वाचताना वेचलेले
☆ माझी लेक … – लेखिका: श्रीमती भारती पांडे ☆ प्रस्तुती – श्रीमती प्रफुल्ला शेणॉय ☆
☆
माझी लेक…काळी सावळी..तरतरीत
अभिमानी.
चमकत्या आत्मविश्वासपूर्ण डोळ्यांनी माझ्या नजरेला नजर देत
वाकली नमस्काराला.
मी ठरवलं होतं कधीच
डोळे मऊ होऊ द्यायचे नाहीत
तिनं मला एक कोवळं हसू बहाल केलं…जिवणीच्या कोपर्यातल्या खळीसकट.
काय नव्हतं त्यात?
कुठल्या कुठल्या आठवणी..राग लोभ ..रुसवेफुगवे
तान्हेपण तिचं आणि नवखं आईपण माझं.
चढता ताप तिच्या कोवळ्या शरीराला
आणि माझ्या कासावीस मनाला.
भांडण आम्हा मोठ्यांचं आणि
चेहरा उतरलेला बाळीचा
यशपराक्रम तिचा आणि
अभिमान प्रतिबिंबित माझ्या मनात
आणखीही बरंच काही काही
त्या नजरेत..त्या हसण्यात.
तेवढ्यात तिच्या मामानं
तिच्या ताठ पाठीवर हलका हात टेकत गदगदत म्हटलं, चल बाळ
परत एक खोल नजर माझ्या नजरेत
रुतवून ती वळली.
ती आता जी आहे आणि मी आता जी आहे
याबद्दलचं ऋणच जणू आम्ही दोघी स्वीकारत होतो.
फक्त आता तिच्या जिवणीवरचं फुलपाखरू उडून गेलं होतं
नुसती तिथली खळी थरथरत होती.
तिच्या डौलदार पाठमोऱ्या आकृतीकडे पहाता पहाता मी
एकदम अनोळखीच होऊन गेले.
कुण्या परक्या हातानं तिचा शेला सावरला.
आणखी कुणी तिच्या हातात एक भरगच्च हार दिला.
ही तर माझी कुणीच नव्हती
ही एक अनोळखी नवरी मुलगी..
मला क्षणभर वाटलं.
दारातल्या तोरणाखालीच
क्षणभर थबकत तिनं झटकन
मागे वळून पाहिलं.
चमकणारे डोळे आता मोत्यांनी लगडले होते.
थोडं भय थोडी उत्कंठा थोडी उत्सुकता आणि
पाठीशी हवी असलेली
आश्वासक नजर माझी.
पुन्हा नजर फिरवून ती
मंडपाकडे चालायला लागली
माझ्या छातीत पोटात डोळ्यात गळ्यात एक जीवघेणी कळ उठली
आज
दुसर्यांदा नाळ तुटत होती.
आज
दुसर्यांदा नाळ तुटत होती.
☆
लेखिका: श्रीमती भारती पांडे.
प्रस्तुती : श्रीमती प्रफुल्ला शेणॉय
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈