वाचताना वेचलेले
☆ “क्रोधाचे पिशाच्च” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. राधा पै ☆
एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम, आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात असताना, रात्रीच्या वेळी अंधारामुळे त्यांना रस्ता सापडला नाही.
जंगल घनदाट होते. तिथे न पुढे जाण्याचा मार्ग दिसत होता, न मागे फिरण्याचा.
तेव्हा तिघांनी ठरवले की, एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी मार्गस्थ व्हायचे.
तिघेही दमलेले होते, पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.
पहिली पाळी सात्यकीची होती. सात्यकी पहारा करत असताना, झाडावरून एका पिशाच्चाने पाहिले की एक माणूस पहारा देतो आहे, आणि दोनजण झोपले आहेत.
पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी आव्हान देऊ लागले.
पिशाच्चाचे बोलणे ऐकून सात्यकी संतापला आणि क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला.
तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले.
परंतु जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई, तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार आणखीनच मोठा होई आणि तो सात्यकीला जास्त जखमा करू लागे.
एका प्रहरानंतर बलराम जागे झाले. त्यांनी सात्यकीला झोपायला सांगितले.
सात्यकीने पिशाच्चाबद्दल काहीच सांगितले नाही.
बलराम पहारा देऊ लागले. पिशाच्चाने त्यांनाही मल्लयुद्धासाठी बोलावले.
बलराम क्रोधाने त्याच्यावर धावून गेले, तेव्हा पिशाच्चाचा आकार अजून मोठा झाला.
ते जितक्या रागाने लढत, तितकाच तो अधिक बलवान होत असे.
प्रहर संपला, आणि पहारा देण्याची वेळ भगवान श्रीकृष्णांची आली.
पिशाच्चाने मोठ्या रागाने श्रीकृष्णांना बोलावले.
परंतु श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले.
पिशाच्च अधिकच संतापले आणि मोठमोठ्याने ओरडू लागले, पण श्रीकृष्ण मात्र शांत भाव जपत राहिले.
आश्चर्य असे झाले की, जसे जसे पिशाच्चाचा राग वाढला, तसे तसे त्याचा आकार छोटा होत गेला.
रात्र संपता संपता पिशाच्चाचा आकार इतका लहान झाला की तो शेवटी एक छोटासा किडा झाला.
श्रीकृष्णांनी तो किडा अलगद त्यांच्या उपरण्यात बांधला.
सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी श्रीकृष्णांना सांगितली.
तेव्हा श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखवत सांगितले:
“हे क्रोधाचे पिशाच्च होते. याला शांती हेच औषध आहे.
क्रोधाने क्रोध वाढतो, पण त्याचा प्रतिकार फक्त शांततेने होतो.
मी शांत राहिलो, म्हणून हे पिशाच्च आता किड्यासारखे लहान झाले आहे. ”
तात्पर्य:
क्रोधावर संयमानेच विजय मिळवता येतो.
क्रोधाला क्रोधाने मारता येत नाही; तो शांतपणे आणि प्रेमानेच कमी करता येतो, नष्ट करता येतो.
क्रोधाचे हे पिशाच्च बाहेर कोठे नसून, आपल्या विचारांमध्येच असते.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती: सौ.राधा पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुंदर