ना ते आहे गिरनार…
तिथे गेल्यावर आठवतं व चांगली बुद्धी जागृत होते, ते आहे गिरनार…
जीवनातली सगळी दुःख विसरून, रोजची घरातली, बाहेरची कटकट विसरून पाच दिवस जो सुखाने जगतो ना, जिथे सुख, समाधान मिळतं ना, ते आहे गिरनार…
भक्तीमय वातावरणात राहून जो आनंद मिळतो ना, ते आहे गिरनार…
श्रीमंत, गरीब जिथे एकत्र येतात ना, ते आहे गिरनार…
सगळ्या सुख दुःखांची जिथे बेरीज वजाबाकी करूनसुद्धा शिल्लक काही राहत नसेल, तरी सुध्दा काहीतरी मिळतं, ते आहे गिरनार….
आरोग्याच्या तक्रारी, नोकरीत बढती, व्यवसायात वाढ, मुलांची शिक्षणं, लग्न, घरदार सगळं काही मनासारखे होते जिथे गेल्यावर, ते म्हणजे गिरनार….
ढोपरं दुखतात, दम लागतो, तरीसुद्धा एक एक पायरी चढून जाण्याची इच्छाशक्ती जिथे वाढते, ते म्हणजे गिरनार…
जिथे भल्या भल्यांची परीक्षा घेतली जाते, अहंकार जिथे गळून पडतो, व मग अक्कल ठिकाणावर येते, अपराधाची केल्याची जिथे जाणीव होते, ते गिरनार…
असे हे आमच्या गिरनारी महाराजांचे गिरनार… आणि तुम्ही म्हणता काय मिळतं तिथे सारखं सारखं जाऊन? गिरनार…
माहेर वाशीण जशी माहेराला येते व तिला जो आनंद होतो ना आल्यावर व निघताना पाय निघत नाही, तसंच आमचं हे गिरनार…
हे सर्व वाचून ज्याचे मन म्हणते बरोबर आहे, व ज्याच्या डोळ्यात आपसूक पाणी येते ना, ते हे गिरनार…
तर असंआहे गिरनार…
जय गिरनारी
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त
लेखक: श्री. श्रीकांत कापसे पाटील
प्रस्तुती : श्री. मंगेश जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈