श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ लोकलचा प्रवास आणि लग्न… लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
नोकरीनिमित्त उपनगरातून मुंबईला लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे विवाह हे सहजासहजी मोडत नाहीत, अशी माहिती नुकतीच एका सर्व्हेमुळे समोर आली. यामागची कारणे जाणून घेण्यासाठी आमच्या काही प्रतिनिधींनी सोमवार ते शुक्रवार असा सलग पाच दिवस सकाळी कल्याण ते दादर असा ‘वरून’ येणाऱ्या गाडीने व पुन्हा सायंकाळी ‘दादर ते कल्याण’ असा लोकलचा प्रवास चक्क पिक अवर्समध्ये केला व त्यांना आलेल्या अनुभवांवरून यामागची काही कारणे शोधण्यात आम्हाला यश आले आहे.
सकाळी घरून निघताना एखादी फास्ट गाडी मनात ठरवून स्टेशनला यावे, तर ती गाडी वरूनच खचाखच भरून आलेली. मुंगीलाही आत शिरायला जागा नाही. नाइलाजाने ती गाडी सोडून हताशपणे दूर जाताना तिच्याकडे पहात बसायचे. नंतर एक स्लो लोकल.. बऱ्यापैकी रिकामी.. पण तुम्हाला नकोशी. मग शेवटी काँप्रोमाईज करून एक सेमीफास्ट लोकल पकडायची. ह्या रोजच्या प्रकारामुळे एक तडजोडीचा गुण माणसात तयार होतो. त्याला आवडणारी मुलगी त्याला नाकारून दुसऱ्याबरोबर लग्न करते तर जी याच्याशी लग्नाला तयार असते.. याला पसंत नसते. शेवटी घरच्यांच्या इच्छेप्रमाणे एका ‘अनुरूप’ मुलीशी विवाह करण्याची तडजोड तो याच प्रवासात शिकलेला असतो.
बरे.. तडजोड करून पकडलेल्या ह्या सेमीफास्ट गाडीतही लगेच सीट मिळत नाहीच. पण हा जरा धावपळ करून खिडकीत समोरासमोर बसलेल्या दोन माणसांच्या पुढ्यात जाऊन उभा रहातो. हे दोघे तर लवकर उठत नाहीतच; पण येणाराजाणारा प्रत्येक जण आपली बॅग स
शेल्फवर ठेवण्यास वा काढण्यास यालाच सांगत रहातात व त्यालाही तेथे उभे राहिल्याने हसतमुखाने हे काम करत राहावे लागते. यातून आपला काही फायदा असो वा नसो.. न थकता शेवटपर्यंत, इच्छा असो वा नसो.. हसतमुखाने सासुरवाडीच्या नातेवाईकांची कामे करण्याचा गुण यांच्या अंगी बाणला जातो.
अशा माणसांना गाडीत चढल्या चढल्या चुकून कधी बसायला जागा मिळालीच तर नेमके त्याच डब्यात कोणीतरी वृद्ध अथवा आजारी व्यक्ती चढते व त्याच्या समोर उभे राहून आशाळभूतपणे बघू लागते. इतर प्रवाशांच्या चेहऱ्यावरही याने उठून त्यांना जागा द्यायलाच हवी, असे भाव असतात. मग नाईलाजाने तो उभा राहून त्या वृद्धास वा आजाऱ्यास जागा करून देतो. यातूनच सासुरवाडीच्या वृद्धांची व रुग्णांची सेवा करण्याचा गुण वृद्धिंगत होतो.
लोकलच्या लेडीज डब्याचे नियम तर फार कडक. चुकून त्यात पुरुष शिरला तर बायकांचे शिव्याशाप.. क्वचित मारही खावा लागतो. त्यातून घोर अपमान व पोलिसांच्या हवाली होणार ते वेगळेच. यामुळेच चार बायका एकत्र दिसल्या की तेथून दूर होण्याच्या गुणाची निर्मिती होते. त्यामुळेच घरी हॉलमधे किटी पार्टी, भिशी, हळदीकुंकू वगैरे सुरू असल्यास हा त्यात लुडबूड न करता बेडरुममध्ये शांत पडून राहतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या लोकल प्रवासातून तयार होणारी प्रचंड सहनशक्ती. आपला चुकून धक्का लागला तरी खुन्नस देणाराच आपल्या शेजारी बसल्यावर मात्र पेपर वाचताना त्याचे कोपर पोटात खुपसतो.. समोरचा मोबाईल वाचता वाचता नाकात बोटं घालतो.. कुणाच्या घामाचा प्रचंड वास येत असतो.. एक ना अनेक नरकयातना या तासाभरात त्याच्या वाट्यास येत असतात व त्या शांतपणे भोगल्याने मनस्ताप सहन करण्याची प्रचंड ताकद यांच्यात तयार होते, जी संसारात पदोपदी उपयुक्त ठरते !
तसेच दिवसभर कितीही उंडारले तरी संध्याकाळी ठरलेल्या गाडीने ठरलेल्या वेळी घरी परत येणे, हाही एक वाखाणण्याजोगा गुण..
असे एक ना अनेक गुण आहेत जे पिक अवर्समधे प्रवास करणाऱ्यांच्यात निर्माण होतात, जे त्यांचे वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करतात.
आमच्या प्रतिनिधींना आलेले हे अनुभव जेमतेम ५ दिवसांचे आहेत. पण आपण जर वर्षोनवर्षे असा प्रवास करत असाल व आपले याबाबत काही विशेष अनुभव असतील तर ते आम्हाला नक्की कळवा !
☆
लेखक : अज्ञात
संग्राहक :श्री. अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
kelkaramol.blogspot.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈