सुश्री सुनीता जोशी
वाचताना वेचलेले
☆ राजे आणि दुसरं घर..! ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीता जोशी ☆
अवघ्या त्रेपन्न वर्षांचा एक सत्पुरुष.. पंचतत्वात विलीन झाला आणि… चित्रगुप्ताच्या दरबारात हजर झाला..
चित्रगुप्तानं बसायला मानाचं आसन दिलं – – अन् राजांना अपमान झालेला तो दरबार आठवला..
दोघांनीही त्यावर स्मितहास्य केलं.
“चला राजे, तुम्हांला स्वर्गाच्या दारापर्यंत सोडायची जबाबदारी माझी आहे. आयुष्यभर पायाला भिंगरी लावून फिरलात, आता जरा उसंत घ्यावी. “ चित्रगुप्त अंमळ हुशारीने म्हणाला.
राजे जागचे हलले नाहीत, अन् तो चिंताक्रांत झाला.
“चलावं महाराज, याचसाठी तर असतो मानव जातीचा अट्टहास.. “ यावेळी स्वरात जरा अजीजी होती.
“ नको देवा, अर्ध्यातच बोलावलंस न विचारता…. अन् ह्या स्वर्गाचा आग्रह नव्हताच कधी मनात. श्रींच्या इच्छेचं स्वराज्य तर झालं, सुराज्यासाठी तू वेळ कुठे दिला.. इथे स्वर्गात गेलो तर देवत्व मिळेल, आणि खाली मूर्त्या आणि टाक होतील माझ्या. मला मानवच राहू देत आणि राहिलेला अर्धा डाव पूर्ण करु दे. “
“भाग्य लिहीलं गेलंय राजे, आता बदल नाही. या दरबारातून थेट स्वर्गात, याला पर्याय नाही.“
राजे पुन्हा हसले, “ देवा, माझी वही नीट तपासलीत ना, तुरी द्यायची कला अवगत आहे मला. “
स्वर्ग सोडून राजाने पृथ्वीचाच हट्ट धरला. आता मात्र चित्रगुप्ताचा नाईलाज झाला. जगत्पिता ब्रह्मदेवाशी बोलणी करुन, राजांसोबत महाराष्ट्रातील गर्भवतींच्या स्वप्नात दाखल झाला.
गर्भवती १
‘देवी, हे मूल देतोय तुला, तेजस्वी आहे, राजकारणात जाईल, सुराज्य देईल. ’
‘ नको देवा, शिकून सवरुन नोकरी करेल असंच मूल हवंय मला, दुसरं घर बघ. ’
गर्भवती २
‘ देवी, हे मूल देतोय तुला, संस्कारी आहे, रांझ्याच्या पाटलाचे हात तोडेल, शत्रूकडच्या स्त्रीलाही सन्मान देईल. ’
‘ नको देवा, आपण भलं आणि आपलं घर भलं असं मानणारंच मूल दे मला, दुसरं घर बघ. ’
गर्भवती ३
‘ देवी, हे मूल देतोय तुला, परोपकारी आहे, रयतेचं हित बघेल, कुणाला उपाशी ठेवणार नाही, प्रसंगी धनिकाकडून घेईल व गरीबाला देईल. ’
‘ नको देवा, भौतिक सुखांची सवय झालीय मला, असं उपद्व्यापी मूल नकोय मला, दुसरं घर बघ. ’
गर्भवती ४, ५, ६…
‘ देवींनो, होऊ घातल्या मातांनो, इतिहास बदलू शकणारं एक मूल कूस मागतंय.. स्वर्गाचा दरवाजा सोडून, चंद्रमौळी अंगण मागतंय.. सुराज्याच्या राहिलेल्या स्वप्नासाठी, स्वतःच निर्मिलेल्या राज्यात, पुनर्जन्मासाठी एक जिजामाता शोधतंय.. कुणीतरी या पुढे आणि आपल्या उदरात सामावून घ्या हा सूर्य. ’
‘ देवा, कितीदा सांगावं तुला, जे आहे ते सहन करावं, जे होईल ते स्वीकारत जावं, निगुतीनं वागावं अन् स्वतःचं पहावं, हेच अंगात भिनलंय आता. अन्याय बिन्याय, सत्यासाठी लढा, वगैरे वगैरे म्हणजे लष्कराच्या भाकरी आहेत रे, नाही भाजायच्या आम्हांला… हे सूर्याचं तेज सांभाळणारी जिजाऊ शेजारच्या घरात आहे बहुतेक. आमचा पिच्छा सोड देवा आणि कृपा करुन दुसरं घर बघ. ‘
हताश झालेल्या स्वरात चित्रगुप्त म्हणाला,
“ राजे, उणीपुरी तीनशे चाळीस वर्ष फिरवताहात मला. एव्हाना तुमचा देव केलाय हो लोकांनी, मणभर सोन्याचं सिंहासन, आणि रुप्याचे टाक झालेत तुमचे आणि मूर्त्याही विसावल्यात देव्हा-यात. पुतळे तर तुम्ही न पाहिलेल्या न जिंकलेल्या प्रदेशातही उभारलेत. तुमचा पुनर्जन्म हा तर तुमचं नावं घेऊन मनमानी करणा-यांनाही घात ठरेल. त्यांनाही नकोसा असेल हा पुनर्जन्म. आता तरी स्वर्गात चला. “
“ देवा, असा हताश झालो असतो तर चार मित्र घेऊन भवानीसमोर शपथ घेतलीच नसती.. कोवळ्या पोराला घेऊन आग्र्याहून सुटलोच नसतो.. सर्व काही गमावलेल्या तहातून उभा राहिलोच नसतो.. अमर्याद सागराशी पैज घेतलीच नसती.. दक्षिणेचा दिग्विजय मिळवलाच नसता.. स्वराज्यासाठी आदर्श आज्ञापत्रे लिहीलीच नसती, आणि…. माझ्यानंतरही चालणारं राज्य निर्माण केलंच नसतं… एकदा सुराज्य येऊ दे देवा, तुम्ही म्हणाल तेथे येईन. “
पण तोपर्यंत…?
तोपर्यंत – –
राजांचा आत्मा न मागितलेल्या देवत्वाच्या माळेत गुंफलेला राहणार,
आणि
मावळ्यांचे हात केवळ ढोल-ताशांच्या गजरात गुंतलेले राहणार.. !
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुश्री सुनीता जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈