वाचताना वेचलेले
☆ घराला स्पर्श कळतात ?… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
☆
राहत्या घराला चार-आठ दिवसांसाठी कुलूप लावून जाताना जरा जिवावरच येतं. एक हुरहूर वाटते बंद दाराकडे बघून निरोप देताना. मग मनातल्या मनात आपणच घराला सांगतो, “येतो परत आठ दिवसांत. तोवर सांभाळ रे बाबा.. “
तेव्हा घरही उदासल्यासारखं भासतं.
मग कधी कधी आठ दिवसांचे आणखी चारेक दिवस जास्तीचे घेऊन आपण जेव्हा परततो आणि आपल्या घराच्या दरवाजासमोर उभे राहतो, त्या वेळचे समाधान काही वेगळेच असते. प्रवासाचा अर्धा शीण नाहीसा होतो.
पण बहुधा वाट पाहून घर जरा रुसलेलं असतं. दार उघडल्यानंतर घराचं हिरमुसलेपण जागोजागी जाणवतं. मलूलतेची छाया पसरलेली असते. घर आळसावलेलं, रुक्ष, निर्जीव भासतं.
जाताना बदललेले कपडे, गडबडीत न विसळलेल्या कपबश्या, वह्यापुस्तकं, खेळण्यांचा पसारा….. आरशावर एक धुळीचा बारीक थर चढलेला असतो. रोजचीच फरशी डोळ्यांना अन् पायांना वेगळीच लागते,
फ्रीज उघडल्यावर उरल्या सुरल्या भाज्या, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटोचा येणारा दर्प. सिंक वॉश-बेसिन बाथरूम सुकून गेलेले असतात. वाट पाहून घराच्या छताचा जीव त्याला टांगलेल्या फॅनसारखाच टांगणीला लागलेला असतो. भरीस भर म्हणून प्रवासातून आणलेल्या बॅगा व सामान हॉलमध्येच अंग पसरून बसलेलं असतं.
आता सांगा बरं, घर कसं रुसणार नाही!
रुसलेल्या, रागावलेल्या घराला मग “ती” आवरायला घेते, मलूल झालेल्या तुळस, मोगरी, गुलाबाच्या रोपट्यांना न्हाऊ घातलं जातं, इतके दिवस अंधार पांघरून बसलेल्या खिडक्यांचे पडदे सर्रकन दूर होतात आणि श्वास कोंडलेल्या घराला ताज्या हवेच्या झुळुकीने हायसं वाटते.
दोन तीन तासांत सारं काही जाग्यावर पोहचतं. ती भरभर तिच्या लाडक्या घराला पुन्हा “देखणं” करते. गोंजारते.. त्याला त्याचं “घरपण” पुन्हा बहाल करते. घराच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते..
त्या ओळखीच्या स्पर्शाने मग मरगळलेलं घरही विरघळतं अन् सुखावून खुदकन हसू लागतं.
घराला स्पर्श कळतात? हो. कळतात! त्याला आपली माणसेही कळतात. आपली सुखदुःखंही त्याला ठाऊक असतात. आठवून पहा. काही आनंदाश्रू, काही हुंदके, दुःखाचे कढ कधीकधी फक्त घरच्या भिंतींनाच माहिती असतात.
तर अशा आवरलेल्या घराला मग हातात चहाचा कप घेऊन थोडी दमलेली ती समाधानाने न्याहाळत दोन घटका बसते, तेव्हा लाडात आलेल तिचं घर तिच्याकडे पाहत हसतं. तिलाही मनात वाटतं, “कोणाची दृष्ट न लागो”… !
शेवटी “बाईच” घराची “आई” असते.. !
लेखक : अज्ञात
प्रस्तुती :सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈