श्री अनिल वामोरकर
📖 वाचताना वेचलेले 📖
☆ कधीतरी स्वतःसाठी… – लेखक – श्री मंगेश विठ्ठल कोळी ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆
आनंदात रहायचे असेल तर कमी बोला. इतरांच्या खोचून टोचून बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिका. दिखावा करू नका, की दुसऱ्यांना मी असा मी तसा सांगण्यात वेळ घालवू नका. तुमच्या वागण्या बोलण्यात आत्मविश्वास असायला हवा. स्वतःला आत्मसन्मान नक्कीच द्या. तुम्ही कुणासाठी नाही, पण स्वतःसाठी खुप अनमोल अमूल्य आहात. हे पक्के लक्षात घेऊन जगणे गरजेचे आहे. सतत त्याच त्याच गोष्टी उगाळत बसू नका. त्यात कोणीही इंटरेस्ट घेत नाही.. सगळे माझ्यासारखेच वागले पाहिजेत हा हट्ट सोडा. तुम्ही सर्व जगावर कार्पेट घालू शकत नाहीत. हा, पण स्वतःच्या पायात नक्की चप्पल घालू शकतात.
मेडीटेशन, अध्यात्म, व्यायाम ह्या गोष्टी तुमच्या शरीराला टॉनिक आहे त्याचा कंटाळा करू नका. प्रत्येक गोष्टीत काहीना काही भावार्थ असतो. व्यायाम तब्येत शेवटपर्यंत ठणठणीत ठेवते. अध्यात्म तुम्हाला मनावर नियंत्रण ठेवायला शिकवतो. मेडीटेशन तुमचा राग लोभ मद मोह मत्सर यावर नियंत्रण ठेवायला शिकवते.
मुलांकडून फार अपेक्षा ठेऊ नका त्यांच्या आणि आपल्या पिढीत फार मोठा फरक असतो आणि तो कधीच मॅच होणार नाही ही भावना ठेवा म्हणजे अपेक्षांचे ओझे त्यांच्या बाबतीत रहाणार नसते. काळानुसार गरजा व्यक्ती बदलत जातात. अगदी साधे उदाहरण 2000 ची नोट जी पूर्वी आपण फार जपून ठेवली आता रस्त्यात पडली तरी कोणी उचलणार नाही. कारण काळानुरूप त्याचे महत्व कमी झाले. *नाती कितीही जवळची असली तरी वेळ आली की लोक काढता पाय घेतातच. आपण रामायण महाभारत वाचतो ते दुसरे तिसरे काहीही नसून जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. रामासारखा पती असून देखील सीतेला अग्नी परीक्षा द्यावी लागली. भर सभेत द्रौपदी वस्त्रहरण झाले एव्हढे सर्व समोर आपली लोक असूनदेखील द्रौपदीला वाचवायला प्रत्यक्ष नारायण ह्यांना यावे लागले. केवळ तिच्या एका चींधीने श्रीकृष्णाने तिची लाज राखली. त्यामुळे सत्ययुग, द्वापार युगातील ही एकवचनी लोक असूनदेखील असे दाखले दिसतात तर कलयुगात आपण अपेक्षा कुणासाठी आणि का ठेवायची. लोकांकडे, नको त्या आठवणी, नाते संबंध फार चर्वीचरन करत बसू नका. जास्त लक्ष न देता, आपले जगणे कसे छान होईल हे बघा.
मी माझ्या रोजच्या जीवनात खूप छान छान सकारात्मक बदल घडवून आणले आहेत का? याचा अभ्यास केला पाहिजे. तेच ते पुन्हा पुन्हा बोलणे विचार करणे माझ्याकडून होते का. आणि त्यात मी स्वतःला गुरफटून घेतले का? त्यातून माझे काढून घ्यायला, काय केले पाहिजे. हेही कळणे तितकेच महत्वाचे आहे. अहो उद्याचा दिवस आपला आहे की नाही ह्याचा भरवसा नाही. मग कशासाठी मनाला त्रास देऊन जगत रहायचे. दिलखुलास मनमोकळे जगणे, म्हणजेच आपणच आपले फुलत राहणे होय. ह्यामुळे ताणतणाव कमी होऊन, मनाची अवस्था आनंदित राहते. कधीच स्वतःला दुर्लक्षित करू नका. तुम्ही खूप महत्त्वाची व्यक्ति आहात. स्वतःला सक्षम बनवा. आदर करा स्वतःचा. कुणा दुसर्याची गरजच पाडणार नाही.
दुसर्याने तुमची स्तुती केली तरीही हुरळून जाऊ नका, आणि दुर्लक्ष, तिरस्कार केलत तरीही मनाला लावून घेऊ नका. त्यात आपल्याला आपले अनमोल आयुष्याचे अजिबात दिवस घालवायचे नाहीत, भारी जगायला आपण आपला चेहरा नेहमी हसरा ठेवा, त्यातून तुमच्या मनाचे प्रतिबिंब उठून दिसते… हसायला फार पैसे लागत नाहीत. त्यात अजिबात कंजूषी करू नका. रोज सकाळी उठून जसे जमेल तसे मस्त व्यायामाने सुरुवात करा. दिवसभर चांगली एनर्जी टिकून राहते. वेळ नाही वेळ नाही, ही नुसती पळवाट असते. वेळ मिळत नसतो. तो काढावा लागतो. उपवास शरीराला चांगला. तसेच मनाला आनंदी, फ्रेश ठेवायचे असेल तर. चांगल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. नको तो विचारांचा गुंता, त्यात अडकायचे नसते. मानस शास्त्र असे सांगते की दिवसाला तुमच्या डोक्यात 80 हजार विचार येतात. जर तुम्ही सगळेच घेऊन बसलात तर जगणे हराम होईल. आपली आण, बाण, शान आपणच आहोत हे लक्षात घेऊन जगणे सुरू ठेवले की मग फारसे काही जाणून बुजून करावेच लागत नाही, की नको ते प्रश्न फारसे डोक्यात पिंगा घालत नाहीत.
परमेश्वराची आठवण स्मरणात राहू द्या. केवळ आणि केवळ तोच तरून नेणारा आहे. फक्त आपला त्यावर विश्वास पाहिजे. देव कधीही कुणाचे चांगले किंवा वाईट करत नाही. मनुष्य आपल्या कर्मानेच चांगले वाईट दिवस आणतो. देव कुठे माझ्याकडे लक्ष देतो असे म्हणून त्याच्यावर अविश्वास दाखवू नका किंवा त्याला टाळू नका. कितीही पैसा प्रॉपर्टी आली तरी सगळे इथेच सोडून जायचे आहे ही जाणीव ठेवली की मग अहंकार आपोआप गळून पडतो. ख-या गरजवंताला नक्की मदत करा. आपण फक्त शंभर वर्षाच्या लिजवर इथे आलो अहोत हे लक्ष्यात ठेवले तर मीपणा निघून जातो, आणि आयुष्याचे सोने झाल्याशिवाय रहात नाही. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा. आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये. याचीही काळजी तुच घे. आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा, पण लोकशाही व संविधान सुरक्षित ठेवा. एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यांना मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका. समाजातील खोट्या, राजकारणी, मतलबी, स्वार्थी, गर्विष्ठ, अहंकारी, लबाड, लोकांपासुन सावध व दूर रहा, अफवानवर विश्वास ठेवण्या आधी प्रथम खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा.
लेखक – श्री मंगेश विठ्ठल कोळी
प्रस्तुती – श्री अनिल वामरकर
अमरावती
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
खूपच सुंदर वेचे आहेत. यातील प्रत्येक ओळ, प्रत्येक वाक्य हेआयुष्याच्या वाटेवर कायम मार्गदर्शक, अनुसरणीय ठरेल असेच आहे.
– रवींद्र खासनीस
हा लेख म्हणजे आजच्या काळातला कृष्ण होऊन सांगितलेली गीता.