सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
वाचताना वेचलेले
मी आता पुस्तक वाचत नाही… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी ☆
☆
मी हल्ली
पुस्तकं नाही,
माणसंच वाचतोय !
पुस्तकं महाग झालीयत,
माणसं स्वस्त.
शिवाय,
सहज सगळीकडे उपलब्ध असतात
माणसं.
बरीचशी चट्कन वाचून होतात,
कधी कधी मात्र
खूप वेळ लागतो
समजायला.
काही तर
आयुष्यभर कळत नाहीत !
सगळ्या साईजची
सगळ्या विषयांची.
छोटी माणसं, मोठी माणसं,
चांगली माणसं, खोटी माणसं.
आपली माणसं, दूरची माणसं,
दूर गेलेली माणसं, जवळची माणसं.
दु:खी माणसं, कष्टी माणसं
कोरडी माणसं, उष्टी माणसं
बोलकी बडबडी, बोलघेवडी माणसं
निमग्न, तिरसट, मूडी माणसं.
पाठीवर थाप मारणारी,
हातावर टाळ्या मागणारी,
थरथरत्या हाताने,
घट्ट धरून ठेवणारी.
मोजकं बोलणारी कविता-माणसं,
कादंबरीभर व्यथा माणसं.
सतत माईक घेऊन ओरडणारी माणसं,
डोळ्यांनी मौन सोडणारी माणसं.
काहींच्या वेष्टनात मजकूरच नाही,
काहींच्या मजकुरात विषयच नाही,
वर्षामागे वर्ष पानं जातात गळत,
काहींची प्रस्तावनाच संपत नाही !
पुस्तकांचं एक बरं असतं,
कितीही काळ गेला तरी,
मजकूर कधी बदलत नाही,
माणसांचं काय सांगू,
वेष्टन, आकार,
विषय, मजकूर
सारंच बदलत बदलत
शेवटी वाचायला
माणूसच उरत नाही.
तरीही शब्द शब्द
वाचतोे मी माणसं,
पानापानातून
वेचतोे मी माणसं………!!!
☆
लेखक : अज्ञात
संग्राहिका – शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)
कोथरूड-पुणे.३८.
मो.९५९५५५७९०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈