श्री सुहास सोहोनी
वाचताना वेचलेले
☆ वागणुकीची इस्त्री ! – लेखक : श्री सचिन मेंडिस ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆
कधी कधी अगदी छोट्याशा चुका फार मोठं काही शिकवून जातात. मागच्या आठवड्यातील किस्सा घ्या. नवा कोरा, रेशमी कुर्ता इस्त्री करायला घेतला. मनात उत्सुकता होती, एकदम टापटीप दिसायला हवा. पण लक्षात आलं नाही की इस्त्री सुती कपड्यांसाठी तापवलेली होती. अतिशय उच्च तापमानावर. सरळ गरम इस्त्री कुर्त्याच्या छातीवर टेकवली आणि क्षणात… एक भला मोठा काळा डाग उमटला. थोडं सावरायच्या आतच एक अनपेक्षित, अक्राळ विक्राळ भगदाड. इस्त्रीची सेटिंग न पाहता सुती कपड्याचं उच्च तापमान रेशमी कपड्यावर लादण्याचा बेफिकीरपणा मला चांगलाच नडला होता.
ते भगदाड पाहून खूप वाईट वाटलं. पण त्या क्षणात एक वेगळाच विचार मनात चमकून गेला. आपण नात्यांमध्येही हेच करत नाही का? प्रत्येक माणूस वेगळ्या फॅब्रिकचा असतो. कुणी डेनिम, सहजपणे सगळं सोसून घेणारं. कुणी लिनन थोडं टोकदार पण व्यवस्थित सांभाळलं तर शिस्तीत बसणारं. आणि काही माणसं रेशमासारखी अतिशय नाजूक, हलकसं गरम तापमानही न झेलता येणारी.
पण आपण काय करतो? सगळ्यांना एकाच वागणुकीने हाताळायला जातो. आपल्या स्वभावाच्या तापमानात कुणी सहज बसतं, कुणी त्यात व्यवहार म्हणून सांभाळून घेतं, आणि काहीजण आपली रेशमी नाती सोडून कायमचे निघून जातात. आपण बोलतो, वागतो विचार न करता. आपल्या शब्दांची उष्णता समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या वस्त्रांना झेलता येईल का, याचा विचार करत नाही आणि मग जळालेले डाग पाहून आपल्यालाच वाईट वाटतं. खरं तर आपल्या स्वभावाच्या तापमानावर माणसं मोजायची नसतात, त्यांना त्यांच्या धाग्यांच्या ताकदीने समजून घ्यायचं असतं. प्रत्येक माणूस वेगळ्या फॅब्रिकचा असतो. त्याला समजून घेतलं तर नातं टिकतं, नाहीतर फक्त जळालेले ठसे उरतात.
काही नाती गरम इस्त्रीनेच नीट बसतात. थोडं स्पष्ट बोलावं लागतं, काही वेळा थोडं तापूनही घ्यावं लागतं. पण काही नाती मात्र फक्त गारवा ओळखतात. त्यांना उष्ण स्पर्श झेलताच येत नाही. बोलण्याच्या उष्णतेने जर नातं जळत असेल, तर समजून घ्या की तुम्ही योग्य तापमान ठरवलेलं नाही. आपण जर आपल्या संवेदनशीलतेचे तापमान व्यक्तीनुसार हाताळले, तर नाती सहज टिकतील, सुरकुत्या विरहित होतील आणि कुठेही न जळता सुंदर दिसतील.
पुढच्या वेळी इस्त्री हातात घेतली किंवा कुणासोबत संवाद साधला तेव्हा स्वतःला एकदा विचारून बघा, ही व्यक्ती सुती आहे की रेशमी? आणि त्यानुसार आपल्या वागणुकीचं तापमान ठरवा. सगळ्या नात्यांना सारखं तापमान लागू केलं की काही सुरकुत्याही नाहीशा होतात आणि काही नातीसुद्धा. जळलेला रेशमी कुर्ता एकवेळ शिवता येईल पण जळलेलं नातं पुन्हा विणता येईलचं असं नाही.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी काही ऋणानुबंध असतात.
निरपेक्ष प्रेमाने जवळ येणारी माणसं ओळखता आली पाहिजेत. कारण परमेश्र्वराने आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळावी म्हणून ती योजना केलेली असते पण आपण वारंवार त्यांना नाकारलं तर ते पुन्हा कधीही आपल्या जवळ येणार नाहीत. कारण सुसंधी वारंवार मिळत नाही.
लेखक – श्री सचिन मेंडीस
प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈