सौ. मंजुषा सुनीत मुळे
📚 वाचताना वेचलेले 📖
☆ “कराया साजरा । होलिकेचा सण ।।” – संत जना बाई ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
कराया साजरा । होलिकेचा सण ।
मनाचे स्थान । निवडिले ।।
ऐसे ते स्थान । साधने सरावले ।
भक्तीने शिंपिले । केले सिद्ध ।।
*
त्या स्थानी खळगा । समर्पणाचा केला ।
त्यात उभा ठेला । अहंकार एरंड ।।
रचलीया तेथे । लाकडे वासनांची ।
इंद्रियगोवऱ्याची । रास भली ।।
*
गुरुकृपा तैल । रामनाम घृत ।
अर्पिले तयात । ऐसे केले ।।
रेखिली भोवती । सत्कर्म रांगोळी ।
भावरंगाचे मेळी । शोभिवंत ।।
*
वैराग्य अग्नीसी । तयाते स्थापिले ।
यज्ञरूप आले । झाली कृपा ।।
दिधली तयाते । विषय पक्वान्नाहुती ।
आणिक पूर्णाहुति । षड्रिपू श्रीफळ ।।
*
झाले सर्व हुत । वैराग्य अग्नीत ।
जाणावया तेथ । नुरले काही ।।
वाळ्या म्हणे जनी । व्हावी ऐसी होळी ।
जेणे मुक्तीची दिवाळी । अखंडित ।।
☆
– संत जनाबाई
प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
जनाबाईची होळी मस्त