सौ. शशी नाडकर्णी-नाईक
वाचताना वेचलेले
☆ “रांगोळीचा किस्सा…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆
☆
आजेसासूबाई आंघोळ उरकून, बाहेर तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढत होत्या. अनेक ठिपक्यांच्या रांगा आणि त्यांच्या सुरकुतलेल्या बोटांमधून भरभर पडणारी, न तुटणारी, ओल्या तांदूळ पिठाची ओळ. बघता बघता माझ्या डोळ्यांसमोर अनेक पाकळ्यांचं कमळ तयार झालं, तेही ओळ कुठेही न तुटता.
थोड्या वेळाने बेल वाजली. मी दार उघडलं. रोजचा भाजीवाला आला होता. त्याने आपली टोपली खाली ठेवली तर त्याचा तोल थोडा सुटून, रांगोळीच्या एका पाकळीवर ती पाटी घासली. अजून तांदूळ पिठाच्या ओळी सुकल्या नव्हत्या. त्यामुळे ती पाकळी साहजिकच विस्कटली. आजींनी इतका वेळ खपून काढलेली रांगोळी जेमतेम पंधरा मिनिटंसुद्धा टिकली नव्हती. मला खूप वाईट वाटलं.
मी त्या भाजीवाल्यावर ओरडणार, इतक्यात आजीच बाहेर आल्या.
त्यांनी भाजी घेतली, पैसे दिले आणि त्या परत आत निघून गेल्या. विस्कटलेल्या रांगोळीकडे त्यांनी पाहिलं, पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही. मी मात्र खूप वेळ हळहळत होते.
नंतर दुपारी जरा निवांत बसलो असता, मी आजींना विचारलं, इतकी खपून काढलेली सुरेख रांगोळी पंधरा मिनिटंसुद्धा टिकली नाही. तुम्हाला वाईट नाही वाटलं ?
त्या हसल्या. म्हणाल्या, रांगोळी काढीत होते तोवर ती माझी होती. ज्या क्षणी रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी ती बघणाऱ्याची झाली. रांगोळी काढताना ज्या आनंदाची अनुभूती मला झाली होती, त्याच आनंदाची अनुभूती तुला रांगोळी बघताना झाली ना ? मग झाला रांगोळीचा उद्देश सफल !
इतकी मन लावून काढलेली सुरेख रांगोळी पूर्ण झाली, त्या क्षणी त्यांनी त्या रांगोळीतून स्वतःच्या भावना अलगद हलक्या हाताने सोडवून घेतल्या होत्या.
रांगोळीचा उद्देशच हा असतो. जीवन कितीही सुंदर असलं, तरी ते रांगोळीसारखंच क्षणभंगुर आहे, हे स्वतःला दररोज बजावून सांगण्याचा रांगोळी हा एक सुंदर मार्ग.
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
वाह! किती सुंदर लेख माझ्या पण रांगोळी जुळलेल्या खूप आठवणी आहेत.