श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “कशास मागू देवाला…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆
☆
क्षणो क्षणी तो देतो मजला,
श्वासामागुनी श्वास नवे..
कशास मागू देवाला,
मज हेच हवे, अन् तेच हवे?
*
क्षितिजावरती तेज रवीचे,
रोज ओततो प्राण नवे..
उजळविती बघ यामिनीस त्या,
नक्षत्रांचे लक्ष दिवे..
निळ्या नभावर रांगोळीसम
उडती चंचल पक्षी-थवे..
कशास मागू देवाला,
मज हेच हवे, अन् तेच हवे?
*
वेलींवरती फुले उमलती,
रोज लेऊनी रंग नवे..
वृक्ष बहरती, फळे लगडती,
गंध घेऊनी नवे नवे..
हरिततृणांच्या गालिच्यावर,
दवबिंदूंचे हास्य नवे..
कशास मागू देवाला,
मज हेच हवे, अन् तेच हवे?
*
प्रसन्न होऊनी निद्रादेवी,
स्वप्न रंगवी नवे नवे,
डोळ्यांमधली जाग देतसे,
नव दिवसाचे भान नवे,
अमृत भरल्या जीवनातले,
मनी उगवती भाव नवे,
कशास मागू देवाला,
मज हेच हवे अन् तेच हवे?
*
कोणी आप्त तर कोणी परका,
उगा निरर्थक मन धावे..
सखा जिवाचा तोच, हरी रे,
नाम तयाचे नित घ्यावे..
नको अपेक्षा, नकोच चिंता,
स्वानंदाचे सूत्र नवे..
कशास मागू देवाला,
मज हेच हवे, अन् तेच हवे?
☆
कवी : अज्ञात
प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈