? वाचताना वेचलेले ?

☆ ‘सुकी पुरी…’ –– लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर

ते आजोबा नातवाला घेऊन रोज बागेत यायचे. त्याच्यासाठी कायम फिल्डर कम बॉलर बनून तो थकेस्तोवर त्याला बॅटिंग करू द्यायचे.

क्रिकेट खेळून मन भरलं की मग आजोबा घोडा बनणार… आणि त्यांचा पाचेक वर्षाचा नातू त्यांच्या पाठीवर घोडेस्वार बनून त्यांना त्या लॉनमध्ये इकडे तिकडे फिरवणार.

मग दोघेही थकले की आजोबा त्याला जवळ घेऊन कसली तरी गोष्ट ऐकवायचे…

‘मग एवढा मोठ्ठा राक्षस आला…’ आजोबा अगदी राक्षसारखं तोंड वगैरे करून गोष्ट रंगवायचे.

‘…आणि मग त्या राक्षसाला मारून तो राजकुमार राजकुमारीला सुखरूप घेऊन गेला आणि त्यानं खूप वर्षे राज्य केलं…’

रोज एका नव्या गोष्टीचा सुखांत व्हायचा. तृप्त मनानं आजोबा आणि तृप्त कानांनी तो नातू मग चांदणं बघत घरी निघायचे. ठरल्याप्रमाणं तो भेळ-पाणीपुरीवाला बागेच्या दारात वाट पाहत उभा असायचा.

“आजोबा, सुकी पुरी…”

नातवानं फर्माईश केली की आजोबा एक प्लेट तिखट पाणीपुरी आणि त्यांचा नातू एक प्लेट फक्त सुकी पुरी खाणार…

मग आजोबा खिशातून रुमाल काढून त्याचं तोंड पुसणार आणि बॅगेतून छोटीशी बाटली काढून त्याच्या तोंडाला लावणार.

त्यानं पूर्ण पाणी प्याल्यावर शिल्लक राहिलं, तर एखादा घोट आपण पिणार आणि त्याला हाताला धरून पलीकडल्या गल्लीत अंधारात नाहीसे होणार.

त्यांचं ते निर्व्याज प्रेम आणि त्या नातवाच्या बाळलीला बघून बरेच जण तृप्त होत होते… ज्यांना जमेल त्यांनी आपापला नातू आणायला चालूही केलं होतं आणि ज्यांना शक्य नव्हतं ते एखादा जास्तीचा फोन करून नातवाशी गप्पा मारत होते–  कुणी शहरातल्या नातवाशी, कुणी गावातल्या, तर कुणी सातासमुद्रापार गेलेल्याशी…

त्या दिवशी आजोबा एकटेच होते. त्यांना एकटं पाहून त्यांच्याहून जास्त बेचैनी रोजच्या बघ्यांना झाली होती. एखादं सुंदर कारंजं अचानक थांबल्यावर किंवा एखादी गार  वाऱ्याची झुळूक अचानक थांबल्यावर, एखादी सुरेल लकेर वरच्या पट्टीत गेल्यावर मध्येच रेडिओ खरखरल्यावर हमखास जसं होतं, अगदी तस्सं…

“आजोबा आज एकटेच… नातू नाही?”

आजोबा फक्त हसले. थोडा वेळ बागेत चकरा मारून झाल्यावर झोपाळयावर खेळणाऱ्या मुलांपाशी थोडेसे रेंगाळले. सुरकुतीतल्या मिशा थोड्याशा हलल्या. त्या मुलांना एकदोन चेंडू टाकून निघाले.

दारात नेहमीचा भेळवाला भेटला; पण आज काही त्यांनी तिखट पाणीपुरी घेतली नाही… त्यांची पावलं झपझप पुढच्या काळोखात विरून गेली.

“एक सेवपुरी देना…उसमे शेव कम डालनेका और कांदा थोडा जास्ती. तिखट मिडीयम रखना…” मी त्या भेळवाल्या भय्याला सांगितलं.

“ही घ्या साहेब तुमची कमी शेव, जास्त कांदा आणि मध्यम तिखटाची शेवपुरी…” त्याचं अस्खलित मराठी माझ्या अस्तर लावून बोललेल्या हिंदीची लक्तरं टांगत होतं.

“ते आजोबा थांबले नाहीत आज… छान खेळतात रोज नातवाशी आणि पाणीपुरी खातात तुझ्या गाडीवर… त्यांचा नातू नव्हता नाही का आज सोबत?” माझी अस्वस्थता मी बोलून दाखवली.

“तो त्यांचा नातू नाहीच साहेब… समोरच्या वस्तीतला पोरगा आहे तो… सैनिक स्कूलला गेला काल. एकदा चोरी करताना आजोबांनी त्याच्या बापाला आणि त्याच्या मित्राला पकडलं. प्रकरण पोलिसांत गेलं. घरची गरिबी बघून आजोबांनी केस मागं घेतली. त्याला चार चांगल्या गोष्टी सुनावल्या आणि पदरमोड करून त्याला सैन्यात भरती केलं.

लग्न लावून दिलं त्याचं आणि वर्षाचा पोरगा मागे ठेवून काश्मीरमधून तिरंग्यात गुंडाळून परत आला! सरकारी मदत जी मिळायची ती मिळालीच पण त्याची बायको आणि पोरगं वाऱ्यावर उघडे पडू नयेत म्हणून यांनी त्यांना स्वतःच्या घरात घेतलं. स्वतःच्या नातवासारखं त्याला आणि पोटच्या पोरीसारखं त्याच्या आईला जपतात…”

“मग आजोबांच्या स्वतःच्या घरचं कुणी…?”

“ उभी हयात सीमेवर शत्रूशी लढण्यात गेली, साहेब… शत्रूला डावपेचात मागं टाकण्याच्या विचारात संसाराचा डाव मांडणं जमलंच नाही… अजूनही सगळी पेन्शन आणि वेळ अशा रुळावरून खाली घसरू लागलेल्या पोरांना सावरण्यात घालवतात…”

“तुला इतकं सारं तपशीलवार कसं रे माहीत?”

“साहेब, तो चोरी करताना पकडलेला दुसरा पोरगा मीच होतो. ही भेळेची गाडी त्याच देव माणसानं टाकून दिलीय!”

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला जागं होणारे बेगडी देशप्रेम कुठंतरी डोळे ओले करून गेलं!

लेखक: अज्ञात

प्रस्तुती : सौ. शामला पालेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments