सुश्री प्रभा हर्षे
वाचताना वेचलेले
☆ “खरंच आम्ही वांझ आहोत…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
खरंच आम्ही वांझ आहोत…
(बहुतांश उच्चशिक्षित लोकांच्या घरातील भयाण वास्तव.)
“नमस्कर सुधाकरराव, फार दिवसांनी भेटलात.”
“होय खरे आहे, मी इथे नव्हतो. तिकडे कॅनडा ला गेलो होतो.” सुधाकरराव बोलले.
“कॅनडाला?” शंकरराव म्हणाले.
“होय दोन मुले होती. एक आहे कॅनडाला, दुसरा ऑस्ट्रेलियाला.”.. सुधाकरराव म्हणाले
”अहो. होती काय म्हणत आहात?” शंकररावांनी आ वासुन विचारले.
…”नाहीतर काय म्हणणार. आज भारतात आम्ही दोघेच आहोत.” शंकरराव बोलते झाले…” वय झालं आहे. तिचं सततचं दु:खणं असतं. दवाखान्यात न्यायला कुणी सोबत नाही. साधी दूधाची पिशवी कुणी आणायची हा प्रश्न आहे. तो शेजारचा आसाराम माझ्या पेक्षा कैक पटीने सुखी आहे. चारपाच मुलं, दोन-तीन मुली, आठ दहा नातवंडं… नुसता गोंधळ असतो. त्याचे कुणी पाय चोपत असतं, तर डोकं चोपत असतं, तर कुणी डोक्याला तेल लावतं असतं… साधा खोकला आला तर चार चार जण आसारामला उचलतात, दवाखान्यात नेतात, सलाईन लावतात. पलंगावर दोघं जण उषा पायथ्याला बसतात. दवाखान्याबाहेर आठजण बसून असतात. कुणी शिरा आणतं, कुणी सफरचंद आणतं, कुणी बिस्किटं आणतयं. आसारामच्या दिमतीला पंधरा माणसं…… आमचा मोठा बंगला, लाखभर पेन्शन, अलिशान गाडी, पण साधं गेट उघडायला कुणी नाही. गाडी चालवायला कुणी नाही. त्या आसारामच्या दारात मोडक्या तोडक्या का असेना चार पाच बाईक उभ्या असतात. कुणी भाजी आणतयं, कुणी पिण्याचं जार आणतंय, कुणी दळण आणतंय, कुणी भेटायला आलेल्या पाहुण्याला सोडायला जातंय, कुणी स्टॅन्डवरच्या पाहुण्याला आणायला जात असतंय. म्हतारी दोनचार नातवाला घेवून किराणा दुकानांवर दिवसभर चकरा मारत असते.
रात्री बारा वाजेपर्यंत यांचा आरडा ओरडा, गप्पा, हास्य कल्लोळ चालुच असतो. दहा बारा पत्र्यांचं घर आणि अंगण कस गजबजलेलं असतं… माझ्या कॅनडाच्या मुलाला ३० लाखांच पॅकेज, ऑस्ट्रेलिया वाल्याला ३५ चं पॅकेज आणि आम्हांला लाख भर पेन्शन… त्या आसारामचा सारा खेळ रोजचा हजार दोन हजाराचाच. पण काय थाट. साधा पाण्याचा मातीचाच माठ पण थंडगार पाणी, जेवण सोन्यावाणी.
आता कोण सुखी तुम्हीच सांगा शंकरराव…… तो आसाराम का मी एक्स कमिशनर… माझ्याकडे कुत्रं नाही. आसारामकडे माणसंच माणसे… आता बोला आम्ही वांझ नाही तर काय आहोत.
परवा मोठ्या मुलाला ही बोलली ‘ एकदा ये महिनाभरासाठी ‘. तर तो म्हणाला ‘ महिनाभरासाठी? मला एक तासाचा वेळ नाही. ’…. चिडून ही म्हणाली,”मेल्यावर तरी येणार का? नाही. तेव्हा तो काहीच बोलला नाही. फोन खाली ठेवला. सांगा शंकरराव आम्ही वांझोटे नाही तर काय आहोत ? … मला माझं काही वाटत नाही. मी गेल्यावर शेवंतीच कसं होईल हीच चिंता आहे. नापास मुलंच आई बापांचा खरा आधार आहेत. आसारामचं एक पोरगं मॅट्रीक पास नाही, पण त्याच्या इतका सुखी कुणी नाही….. परवा आसारामच्या मुलानं हिला दवाखान्यात नेलं आणलं. आसारामच्या सुनाने स्वयंपाक करुन दिला.
काय मिळवलं मी कुणासाठी?… मुलं म्हणतात आम्हाला तुमचं घर नको शेती नको…
… आणि आणि तु…. म्हीही न.. को.. त.”
सुधाकररावांचे डोळे भरून आले. शंकररावांनाही नाही आवरले.
शकंररावांनाही मुलं जास्त काही मोठी झाली नाही याची जी खंत होती, ती दुर झाली.
सुधाकरराव एकदम कठोर झाले. म्हणाले…
“मी वांझोटा नाही राहणार. मी माझं सारं सारं आसारामच्या मुलांना दान करणार. बदल्यांत फक्त प्रेमळ चटणी भाकरीचाच सहवास मागणार. बाकी काही नको.”
जीवन केवळ धन नाही तर सुखी मन खरं धन आहे.
मुलं आय आय टी झाली आणि आय माय टी ला म्हणजे चहाला महाग झाली.
मुलं असावीत पण कामाची असावीत. नसता काय नुसती पाटी लावायला कशाला हवीत.
… शंकररावांनी घरी परततांना नातवंडासाठी एक नाही दोन टरबूज घेतले आणि समाधानाने घराकडे धावले. त्यांचं गोकुळ त्यांची वाट पहात होते.
– – सहकुटुंब सहपरिवार …. तेथे आनंदाला नाही पारावर.
– – – वरील बोधप्रद पण सत्य वस्तुस्थिती आहे.
मोठे घर पोकळ वासा, हवा की घर गोकुळासारखे भरलेले पाहीजे.
पैसा हवा की, समाधान शांती…. प्रेम हवयं की, दुरावा….. एकलकोंडे रहायचं की, आनंदी परीवारात.
… माणुसकी हवी की, फक्त पैसा……. या सर्व गोष्टींचा विचार करण्याची खरी गरज आहे…
म्हणून पालकांनो आपल्या मुलींना गोकुळासारखे घर भरलेले असलेल्या परीवारातच द्या. म्हणजे ती एकटी पडणार नाही. तुमच्या मुलीला सुख समाधान समृध्दी आनंद अशाच परीवारात मिळेल जेथे माणसेच रहातात. चांगली माणसें चांगला परीवार पाहून आपण आपल्या मुली अशाच घरी द्या.
योग्य वेळी योग्य वयातच मुलामुलींचे विवाह करा. भौतिक सुखाची अवास्तव अपेक्षा करु नका. हे क्षणिक सुख आहे…….
इतरांच्या घरी माणिक मोती पैसा कणसं ।
माझ्या घरी लाख मोलाची जीवाभावाची माणसं ।।
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈