श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ “हळवा मोहर” – कवयित्री : शांताबाई शेळके ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(वरील सुंदर पेंटिंग पाहून आठवल्या शांताबाईंच्या काव्यपंक्ती…! — संग्राहक : चंद्रशेखर देशपांडे )
☆
या वळणावर वळताना मज
आठवते, की हेच तुझे घर
कोनावरले झाड तेच ते
अजुन ढाळिते हळवा मोहर
*
या वळणावर वळतांना मी
कितीदा झाले कंपित, कातर
वीज धावली तनूतुनी जरि –
क्षण अडखळले पाऊल आतुर !
*
ओठांवरचे अधीर हासू
धीट लाजही डोळ्यांमधली
पुन्हा पुन्हा मनी घुटमळणाऱ्या
कवितेतील भावोत्कट ओळी –
*
अता न उरले तसले काही
संथ जाहले डचमळुनी जळ
गहन एकदा जे गमले मज
आज तयाचा सहज दिसे तळ
*
वळणावर या वळता तरिही
भरते काही उरी अनावर –
सुन्या मनाच्या भूमीवरती
ढळत राहतो हळवा मोहर !
☆
कवयित्री – शांताबाई शेळके
प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈