? वाचताना वेचलेले ?

☆ मी पाहिलेली जगातील सर्वात सुंदर भिंत ☆ प्रस्तुती – श्री विनय माधव गोखले ☆ 

(एक बोधकथा)

इटलीमधील व्हेनिस शहरातील एका कॉफी शॉपमध्ये मी मित्रांसोबत बसलेलो होतो.आम्ही गप्पा आणि कॉफीचा आस्वाद घेत होतो. तेवढ्यात एक माणूस आला आणि आमच्यासमोरील टेबलवर बसला. त्याने वेटरला बोलवले आणि ऑर्डर दिली.” दोन कॉफी….एक माझ्यासाठी आणि एक त्या भिंतीसाठी !”

माझ्या मनात उत्सुकता निर्माण झाली. मी त्या व्यक्तीकडे पाहू लागलो. वेटरने त्याला एकच कॉफी आणून दिली. बिल मात्र दोन कॉफीचे होते. त्या व्यक्तीने दोन कॉफीचे बिल दिले आणि तो निघून गेला. लगेच वेटरने एक चिठ्ठी भिंतीवर चिटकवली आणि ओरडला, ‘ एक कॉफी ऑफ कप.’

आम्ही तिथेच गप्पा मारत बसलो. तेवढ्यात आणखी दोघेजण तिथे आले. त्यातील एकाने तीन कॉफीची ऑर्डर दिली. दोघांनी एक-एक कॉफी घेऊन तीन कॉफीचे पैसे दिले. मग पुन्हा वेटरने काहीतरी लिहिलेला कागदाचा एक तुकडा तिथे चिटकवला आणि पुन्हा तेच ओरडला. आमच्यासाठी हे एक नवलच होते. आम्ही कॉफी संपवली आणि बिल देऊन बाहेर पडलो.

काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्याच कॉफी शॉपमध्ये जाण्याचा योग आला. आम्ही कॉफीचा स्वाद घेत असतानाच एक गरीब दिसणारी व्यक्ती आली आणि समोरील टेबलावर बसली. त्या व्यक्तीने वेटरला सांगितले की,”  वन कप ऑफ कॉफी फ्रॉम द वॉल.”

त्या वेटरने नेहमीच्याच अदबीने त्या व्यक्तीला कॉफी दिली. त्या व्यक्तीने कॉफीचा आस्वाद घेतला आणि बिल न देताच ती व्यक्ती निघून गेली.

हे सगळे पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो होतो. तेवढ्यात त्या वेटरने भिंतीवर चिटकवलेला कागदाचा तुकडा काढून डस्टबिनमध्ये टाकून दिला. या शहरातील गरीबांनाही कॉफीचा आस्वाद घेता यावा यासाठी कुणीतरी काळजी घेणारे होते. ती काळजी अतिशय आदराने आणि कुणालाही कळणार नाही अशा पद्धतीने घेतली जात होती. त्या गरीबाच्या प्रतिष्ठेला कुठेही धक्का लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती.

नकळत आमचे डोळे पाणवले. कारण ज्या गरिबाला कॉफी प्यावीशी वाटली होती, तो खिशात पैसे नसतांनाही आला होता. त्याला कुणाकडेही हात पसरावे लागले नाहीत, किंवा कुणाकडेही याचना करण्याची वेळ आली नाही. एवढेच काय, हे दान कुणी दिले याचीही त्याला कल्पना नव्हती. त्याचवेळी देणाऱ्यालाही आपले दान कुणाला जाणार याची कल्पना नसते; पण त्याला नक्की ठाऊक असते की हे सत्पात्री दान आहे.

—–खरंच बोध घेण्यासारखी कथा. 

प्रस्तुती : श्री विनय माधव गोखले

भ्रमणध्वनी – 09890028667

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments