सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ संवाद : स्वतःचा स्वतःच्या मनाशी… – लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
बायका इतरांशी बोलत नाहीत पण कितीतरी लाख पटीने त्या स्वतःच स्वतःच्या मनाशी बोलत असतात. काय बरं बोलत असतील त्या ? बघू तरी….
सकाळी झोपेतून उठताना..
आत्ता पावणेसहा वाजले आहेत. सहा वाजता उठेन. पंधरा मिनिटे जरा पडून राहते नाहीतर दिवसभर तेलाच्या घाण्याला बैल जुंपली जातात तसेच दिवसभर मी कामाला जुंपलेलीच असते. तेवढीच पंधरा मिनिटे मला गादीचा सहवास मिळेल. दिवसभर दोघींनाही एकमेकांचा विरह सहन करावाच लागतोच. हा घड्याळाचा काटा कसा दमत नाही कोण जाणे… वाजले सहा.. आता मात्र मला उठावेच लागेल.
दात घासताना..
कोणती भाजी करावी. फ्रिजमध्ये तीन भाज्या असतील. कोबी मला आवडत नाही, वांगं ह्यांना आणि कारलं मुलांना.. जाऊ दे, कोबीचीच भाजी करते. असंही आपल्याला आवडीनिवडी राहिल्याच कुठे?
गॅसजवळ गेल्यावर..
मस्तपैकी चहा टाकते. गॅसजवळ किती बरं वाटत आहे या थंडीच्या दिवसांत. तेल संपत आले आहे. लवकरच त्याची पूर्तता करावी लागणार.. कढईत जरा तेल जास्त झालेल दिसतंय.. थोडं काढून ठेवते नाहीतर “भाजीत तेल खूप झालं” येईल फोन ह्यांचा.. असंही तेल कमीच पाहिजे. माझी दीदी तर फोडणीचे दाणे भिजतील एवढेच तेल वापरते!
आंघोळीला जाताना..
कोणता ड्रेस घालू? कालच पिवळा ड्रेस घातला होता. आज बांधणीचा घालते. कुठे गेली ओढणी? सापडत नाही. नेहमी असेच होते.. कितीही कपडे नीट ठेवले तरी वेळेवर सापडत नाही. पिवळा ड्रेसच अडकवते आता!
डबा भरताना..
तीन पोळ्या घेऊ का एखादी कमी करू? वजन वाढतच चालले आहे. थंडीचे दिवस आहेत, भूक खूप लागते. तीनच पोळ्या घेते. भाजी कशी झाली देव जाणो.. चटणीची वाटी राहू दे बाजूला. वेळ झाली, निघायला हवं लवकर..
कूलुप लावताना..
गॅस, गिझर, लाईट बंद केले ना मी? पुन्हा बघावे तर वेळ जाईल.. सगळे चेक केलेले असते पण कुलूप लावताना नेहमी अशीच द्विधा अवस्था होते माझी..
गाडी चालू करताना…
ये बाई तू नको नखरे करुस.. माहित आहे मला थंडी खूप आहे. तू जर वेळेत चालू झाली नाहीस तर नक्कीच लेट मार्क लागेल. गणपती बाप्पा मोरया!!! चालू हो गं बाई लवकर…
गाडी चालवताना..
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जय राम जय जय राम…. खूप लोड आहे कामाचा. आजच्या आज मला करावीच लागणार आहेत..
पंचिंग करताना..
हूश्य!!!.. झालं गं बाई वेळेत पंचिंग… पडला आजचा दिवस पदरात.. लेट मार्क लागला नाही ते बरं झालं.. अजून वीस बावीस दिवस जायचे आहेत.. कधी काय अडचण येईल आणि लेट मार्क लागेल सांगता येत नाही.. वेळेतच आलेलं बरे…
जेवताना..
भाजी मस्त झाली आहे आज.. ह्यांना नक्कीच आवडेल, फोन किंवा मेसेज येईलच ह्यांचा..
चार वाजता चहा घेताना..
कधी यायचा बाई चहा.. आज मात्र चहाची खूपच गरज आहे. चहा टाळायला पाहिजे.. बसून काम आणि त्यात साखरेचे सेवन.. वजन वाढायला तेवढेच पुरेसं. कमी होताना होतं की 100 ग्रॅम 200 ग्रॅमने आणि तेही खूप खूप मेहनतीने.. किती मन मारू.. घेते बाई चहाचा आस्वाद..
संध्याकाळी स्वयंपाक करताना..
कोणती भाजी करू? कंटाळा आलाय.. करते नुसती मुगाच्या डाळीची खिचडी, कढी किंवा टोमॅटोचे सार.. नको नको.. नुसत्या खिचडीवर नाही भागायचे. करतेच सगळा स्वयंपाक..
किचन ओटा आवरताना..
पडली तेवढी भांडी धुवून टाकते.. जेवण झाल्यावर जाम कंटाळा येतो भांडी घासायला..
झोपताना..
बघते जरा थोडावेळ मोबाईल.. (स्टेटस बघत असताना) किती एन्जॉय करतात या बायका.. कसा वेळ मिळतो यांना देव जाणो. मला कुठे बाहेर जायचं म्हणलं की किती गोष्टी मॅनेज कराव्या लागतात.. त्यापेक्षा बाहेर पडायला नको असं वाटतं.. हीच्या भावाचं लग्न झालेलं दिसतंय.. गळ्यात काय सुंदर दागिना घातलाय.. बघते जरा झूम करून. ही गेलेली दिसते बाहेर कुठेतरी फिरायला. मस्त दिसते जिन्समध्ये… हीच्या घरी झालेलं दिसते हळदी कुंकू, मला नाही बोलावले… पुढचे फोटोच नको बघायला… अरे बाबा कशाला लटकतोय ट्रेनमध्ये.. जरा जाऊन बस की आत ! कशाला शायनिंग मारतोय..
झोप आली असताना..
चला झोपा लवकर आता उद्या सकाळी पुन्हा लवकर उठायचंय..
मध्यरात्री जाग आली असताना..
आत्ताशी तीन वाजले आहेत. मला वाटले सहा वाजले. अजून तीन तास झोपायला मिळेल आपल्याला…
आनंदित होऊन रग ओढून गाढ झोपून जाणारी मी आणि माझ्यासारख्या असंख्य स्त्रिया..
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈