☆ ‘तीन मनोरंजक लघुकथा…‘ — लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. बिल्वा शुभम् अकोलकर ☆
(ह्या तिन्ही कथांना सखोल अर्थ आहे. कथा वाचून आपल्याला नक्कीच हसायला येईल.)
☆ एक – गहन ☆
मी एका लहान मुलाला आईस्क्रीम खाताना बघितलं. त्याची काळजी वाटून मी त्याला सहज बोललो,
‘आज खूप थंडी आहे हे आईस्क्रीम खाऊन तू आजारी पडशील! ‘
तो मुलगा उत्तरला –
‘माझी आजी १०३ वर्षांपर्यंत जिवंत राहिली.’
मी विचारलं,
‘आईस्क्रीम खाल्ल्यामुळे? ‘
तो म्हणाला – ‘ नाही, कारण तिने कधीच दुसऱ्याच्या कामामध्ये नाक खुपसले नाही! ‘
किती खोल अर्थ दडला होता त्या उत्तरात!
आता मला समजलं की मी इतक्या वेगाने का म्हातारा होत चाललोय – – –
– – कारण नसताना मी दुसऱ्याच्या कामात केलेली ढवळाढवळ. दुसरं काय!
**********
☆ दोन – थकलेला ☆
आज-काल जिथे तिथे घोटाळेबाज दिसून येतात. मी नुकताच बातम्यांमध्ये लोकांच्या बँक अकाउंटबद्दल बातम्या पाहात होतो – लोकांच्या खात्यांतून लाखो रुपये बघता बघता नाहीसे झाले होते आणि ते कुठे गेले याचा मागमुसही लागत नव्हता.
ती बातमी पाहून जाम घाबरलेलो मी माझ्या बाईकनं बँकेत गेलो. एटीएम मध्ये माझं कार्ड स्वाईप केलं, माझा पासवर्ड टाकला आणि माझ्या खात्यातली शिल्लक तपासली. माझ्या खात्यात शिल्लक असलेले साडेसातशे रुपये अजूनही माझ्या खात्यातच पडून होते. मी सुटकेचा निश्वास टाकला.
बापरे, माझ्या मनावरचा दड़लेला ताण आता हलका झाला होता. आता यापुढे पुन्हा कधी बातम्या ऐकणार नाही असं मी मनोमन ठरवून टाकलं. नको पुन्हा तो भयंकर तणाव!
एटीएम मधून बाहेर पडलो तेव्हा हे बघून मी मनानं आणखीनच हबकून गेलो.. कारण हे माझे साडेसातशे रुपये अजूनही तसेच माझ्या खात्यात शिल्लक असले तरी माझी मी नुकतीच पार्क केलेली बाईक मात्र आता जागेवर नव्हती.
**********
☆ तीन – थांबा ☆
एक तरुणी ट्रेनमध्ये चढली आणि आपल्या सीटवर दुसराच कोणी माणूस बसल्याचं तिनं पाहिलं. विनम्रतेने आपलं तिकीट तपासून बघितलं आणि ती म्हणाली, ‘ सर, मला वाटतंय आपण चुकून माझ्या सीटवर बसला आहात. ’
त्या माणसानं आपलं तिकीट काढलं आणि तिला ते दाखवत तो तिला रागाने ओरडून म्हणाला, ‘ हे तिकीट जरा नीट बघ. ही माझीच सीट आहे. तू आंधळी आहेस का गं? ’
त्या तरुणीने बारकाईने ते तिकीट तपासलं आणि तिने त्या माणसाशी वाद करणं थांबवलं. ती काही न बोलता त्या सीटपाशी उभी राहिली.
ट्रेन सुरू झाल्यावर काही वेळानं ती तरुणी खाली वाकून त्या माणसाला म्हणाली,
‘सर, तुम्ही चुकीच्या सीटवर नाही बसलात.. परंतु तुम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसला आहात. ही ट्रेन मुंबईला जातेय आणि तुमचं तिकीट आहे अहमदाबादचं.. ‘
तात्पर्य…
मनावर संयम असावा. आपण बोलण्यापूर्वी किंवा कृती करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.
अन्यथा आपल्याला पश्चात्ताप करावा लागू शकतो.
फक्त ओरडण्याने जर सगळेच प्रश्न सुटले असते तर कदाचित या जगावर गाढवांनीच राज्य केलं असतं.
😂😂😂
☆
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप छान तिन्ही गोष्टी. पहिली व तिसरी दुसरीकडे कुठेतरी वाचलेली आहे. मधली नव्हती वाचली.