सुश्री सुलू साबणे जोशी

? वाचताना वेचलेले ?

☆ ब्रेडची टोपली… – लेखिका : सुश्री ज्योती रानडे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी 

काल दुपारी मी परत तिच्या घराबाहेर ब्रेडच्या टोपल्या बघितल्या. शेजारी पाटी लिहिली होती, “ज्यांना खरोखर जरूर आहे, त्यांनीच फक्त हवे तेवढे ब्रेडचे लोफ घ्यावेत. आज मी एवढेच देऊ शकते. संपले असतील तर दार वाजवून अजून आहेत का विचारू नये. ”

दोन मोठ्या टोपल्यात साधारण २५-३० ब्रेडचे लोफ होते. मी गेले कित्येक महिने चालायला जाताना त्या ब्रेडच्या टोपल्या बघत होते. मला हे नक्की काय चाललंय हे जाणून घेण्याची फार इच्छा होती, म्हणून मी तिचं दार वाजवलं. बराच वेळ कुणी दार उघडलं नाही. मी परत जायला निघाले.. तेवढ्यात त्या घराच्या खिडकीतून आवाज आला, “काय हवंय?”

मी म्हणाले, “या ब्रेडबद्दल कुतूहल होतं. बाकी काही नाही. मला ब्रेडची जरूर नाही. ”

तिनं दार उघडलं. साधारण पन्नाशीतली एक बाई नर्सच्या पोशाखात दारात दिसली. “तू पत्रकार आहेस का? कुठल्या वर्तमानपत्रासाठी लिहिणार असशील, तर मला बोलायचं नाही. ”

“नाही नाही.. मी पत्रकार नाही. मी नेहमी चालायला येते या रस्त्यावर. ही ब्रेडची टोपली तुम्ही ठेवता? कुणासाठी? मी काही मदत करू शकते का?” मी म्हणाले.

ती म्हणाली, ”मी जवळच्या हॅास्पिटलमधे नर्स म्हणून काम करते. काही वर्षांपूर्वी एक पेशंट ॲडमिट झाला. तो लहान असताना त्याच्या घरची अत्यंत गरीबी होती. वडील पाव, बिस्कीटं तयार करणारे बेकर होते. त्यामुळे तो पण ब्रेड, पेस्ट्री उत्तम बनवत असे. वडील गेल्यावर, १५-१६ वर्षांचा असल्यापासून तो एका टोपलीत ब्रेड भरून गावात हिंडून विकत असे. त्यातून बरा पैसा मिळू लागल्यावर पै पै जमवून त्याने स्वत:ची बेकरी सुरू केली. हळूहळू सर्वांनाच या बेकरीचे पदार्थ खूप आवडू लागले. त्याच्या हातात चार पैसे आले. खाण्याची मारामार संपली. घरही घेतलं. गाड्या घेतल्या.

या गावानं आपल्याला खूप काही दिलं, या भावनेनं त्यानं गरजूंसाठी ताजे ब्रेडचे लोफ दर रविवारी दोन तीन टोपल्या भरून घराबाहेर ठेवायला सुरूवात केली. तासाभरात ते लोफ गरजू लोकांनी नेलेले असत. काही लोक टोपलीत चार पैसे टाकत, एखादी थॅंक्यू नोट टाकत, तर कधी बाहेर ब्रेडला जेवढे पैसे पडतात तेवढे टाकत. एकदा कुणीतरी एक चांदीची बांगडी सुध्दा टाकली होती.

त्याचा संसार सुखाने चालला होता. मुलंबाळं चांगली निघाली. या टोपलीतील ब्रेड नेणाऱ्यांच्या दुव्यांमुळे आपलं दारिद्र्य संपलं, भरभराट झाली असं त्याला वाटायचं. काही संकटं आली, पण ती दूर झाली. वयाच्या ७६ वर्षी तो अल्पशा आजाराने गेला. त्याची बायको पण वर्षात गेली. त्याने ICU मधे असताना मला विचारले, ”मी तुझ्या नावाने काही पैसे ठेवत आहे. दर आठवड्याला गरजू लोकांसाठी तू ब्रेडची टोपली ठेवशील का? मला एके काळी ब्रेडचा एक तुकडा मिळायची मारामार होती. ते इतरांच्या नशिबी येऊ नये, म्हणून मी हे आयुष्यभर करत आलो आहे. माझी मुलं म्हणतात की याची जरूर नाही. म्हणून तुला विचारत आहे.. मुलांना समजत नाही की देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही. ”

मी ‘हो’ म्हणाले. कुठेही त्याच्या नावाचा उल्लेख नसावा आणि वर्तमानपत्रात बातमी, फोटो काही नसावेत, एवढीच त्याची अट होती. त्यानं दिलेले पैसे वापरून मी दर रविवारी दाराबाहेर ब्रेड ठेवू लागले. गेल्या वर्षी त्यानं दिलेले पैसे संपले. मी माझ्या पैशांनी कधी पाच, दहा, पंधरा ब्रेड ठेवू लागले. लोकं ब्रेड घेतात व जमेल ते आणि भरपूर प्रेम या टोपलीत टाकतात. मलाही हे लोकांचं प्रेम आवडू लागलं. मागच्या वर्षीच्या वादळात जेव्हा माझ्या घरावर मोठं झाडं पडलं, तेव्हा पाच पन्नास लोक आले व त्यांनी सर्व सफाई करून माझं घर पूर्ववत करून दिलं. माझ्या अडचणी पण कमी होत गेल्या. कारण देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही. ”

मला खूप कौतुक वाटलं. ती म्हणाली, “त्यानं ही प्रथा सुरू केली आहे ती आपण चालू ठेवू. मला काही देऊ नको, पण तुझ्या घराबाहेर एक ब्रेडची बास्केट ठेव, म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती लाभेल आणि तुला जेव्हा एखादा असा माणूस भेटेल, जो न चुकता ही प्रथा चालवेल, फक्त त्यालाच ही गोष्ट करायला सांग. कुणाला सांगायचे हे तुझं तुला कळेल, जसं मला तुझ्याशी बोलताना कळलं. ”

मी काही ब्रेडचे लोफ विकत घेतले व माझ्या घराबाहेर एका बास्केटमधे ठेवले. केवळ देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही म्हणून नाही.. पण त्या निनावी व्यक्तीने मरणानंतरही कुणाला ब्रेडचा एक तुकडा मिळण्याची भ्रांत पडू नये ही इच्छा व्यक्त केली म्हणून!

पैशाचा प्रश्नच नाही. कारण..

…देणाऱ्याला देव कधी काही कमी पडू देत नाही.

लेखिका : सुश्री ज्योती रानडे

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी.

मो – 9421053591

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments