वाचताना वेचलेले
☆ ‘जीभ…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – श्री मनोहर जांबोटकर ☆
जिभेला कधीच सुरकुत्या पडत नाहीत.
जिभेला चिरकाल यौवन प्राप्त झालेले आहे.
माणूस हवा तेवढा वृध्द होवो, देहावर कितीही सुरकुत्या पडोत, डोळ्यांनी दिसत नसू दे, तरतरी नाश पावू दे, पण जीभ कधीच म्हातारी होत नाही. तिचा आवेश आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत तसाच टिकून राहतो !
जिभेचं रूप-स्वरूप बरंच लहान आहे, पण या लहानशा इंद्रियावर विजय मिळवणं, कठीणातलं कठीण काम आहे
मुख-म्यानात राहणारी जीभ ही दुधारी तलवार आहे. ही जीभ ताब्यात राहावी म्हणून निसर्गाने दातरूपी बत्तीस चौकीदार बसविलेले आहेत. पण जीभ अशी जबरी आहे की, कालांतराने दातांनादेखील उखडून टाकते तशीच तोडूही शकते.
कुणाला ती घायाळ करते,
तर कुणाच्या जखमाही बुजवून टाकते.
तिच्यातून अमृत झरते,
तसेच हलाहल विषदेखील निर्माण होते.
जिभेची जमीन अशी विचित्र आहे की, तिथे फुले फुलतात, तसेच काटेही उगवतात.
अतिश्रमाने देहाचा प्रत्येक अवयव थकतो, ज्ञानतंतू थकतात. पण जिभेला असे यौवन प्राप्त झालेले आहे की तिला कधीच थकवा जाणवत नाही. अनेक प्रकारच्या प्रचंड शक्ती धारण करणाऱ्या ह्या इवल्याशा जिभेवर ताबा मिळविणे हे दुष्कर काम आहे आणि जे लोक जिभेवर उत्तम ताबा मिळवू शकतात, तितक्याच प्रमाणात ते खरे जीवन जगू शकतात. कटू, पण त्रिकाल सत्य…
लेखक: अज्ञात
प्रस्तुती :श्री मनोहर जांबोटकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈